'पांडू हवालदार' या दादा कोंडकेंच्या सिनेमात एक गाणं आहे, "माज्या कुलुपाची चावी हरवली, कोतवाल तुमी डायरीत ही क्येस न्हाई लिव्हली ..." ते गाणं दादांच्या टिपिकल द्व्यर्थी संवादाइतकं चावट जरी नसलं, तरी ऐकता-ऐकता आपोआप गालात जीभ जातेच!
पण शीर्षक म्हणून निवडलेल्या या शृंगारिक गाण्याचा आणि माझ्या लेखाचा खरं तर संबंध इतकाच की, आज अनेक दिवसांनंतर माझ्या हातून एक किल्ली हरवली.
आमच्या शाळेचे आवार म्हणजे जुना ब्रिटिश कॅम्प असल्याने, १९७०च्या दशकात आमची शाळा सातारा शहराच्या बाहेरच होती म्हणायची. सदर बाजार नावाची एक वस्ती तेवढी शाळेपासून जवळ होती. त्यामुळे डुप्लिकेट किल्ली बनवून देणाऱ्याला बोलावून कुलूप उघडणे तसे दुरापास्तच असायचे. मग रडवेल्या चेहऱ्यांनी ती मुलं कपाटाचे कुलूप तोडायचे मार्ग शोधू लागायची.
अशा वेळी काही वर्गमित्र आणि सिनियर मुलं मदतीला यायची. तशीच, मनातला आसुरी आनंद लपवत, लांबूनच फुकट सल्ले देणारीही काही मुलं होती. आमच्या कपाटांना लावलेली कुलुपं तशी साधीच असायची. त्यामुळे ती तोडायला फुटबॉल बूट हाच रामबाण उपाय कामी यायचा. त्या बुटांच्या तळाला जे कडक असे स्टड असायचे, त्यांच्या माऱ्याने त्या फुसक्या कुलुपाचा सहजी 'आ' वासत असे. आमच्यातली जरा जास्तच 'Security Conscious' असलेली काही मुलं सुट्टीवर जाताना आपल्या कपाटाला 'नवताल' किंवा अशाच कुठल्या तरी कंपनीची दणकट कुलुपं लावून जायची. त्यांची किल्ली जर हरवली तर मात्र त्यांची अवस्था बघवत नसे. तिथे फुटबॉल बुटांचा उपयोग होत नसे. मग दगडाचे 'दाणदाण' आवाज रात्री उशिरापर्यंत ऐकू येत असत.
अनेक कटू अनुभव घेतल्यानंतर, पुढे-पुढे माझ्याकडून किल्ली हरवण्याचे प्रसंग कमी झाले. कोणतीही किल्ली किंवा इतरही गोष्टी जपून ठेवण्याचं जरासं भान मला आपोआप आलं. हल्ली घरातून बाहेर पडताना, मी गाडीच्या किल्लीचा वजनदार गुच्छ रुमालासोबत पॅन्टच्या डाव्या खिशात ठेवतो आणि घराच्या किल्लीची छोटी रिंग उजव्या खिशात ठेवतो. उद्देश हा की, रुमाल किंवा गाडीची किल्ली काढताना चुकून घराची किल्ली हाती येऊ नये किंवा खिशाबाहेर पडू नये.
आज मी जरा गडबडीत बाहेर पडलो होतो. उजव्या हातात पिशवी असल्याने, डाव्या हाताने दोन्ही किल्ल्या उचलल्या आणि डाव्या खिशात कोंबल्या. पुढच्या दोन तासात, सदर्न कमांड हॉस्पिटलमधील दोन डिपार्टमेंट्स, आणि एक-दोन दुकाने अशा विविध ठिकाणी जाऊन, वेगवेगळी कामे करून, स्वातीला तिच्या क्लिनिकमधून घेऊन मी घरी आलो. तिला लगेच कॉलेजात लेक्चर घ्यायला निघायचे होते. घर उघडण्यासाठी खिशात हात घातला तो काय? किल्ली गायब! दोन्ही खिसे दोन-तीनदा तपासले, हातातली पिशवी तपासली, पण व्यर्थ.
स्वातीजवळच्या किल्लीने घर तर उघडले. पण "घराची किल्ली हरवल्यामुळे, सुरक्षेचा विचार करता, आता घराचे मुख्य कुलूप बदलावे लागणार..." हा विचार माझ्या मनामध्ये येण्याच्याही आधी मला स्वतःची प्रचंड लाज वाटली. तसेच उलट्या पावली बाहेर पडून, ज्या दोन-तीन ठिकाणी मी गेलो होतो तिथे जाऊन शोधाशोध करावी, कुठेतरी ती किल्ली पडलेली नक्की सापडेल, असा माझा विचार होता. पण आता आम्हा दोघात मिळून एकच किल्ली असल्याने, स्वाती कॉलेजात गेल्याशिवाय मला घर बंद करून बाहेर पडता येणार नव्हते.
अखेर मी बाहेर पडलो आणि सगळीकडे पुन्हा जाऊन आलो. दुपारची वेळ झालेली होती. आज बुधवार असल्याने सदर्न कमांड हॉस्पिटलचा 'हाफ डे' होता. त्यामुळे तिथे शुकशुकाट झालेला होता. तिथल्या कारपार्कमध्ये शोधाशोध केली. दुकानापर्यंत आलो तर, दुपारी झोपण्याच्या 'पुणेकर धर्मा'ला जागणाऱ्या दुकानदाराने दुकान बंद केलेले होते. त्या दुकानासमोर थोडी शोधाशोध केली. अखेर हात हलवत घरी आलो. घरात शिरत असतानाच 'पांडू हवालदार' सिनेमातलं गाणं आठवलं होतं आणि हा लेखही मनात तयार झाला होता.
तेवढ्यात मला किल्ली हरवण्याशी संबंधित असलेला दुसरा एका प्रसंग आठवला. बऱ्याच वर्षांपूर्वी, मुलं लहान असताना, आम्ही दोघे मुलांना घेऊन कुठंतरी लांब ड्राइव्हसाठी गेलो होतो. हवा आल्हाददायक होती. एका डोंगरावर गाडी नेली आणि अचानक रस्त्याच्या कडेला एक मोठं, निर्मनुष्य पठार दिसलं. त्या सबंध पठारावरच काय, पण आसपासदेखील एकही मनुष्यप्राणी नव्हता. शहरातल्या माणसांना अशा जागेची भुरळ न पडली तरच नवल!
रस्ता सोडला आणि सरळ त्या पठारावर मी गाडी नेली. खाली उतरून जरा हिंडावं, फोटो काढावे, अशी सगळ्यांचीच इच्छा होती. चौघंही खाली उतरलो. काही पावलंच पुढे गेलो असू, तेवढ्यात गाडी लॉक झाल्याचा 'पिक' असा आवाज मागून आला. काय घडलं होतं याचा मला त्या क्षणी अंदाज आला. मी गाडीची किल्ली इग्निशन स्विचमध्ये ठेवूनच खाली उतरलो होतो आणि किल्ली 'ऑन' केलेल्या अवस्थेत होती. गाडीचे एक 'फीचर असे होते की जर काही क्षण 'ऑन' अवस्थेत किल्ली राहिली तर गाडीचे दरवाजे आपोआप 'लॉक' होतात. या 'फीचर'चा अनुभव मी गाडीमध्ये बसलेलो असताना अनेकदा घेतला होता. पण त्या क्षणी मला त्याचा विसर पडला होता.
आता परिस्थिती अशी होती की त्या निर्मनुष्य पठारावर आम्ही चौघे आमच्या गाडीच्या बाहेर होतो, किल्ली गाडीच्या आत होती, गाडीच्या खिडक्या बंद होत्या, आणि गाडी लॉक झालेली होती. किल्लीच्या बाबतीतला असा प्रसंग माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला होता. त्यामुळे त्यावर खात्रीशीर उपाय मला चटकन सुचेना. गाड्या चोरणारे लोक पट्टी किंवा काहीतरी वापरून, बाहेरून गाडीची खिडकी उघडू शकतात इतपत माहीत होते. पण अर्थातच, तसले काही करण्याचा मला पूर्वानुभव नव्हता. काहीतरी खटपट करू लागलो. अशा वेळी भुकेजलेली स्वाती आणि मुले मला उद्देशून जे काही बोलत होती ते ऐकून माझे मनोबल आणखीच खचत चालले होते.
अचानक आमच्यापैकी कोणालातरी दूरवरच्या रस्त्यावरून जाणारी, एक 'लालपरी' बस दिसली. स्वाती व मुलांनी आरडा ओरडा करून ती बस थांबवली. बसचा ड्रायव्हर व कुणा प्रवाशाने काहीतरी करून गाडीची खिडकी उघडण्यात यश मिळवले आणि आमची त्या संकटातून सुटका झाली. आजवर किल्ली हरवण्याचे सर्वच प्रसंग शोकांत असल्याचा अनुभव आलेला होता. त्या मानाने, गाडीच्या किल्लीचा हा प्रसंग फार महागात पडला नव्हता म्हणून जरा हायसे वाटले.
आज किल्ली हरवल्याच्या शोकांत प्रसंगाची गोष्ट लिहायला मी जड अंतःकरणाने बसलो होतो. स्वाती कॉलेजातून आल्यावर तिला ही गोष्ट वाचून दाखवावी, म्हणजे दुःख जरा हलके होईल असा विचार केला होता. संध्याकाळी, "शोधा म्हणजे सापडेल" असे ओरडतच स्वाती घरात शिरली, तेंव्हा मात्र मी जरा खटटू झालो. माझे दुःख हलके करण्याऐवजी तिने माझ्या जखमेवर मीठ चोळावे याचे मला वाईट वाटले. पण पाहतो तो काय? माझी किल्ली माझ्या डोळ्यासमोर नाचवतच ती ओरडत होती!
कॉलेजातून परत येऊन गाडी कारपार्कमध्ये लावल्यानंतर, तिने बारकाईने कारपार्क धुंडाळले होते. तिला ती किल्ली आमच्या कारपार्कमध्येच सापडली होती असे तिने सांगितले. ते ऐकून माझी अवस्था मात्र 'काखेत कळसा...' अशी झाली होती.
परंतु, किल्ली हरवण्याच्या काही कथा सुखांतदेखील असू शकतात हा अनुभव आज मला आला, हेही नसे थोडके!

२७ टिप्पण्या:
खुसखुशीत लेख झाला आहे , आनंद साहेब...!
छान लेख Col साहेब. मी बॅचलर होतो, तो पर्यंत फ्लॅट ची किल्ली जानव्याला तरी लावून किंवा व्हेंटिलेटर च्या चौकटीत ठेवून कोर्टात जायचो हे आठवले, नितीन चौधरी
🙂 धन्यवाद 🙏
😄👍
👌👌🤣 हा लेख वाचून आमच्या मराठीच्या पुस्तकातला कुलूप नावाचा धडा आठवला. लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि कथानायक बंडूनाना होते.
🙂👍
This article reminds me of my scenarios. Every time I put my keys in a "can't-miss" spot, future me treats it like a treasure hunt.
😀 True! If we compile the stories of everyone about losing keys, it will be a voluminous book!
घराच्या कुलूपाची, सामानाच्या बॅगेची, सायकलची, गाडीची, घरातल्या कपाटाची अथवा कार्यालयातील आपल्या टेबलाची यांपैकी एकाची तरी किल्ली आयुष्यात कमीत कमी एकदा तरी आपल्या हातून हरवली नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. तुमच्या वरील आलेल्या ह्या प्रसंगामुळे आयुष्यातील असेच काहीसे प्रसंग आठवून स्वतःचेच हसू आले. पण आज पर्यंत, असे होऊ नये म्हणून काय उपाय केले पाहिजेत ह्याची गुरुकिल्ली मात्र अजूनही सापडत नाहीये.
😄 किल्ली हरवण्याच्या बाबतीतल्या प्रत्येकाच्या आठवणी एकत्र केल्या तर एक ग्रंथ होईल!
कर्नल आनंद बापट, किल्ली हरविल्या बाबतीत बोलायचे झाले तर हे सर्वांकडून होते परंतू हि जबाबदारी सदासर्वदा घरातील पुरुषांनाच जास्त सांभाळावी लागते आणि मग त्यामुळे या विषयावरून अशा घटना त्यांच्या कडूनच होतात. यामुळेच पाॅकेटवाॅच ही संकल्पना अस्तित्वात आली असावी, असो किरकोळ/ साधारण विषयाची अत्यंत सुंदर व आकर्षक रित्या मांडणी केली आहे आणि वाचकांना आनंददायी आहे. ( जशे MHJ कार्यक्रमामध्ये रोजच्या जीवनातील किरकोळ/ साधारण विषयाची योग्य मांडणी करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध/ खिळवून टाकण्यात मध्ये ते यशस्वी झाले आहेत). लेखन आवडले, आपले अभिनंदन!!! 😀🤝🙏🏻😇
कर्नल आनंद बापट, किल्ली हरविल्या बाबतीत बोलायचे झाले तर हे सर्वांकडून होते परंतू हि जबाबदारी सदासर्वदा घरातील पुरुषांनाच जास्त सांभाळावी लागते आणि मग त्यामुळे या विषयावरून अशा घटना त्यांच्या कडूनच होतात. यामुळेच पाॅकेटवाॅच ही संकल्पना अस्तित्वात आली असावी, असो किरकोळ/ साधारण विषयाची अत्यंत सुंदर व आकर्षक रित्या मांडणी केली आहे आणि वाचकांना आनंददायी आहे. ( जशे MHJ कार्यक्रमामध्ये रोजच्या जीवनातील किरकोळ/ साधारण विषयाची योग्य मांडणी करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध/ खिळवून टाकण्यात मध्ये ते यशस्वी झाले आहेत). लेखन आवडले, आपले अभिनंदन!!! 😀🤝🙏🏻😇
धन्यवाद सतीश! 🙂🙏
किल्ली हरवली तसा विचार केला तर गोष्ट साधी परंतु आपले अनुभव आणि ते कथन करण्याची छान हातोटी. छान लिहिता असेच लिहिते राहा.
धन्यवाद 🙏
मस्त. असे बरेच प्रसंग ओळखीच्या लोकांबाबत,माझ्यासोबत घडलेत, ते सगळे आठवले. बऱ्याच वेळा किल्ली सुरक्षित ठिकाणी ठेवते,पण वेळेला ते ठिकाण.आठवतच नाही
विषय साधाच पण फारच छान मांडला आहे
बहुतेक सगळ्या ना ह्या प्रसंगातून जावे लागते आम्ही आता एक किल्ली शेजारच्या घरी ठेवतो
माझे तर एकदा केर टाकायला बाहेर आले असताना वाऱ्याने लॅच लागले होते अंगात घरातले कपडे आणि पायात घरातली चप्पल आणि दुसरी किल्ली नवऱ्याच्या कडे आणि तो चिंचवडला होता
शाळेत जायलाच हवे होते कारण शाळेत बोर्डाची प्रयोगपरिक्षा होती आणि मी इंटरनल परीक्षक!!
शेवटी शेजारच्या घरातून फोन करून नवऱ्याला बोलावून घेतले शाळेत कळवले थोडा उशिर होईल
पण कशीबशी वेळेत पोहोचले असो तर ही माझी कथा
फारच छान लिहिले आहे
धन्यवाद 🙏
अरे देवा! तुमच्यावर फजितीचीच वेळ आली होती!
स्वित्झर्लंडमधे नोव्हार्टीस च्या गेस्ट हाऊस मधे राहत असताना एकदा विमान प्रवासाची तारीख बदलायला विमानतळावर जायला लागले. परत रहायच्या ठिकाणी आल्यावर किल्ली हरवल्याचे लक्षात आले. तिथे किल्ली बनवून घ्यायचा सुद्धा पर्याय नव्हता. जाता येता ज्या सर्व ठिकाणी थांबलो होतो तिथे सापडली नाहीच. शेवटचा प्रयत्न म्हणून विमानतळावर ने आण करणाऱ्या शटलच्या ड्रायव्हरला विचारले. मी तिथे अस्तित्वातच नसल्यासारखा तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. शेवटी निर्वाणीचा उपाय म्हणून ‘j’ai perdue mes clés’ असे फ्रेंच मधे विचारल्यावर पठ्ठ्या म्हणतो ‘deux clés?’ (दोन किल्ल्या?) असे म्हणत त्याने डॅशबोर्ड जवळच्या दोन किल्ल्या दाखवल्या … ज्या माझ्याच होत्या … ! 🔑 🔑 😇
Anand, I loved this one, written in your typical conversational style. I think every reader would also identify similar instances in his/her own life.
Keep writing such spicy articles.
Anand, I loved this one, written in your typical conversational style. I think every reader would also identify similar instances in his/her own life.
Keep writing such spicy articles.
अर्क मनुष्य निघाला की तो ड्रायव्हर !
Many thanks for your encouraging remarks! 😊🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
टिप्पणी पोस्ट करा