बुधवार, १३ मार्च, २०२४

सैन्यदलात अधिकारी व्हायचंय?

सैन्यदलात अधिकारी व्हायचंय?

सशस्त्र सेनादलांमधील साहसी जीवनाचं आकर्षण तरुण पिढीला नेहमीच वाटत आलेलं आहे. एक सन्माननीय करियरचांगल्या पगाराची सरकारी नोकरी, विशेष सोयी-सुविधांसह उत्तम पॅकेज, आणि त्याबरोबरच   देशसेवेची संधी, अशा अनेक जमेच्या बाजू त्यात आहेततरुण-तरुणींना या करियरसाठी मार्गदर्शन करताना एक गोष्ट मात्र  प्रकर्षाने जाणवते की, सेनाधिकाऱ्यांच्या निवडप्रक्रियेबद्दल आणि एकंदरच सैनिकी पेशाविषयी अनेक गैरसमज असतात. हे गैरसमज वेळीच दूर झाल्यास या करियरसाठी आवश्यक असलेली मानसिकता घडवणे आणि योग्य  पूर्वतयारी करणे सहज शक्य आहे.

सैनिक-भरतीच्या तुलनेत सेनाधिकाऱ्यांची निवड-प्रक्रिया आणि प्रशिक्षण, दोन्हीही खूपच निराळ्या स्वरूपाचे असते. 
सैनिकभरतीसाठी किमान शैक्षणिक पात्रता, उंची, वजन व शारीरिक क्षमता पुरेशी असते.  मात्र सेनाधिकारी होण्यासाठी उमेदवारामध्ये उच्च बौद्धिक व शैक्षणिक पातळी, यांच्याबरोबरच विशेष  नेतृत्त्वगुण असणे अनिवार्य असते. सेनाधिकारी होण्यासंबंधी योग्य माहिती तरुण मुला-मुलींपर्यंत पोहोचवणे, हाच या लेखाचा उद्देश आहे. 

पायदळ, नौदल आणि हवाईदलात अधिकारी म्हणून दाखल होण्यासाठी विविध वयोगटांसाठी खालील  वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्वांबद्दलची माहिती सैन्यदलांच्या अधिकृत संकेतस्थळांवर दिलेली असते.: - 
  1. NDA (१२वी पास मुला-मुलींसाठी)
  2. १०+२ टेक्निकल एन्ट्री/AFMC (१२वी पास मुला-मुलींसाठी) 
  3. डायरेक्ट एन्ट्री (ग्रॅजुएट पुरुषांसाठी)
  4. शॉर्ट सर्व्हिस कमिशन (ग्रॅजुएट पुरुष व महिलांसाठी)
  5. डायरेक्ट एन्ट्री मेडिकल कोअर (डॉक्टर पुरुष व महिलांसाठी)
  6. UES/TGC (इंजिनिअर झालेल्या किंवा तिसऱ्या वर्षाला असलेल्या पुरुष व महिलांसाठी)
  7. प्रादेशिक सेना (TA) (ग्रॅजुएट पुरुषांसाठी)
  8. ACC एन्ट्री (सेनादलात सध्या  कार्यरत असलेल्या जवानांसाठी)
या वेगवेगळ्या पर्यायांसाठी अर्ज करण्याची मुदत, परीक्षांचे वेळापत्रक, लेखी परीक्षांसाठीचा अभ्यासक्रम आणि इतर संबंधित माहिती संकेतस्थळांवर आणि Employment News किंवा तत्सम वृत्तपत्रांतून प्रसृत होत असते.

निवड प्रक्रियेच्या पायऱ्या अशा असतात: -

१. अर्ज-छाननी 
२. लेखी परीक्षा (काही पर्यायांसाठी)
३. Services Selection Board (SSB) चाचणी (वैद्यकीय सेवा वगळता सर्वांसाठी)
४. वैद्यकीय तपासणी (पळणे, उड्या मारणे, यासारख्या शारीरिक क्षमतांची चाचणी नव्हे)
५. यशस्वी उमेदवारांची गुणवत्ता यादी 
 
सेनाधिकारी होण्याकरिता उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी काहींसाठी केवळ अर्ज करणेच पुरेसे असते. अर्जछाननीमध्ये पात्र ठरलेल्या सर्व अर्जदारांना SSB चाचणीसाठी बोलावले जाते. इतर सर्व पर्यायांसाठी लेखी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असते. ही परीक्षा फारशी अवघड नसल्याने त्यातून हजारो विद्यार्थी पुढील पायरीसाठी निवडले जातात.  त्या सर्व उमेदवारांना नेतृत्त्वगुण-चाचणीसाठी SSB निवडकेंद्रात बोलावले जाते. 

SSB चाचणीसाठी आलेल्या एकूण उमेदवारांपैकी फारच कमी उमेदवार सेनाधिकारी बनण्याच्या निकषावर पात्र ठरतात. अर्थातच त्याची काही कारणे आहेत. पण SSB मध्ये नेमके काय तपासले जाते हे नीटसे माहिती नसल्याने आणि यशस्वी झालेल्या उमेदवारांची टक्केवारी खूपच कमी असल्यामुळे SSB चाचणीबद्दल एक प्रकारची भीती उमेदवारांच्या मनात असते. म्हणूनच, हा लेख मुख्यत्वे SSB चाचणी प्रक्रियेवर केंद्रित आहे, आणि त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या तयारीवरदेखील प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्यात केलेला आहे.  

दुसऱ्या महायुद्धापूर्वी, सेनाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी ठोस निकष जगभरात कुठेही अस्तित्वात नव्हते. नेतृत्वगुण असोत वा नसोत, राजघराण्यातील किंवा सरदारकुलातील मुले आपोपाप सेनाधिकारी बनत असत. दुसऱ्या महायुद्धात मात्र काही सेनाधिकाऱ्यांमधील नेतृत्त्वगुणांच्या अभावामुळे होणारे तोटे प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर, मानसशास्त्रीय संशोधनाद्वारे असे ठरले की१५ निवडक नेतृत्त्वगुण सेनाधिकाऱ्याच्या अंगी असणे अत्यावश्यक आहे. ते नेतृत्वगुण दर्शवणारी वागणूक कशी असेल, याचा विचार करून, एक १०-अंकी मोजपट्टी तयार केली गेली. म्हणजेच, एखाद्या व्यक्तीमध्ये अमुक प्रकारची वागणूक प्रत्यक्ष दिसल्यास ते विशिष्ट नेतृत्वगुण १० पैकी  अमुक  इतक्या प्रमाणात असू शकतील, असे ठरवता येऊ लागले. 

परंतु, एखाद्या सेनाधिकाऱ्यासमोर भविष्यात उद्भवू शकेल अशी नेमकी परिस्थिती, निवडप्रक्रियेच्या काळात उमेदवारांपुढे प्रत्यक्ष उभी करणे शक्य नसते. त्यामुळे, प्रातिनिधिक स्वरूपाच्या परिस्थितीतील त्याची वागणूक पाहून, त्याच्यामधील सुप्त नेतृत्वगुणांचा अंदाज बांधण्याची प्रणाली विकसित केली  गेली. ही निवड-प्रक्रिया ब्रिटिश सैन्याने प्रथम वापरात आणली होती. काही बारीक-सारीक सुधारणा वगळता हीच प्रक्रिया मूळ रूपात  आजतागायत भारतासह इतर देशोदेशीच्या सैन्यदलासाठी वापरली जात आहे.

"निवड होण्यासाठी, त्या १०-अंकी मोजपट्टीवर उमेदवाराची पातळी काय असायला हवी?"
 
या प्रश्नाचे उत्तर मात्र सोपे नाही. मुळात, कोणाही एका परीक्षकाच्या चुकीमुळे एखाद्या अयोग्य व्यक्तींची निवड होऊ नये यासाठी या प्रक्रियेमध्ये तिहेरी परीक्षणाची व्यवस्था केलेली असते. मानसशास्त्रज्ञ (Psychologist), मुलाखत अधिकारी (Interviewing Officer)  आणि गट-परीक्षण अधिकारी (Group Testing Officer) अशा तीन प्रशिक्षित व्यक्ती स्वतंत्रपणे आपापल्या विशिष्ट तंत्राद्वारे प्रत्येक उमेदवाराला जोखतात. प्रत्येक उमेदवाराच्या अंगी, १५ पैकी कोणते नेतृत्वगुण किती प्रमाणात आहेत याविषयीचे आपापले निष्कर्ष हे तिन्ही परीक्षक स्वतंत्रपणेच काढतात. सर्वंकष विचारांती, जर त्या उमेदवाराचे व्यक्तिमत्व किमान अपेक्षित पातळीपेक्षा वरचढ दिसून आले तरच परीक्षक त्या उमेदवाराला पात्र ठरवतोसंपूर्ण निवड-प्रक्रियेदरम्यान, हे तिघेही परीक्षक एकमेकांशी कोणताही संपर्क ठेवीत नाहीत

अशा प्रकारे, संपूर्ण प्रक्रियेतून सर्व उमेदवार गेल्यानंतर, हे तिन्ही परीक्षक एकत्र बसून प्रत्येक उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी आपापल्या वैयक्तिक निर्णयांवर सखोल चर्चा करतात. जर त्यांच्यात एकमत झाले तरच त्या उमेदवाराला यशस्वी घोषित केले जातेसर्व यशस्वी उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यामध्ये उमेदवाराची उंची, वजन, कान व डोळ्यांची क्षमता मोजली जाते, व त्याला कोणतीही व्याधी अथवा शारीरिक व्यंग नसल्याची खात्री केली जाते. वैद्यकीय तपासणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी संबंधित सेना मुख्यालयाकडे पाठवली जाते. प्रशिक्षण अकादमीमध्ये त्या वेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागांनुसार यशस्वी उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाते. 

सेनाधिकारी म्हणून निवड होण्यासाठी कोणते विशिष्ट नेत्तृत्वगुण अंगी असायला हवेत ते आता पाहू: -

१.  Effective Intelligence :-
समोर आलेल्या एखाद्या अडचणीवर मात करण्यासाठी किंवा चालून आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवण्यासाठी, आपली बुद्धी प्रभावीपणे वापरता येणे म्हणजेच Effective Intelligence. सेनाधिकाऱ्यांना अनेक अनपेक्षित, खडतर प्रसंगांमधून मार्ग काढत आपल्या तुकडीचे नेतृत्व करावे लागते. त्यांच्यामध्ये हा गुण असणे अत्यंत महत्वाचे ठरते. 
२. Reasoning Ability: -
या गुणाच्या आधारे कोणत्याही घटनाक्रमाचा सुसंगतवार विचार करून त्याची कारणमीमांसा आपण करू शकतो. समोर असलेली सर्व परिस्थिती समजून घेऊन, योग्य तो निर्णय घेता येण्यासाठी सेनाधिकाऱ्याला हा गुण फार उपयुक्त ठरतो.
३. Organizing Ability: -
'उपलब्ध साधनांचा कल्पकतेने आणि सुयोग्य वापर करण्याची क्षमता' असे या गुणाला म्हणता येईल. पुरेश्या साधनांचा अभाव असतानादेखील कामगिरी फत्ते करण्यात सेनाधिकाऱ्याची खरी कसोटी लागत असल्यामुळे हा गुण अत्यावश्यक असतो.
४. Power of Expression: -
आपले विचार प्रभावीपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची क्षमता म्हणजेच अभिव्यक्तिक्षमता. हा गुण जर अंगी असेल तर, आपल्या हाताखालच्या जवानांपर्यंत आपले म्हणणे एखादा सेनाधिकारी उत्तमरीत्या पोहोचवू शकतो. महत्वाची बाब अशी की, अभिव्यक्तिक्षमतेच्या जोरावर, भाषेवर प्रभुत्त्व नसतानाही योग्य तो परिणाम साधता येऊ शकतो.
५. Social Adaptability: - 
एखाद्या नवीन गटात आपल्याला सहजी मिसळता येणे हा एक फार महत्वाचा गुण आहे. ही क्षमता कुठल्याही यशस्वी नेत्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषतः सेनाधिकाऱ्यासाठी हा गुण अत्यावश्यक मानला जातो.
६. Cooperation: - 
आपल्या सहकाऱ्यांना आवश्यक ती मदत उत्स्फूर्तपणे करण्याची भावना संघामधील सर्व सदस्यांमध्ये असेल तरच तो संघ यशस्वी होऊ शकतो. हाताखालच्या सर्व सैनिकांमध्ये सहकार्याची भावना खोल रुजविण्यासाठी स्वतः सेनाधिकाऱ्याच्या अंगी हा गुण अत्त्युच्च्य पातळीवर असावाच लागतो.
७. Sense of Responsibility : - 
हा गुण म्हणजेच जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्यदक्षता. संपूर्ण तुकडीची आणि त्या तुकडीवर सोपविलेल्या कामगिरीची सर्व जबाबदारी सेनाधिकाऱ्याच्या खांद्यावर असते. अगदी तरुण व अननुभवी सेनाधिकाऱ्याकडूनही उच्च प्रतीच्या कर्तव्यदक्षतेची अपेक्षा असते.
८. Initiative: - 
हा गुण अंगी असलेली व्यक्ती नेहमीच, प्रत्येक उपक्रमामध्ये पुढाकार घेऊन योग्य दिशेने पहिले पाऊल टाकते. अनोळखी वाटेवर व अनपेक्षित परिस्थितीत सैनिकांना योग्य मार्गदर्शन करण्याकरिता, सेनाधिकाऱ्यासाठी हा गुण अनिवार्य ठरतो. 
९. Self-Confidence: - 
आपल्या विचारांवर, आणि ते विचार प्रत्यक्षात उतरविण्याच्या स्वतःच्या क्षमतेवर ज्याचा पूर्ण विश्वास असेल तोच इतरांना मनोबल देऊ शकतो. म्हणून, जबाबदारीची धुरा सदैव खांद्यावर वाहणाऱ्या सेनाधिकाऱ्याच्या अंगी दृढ आत्मविश्वास असावाच लागतो. 
१०. Speed of Decision: - 
घाईघाईत अविचाराने घेतलेले निर्णय, किंवा वेळ निघून गेल्यावर घेतलेले योग्य निर्णयही कुचकामीच ठरतात. कित्येक सैनिकांचे जीव किंवा देशाची सुरक्षा ज्याच्या एका आज्ञेवर अवलंबून असू शकते त्या सेनाधिकाऱ्याला योग्य वेळी योग्य तो निर्णय घेता आलेच पाहिजेत.
११. Ability to Influence a Group : -
यशस्वी नेतृत्त्वासाठी नेतेपदाबरोबर आपोआप येणारे अधिकार पुरेसे नसतात. आपल्या संघाला प्रभावित करण्याची क्षमता नेत्यामध्ये असेल तरच हाताखालचे लोक विश्वासाने आणि जोमाने काम करतात. म्हणूनच, एखाद्या समूहावर आपला प्रभाव पाडण्याची क्षमता सेनाधिकाऱ्यामध्ये असावी लागते.
१२. Liveliness:  - 
हा गुण म्हणजेच, अंगीभूत असलेले आपले चैतन्य दीर्घ काळ टिकविण्याची क्षमता. कमालीच्या कठीण परिस्थितीतही आपले मानसिक संतुलन आणि उत्साह अबाधित ठेवू शकणारा सेनाधिकारी, जिवावरच्या प्रसंगावरही मात करण्याकरिता आपल्या सैनिकांना उद्द्युक्त करू शकतो.
१३. Determination : -
दृढनिश्चय व करारीपणा असे या गुणाला  म्हणता येईल. अपयशाने खचून न जाता सतत प्रयत्न करीत राहणारा सेनाधिकारीच स्वतःला सैनिकांचा खरा नेता म्हणवू शकतो. 
१४. Courage: -
कसलीच भीती न बाळगण्याच्या स्वभावाला धाडसीपणा म्हणता येत नाही. क्वचित तो अविचारीपणाही ठरू शकतो. संकटाचा पूर्ण अंदाज घेऊन, आणि जाणीवपूर्वक मनातली भीती दूर सारून, जो संकटावर मात करायला उभा राहतो त्यालाच धाडसी व्यक्ती म्हणता येईल. हा गुण जर स्वतः सेनाधिकाऱ्याच्या अंगी असेल तरच त्याचे सैनिक आपल्या जिवावर उदार होऊन लढू शकतात.
१५. Stamina: - 
केवळ शारीरिक क्षमताच नव्हे तर आपले मनोधैर्य शेवटपर्यंत टिकविण्याची क्षमता म्हणजे stamina. मनाने उभारी धरून ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी झटत राहण्याची जिद्द प्रत्येक सेनाधिकाऱ्यामध्ये असणे अत्यावश्यक असते.
  
हे सर्व १५ गुण जगातील प्रत्येक व्यक्तिमध्ये कमी-अधिक फरकाने असतातच. परंतु, सेनाधिकारी म्हणून निवड होण्यासाठी आलेल्या उमेदवाराच्या अंगी या नेत्तृत्वगुणांची ठराविक किमान पातळी असावी लागते. बहुतेक नेत्तृत्वगुण उच्च पातळीचे असले तरी, एखादा नेत्तृत्वगुण जर खूपच कमी असेल तर तो उमेदवार निवडला जात नाही. परंतु, हे सर्व गुण साधारणतः सम प्रमाणात, आणि अपेक्षित पातळीच्या जेमतेमच वर असलेला, एखादा मध्यम प्रतीचा उमेदवारही निवडला जाऊ शकतो. याचाच अर्थ असा की, ज्याच्या एकंदर व्यक्तिमत्वामध्ये या सर्व १५ नेत्तृत्त्वगुणांचा समतोल असेल त्या प्रत्येक उमेदवाराने SSB चाचणीमध्ये यशस्वी होण्याची आशा बाळगायला काहीच हरकत नाही. 

उमेदवारांची निवड कोण व कशी करतात आणि त्यांच्या नजरेत हे नेतृत्वगुण कसे येतात हे आता पाहू.

सेनाधिकारी म्हणून निवड होण्यासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण तपासण्यासाठी खालीलप्रमाणे तीन विशेष प्रशिक्षित अधिकाऱ्यांची समिती नेमलेली असते: - 
१. मुलाखत अधिकारी- Interviewing Officer (IO) - कर्नल, ब्रिगेडियर किंवा मेजर जनरल
२. गट-परीक्षण अधिकारी-Group Testing Officer (GTO) - लेफ्टनंट कर्नल किंवा कर्नल.
३. मानसशास्त्रज्ञ-Psychologist (Psych) - लेफ्टनंट कर्नल, कर्नल किंवा मुलकी अधिकारी

ही SSB समिती ज्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आपले काम करते ती अशी : -

१. उमेदवारांच्या अंगी असलेली नेतृत्वगुणांची पातळी हाच निवडीचा पाया असावा.
२. ही पातळी किमान मर्यादेहून अधिक असलेल्या सर्व उमेदवारांची निवड केली जावी.
३. केवळ रिक्त जागांइतकेच उमेदवार निवडण्याचे बंधन समितीवर नाही.
४. समितीमधील प्रत्येक सदस्याने स्वतंत्रपणे व आपापल्या निवड तंत्राद्वारे उमेदवारांना तपासावे. 
५. पूर्ण प्रक्रियेअखेर तिघांनी एकत्रित चर्चा करून उमेदवारांच्या निवडीबाबत संयुक्त निर्णय घ्यावा.
६. समितीमधील प्रत्येक सदस्याला या संयुक्त निर्णयप्रक्रियेत समान अधिकार आहेत.
७. समितीच्या सदस्यांमध्ये मतभिन्नता असल्यास, सैन्यदलाच्या दृष्टीने हितकर ठरेल असाच निर्णय घेतला जावा.  
८. उमेदवारांच्या कामगिरीबाबत प्रक्रियेदरम्यान व नंतरही संपूर्ण गोपनीयता बाळगावी. 

SSB चाचणीचे वेळापत्रक सर्वसाधारणपणे खालीलप्रमाणे असते. उमेदवारांना SSB केंद्रावर हजर राहण्यास सांगितले जाते तो दिवस क्र. १ मानू.: -

दिवस क्र. १
  • स्वागत व प्राथमिक माहितीपर भाषण 
  • प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रांची तपासणी 
  • उमेदवारांनी Personal Information Questionnaire (PIQ) मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरणे 
दिवस क्र. २
  • बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 
  • प्राथमिक चाळणीसाठी Picture Perception & Description  Test (PPDT) व गटचर्चा
  • प्राथमिक चाळणीतील अयशस्वी उमेदवारांना निरोप.  
  • प्राथमिक चाळणी पार केलेल्या उमेदवारांसाठी पुढील निवड प्रक्रिया सुरु 
  • काही उमेदवारांची मुलाखतफेरी 
दिवस क्र. ३
  • मानसशास्त्रीय चाचण्या
  • काही उमेदवारांची मुलाखतफेरी 
दिवस क्र. ४
  • गट-परीक्षण (काही चाचण्या)
  • काही उमेदवारांची मुलाखतफेरी 
दिवस क्र. ५
  • गट-परीक्षण (उर्वरित चाचण्या)
  • उर्वरित उमेदवारांची मुलाखतफेरी 
दिवस क्र. ६
  • समारोपाचे भाषण 
  • कॉन्फरन्स 
  • निकालांची घोषणा 
  • अयशस्वी उमेदवारांना निरोप
  • यशस्वी उमेदवारांना वैद्यकीय चाचणीसाठी सूचना  
टीप: - दिवस क्र . १ व २ मध्ये होणाऱ्या सर्व कारवाया एकाच दिवशी केल्या जाऊ शकतात. तशा परिस्थितीत एकूण सहाऐवजी पाच दिवसातच ही प्रक्रिया संपू शकते.
  
परीक्षण पद्धतींचे स्वरूप
IO, GTO आणि Psych या तिन्ही अधिकाऱ्यांची परीक्षण तंत्रे एकमेकांच्या तंत्रापेक्षा पूर्णत: भिन्न असतात. प्रत्येक पद्धतीविषयी जुजबी माहिती खालीलप्रमाणे: -  

मानसशास्त्रीय चाचण्या
यातील  प्रत्येक चाचणी अत्यंत मर्यादित वेळेत पूर्ण करणे अपेक्षित असते.
 
१. Thematic Apperception Test (TAT) - दाखवलेल्या चित्रांवर आधारित गोष्टी लिहिणे (एकूण १२ )
२. Word Association Test (WAT) - दिलेले शब्द वाचून त्वरित आपल्या मनात येणारे विचार लिहिणे (एकपाठोपाठ एक असे दिले जाणारे ६० शब्द)
३. Situation Reaction Test (SRT) - दिलेल्या प्रसंगांवर त्वरित मनात येणारी प्रतिक्रिया लिहिणे (एकूण ६० प्रसंग)
४. Self Description (SD) - स्वतःचे व्यक्तिचित्रण लिहिणे 

प्रत्येक चाचणीमध्ये उमेदवाराने लिहिलेल्या उत्तरांचे मानसशास्त्रीय विश्लेषण करून, त्याच्यामध्ये असू शकणाऱ्या   नेतृत्वगुणांबद्दलचा अंदाज बांधून, त्यानुसार आपला अहवाल मानसशास्त्रज्ञ लिहितो.

गट-परीक्षण चाचण्या 
एखाद्या समूहात काम करण्याची प्रत्येक उमेदवाराची क्षमता व कौशल्य यांच्या आधारे, त्याच्यामधील नेतृत्वगुण तपासण्याचे काम, GTO म्हणजेच गट-परीक्षण अधिकारी करतोसुमारे ६ ते १० उमेदवारांचा एक असे लहान गट पाडून, खाली नमूद केलेल्यापैकी काही कार्ये सामुहिकरीत्या आणि काही कार्ये वैयक्तिकरीत्या करण्यास त्या गटाला सांगितले जाते: -
  1. गट-चर्चा (Group Discussion)
  2. सामूहिक नियोजन (Group Planning Exercise)
  3. सामूहिक कार्य (Group Tasks)
  4. अडथळ्याची सामूहिक शर्यत (Group Obstacle Race)
  5. गट-नेता या नात्याने सामूहिक कार्य करणे (Command Task)
  6. उत्स्फूर्त भाषण (Lecturette)
  7. वैयक्तिकरीत्या अडथळे पार करणे (Individual Obstacle course)
एक गट ही सर्व कार्ये करीत असताना, त्यातील प्रत्येक उमेदवाराचे बारकाईने निरीक्षण GTO करीत राहतो. प्रत्येक उमेदवाराचे इतरांसोबत होणारे शाब्दिक (Verbal), वाचिक (Vocal) व कायिक (Body Language) संवाद तो लक्षपूर्वक टिपत असतो. या निरीक्षणाद्वारे, प्रत्येक उमेदवारामधील नेतृत्वगुणांची पातळी GTO च्या लक्षात येते, आणि त्यावर आधारित आपला अहवाल तो लिहितो.
 
वैयक्तिक मुलाखत 
मुलाखत अधिकारी (IO) एका वेळी एकाच उमेदवाराची मुलाखत घेतो, आणि प्रत्येक मुलाखत सर्वसाधारणपणे  १५ ते ४० मिनिटे चालते. त्यामुळे, संपूर्ण मुलाखतफेरी संपायला एकूण तीन ते चार दिवस लागतात. उमेदवारामधील  नेतृत्वगुणांची पातळी व त्याचे एकंदर व्यक्तिमत्व गप्पांच्या माध्यमातून जाणून घेणे, हा मुलाखतीचा उद्देश असतो.  उमेदवाराचा भूतकाळ व  वर्तमान, तसेच भविष्याबद्दल त्याच्या आशा-आकांक्षा, त्याचे छंद, आवडते खेळ, देश-विदेशातील सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, घडामोडींसंबंधी त्याला असलेली माहिती, अशा विविध विषयांवर हलक्या-फुलक्या वातावरणात गप्पा होतात. कोणतेही विशेष स्वरूपाचे तांत्रिक ज्ञान उमेदवाराला आहे किंवा नाही, यावर त्याची निवड अवलंबून नसते. 

कॉन्फरन्स
संपूर्ण निवड प्रक्रियेत प्रथमच तिन्ही परीक्षकांची एकत्र बैठक होते. प्रत्येक उमेदवाराच्या निवडीबाबत तिन्ही परीक्षकांच्या वैयक्तिक निष्कर्षांवर सविस्तर चर्चा होते. त्या चर्चेच्या आधारे, समिती संयुक्तपणे आपल्या निर्णयापर्यंत पोहोचते. त्यानंतर एकेक उमेदवार समितीसमोर बोलावला जातो. काही जुजबी प्रश्न प्रत्येक उमेदवाराला विचारून, समिती आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करते. 

लष्कराच्या तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता असून, सध्या रिक्त असलेल्या जागा भरण्याची निकड आहे. परंतु, देशाच्या सुरक्षेची धुरा खांद्यावर वाहणारे सेनाधिकारी निवडताना, केवळ रिक्त जागा भरून काढण्यासाठी  निवडीचे निकष कधीही ढिले केले जात नाहीत. उमेदवारामधील अंगीभूत नेतृत्वगुण बारकाईने पारखून, ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये ते गुण ठराविक पातळीपेक्षा जास्त असतील अशांचीच निवड होते. दुर्दैवाने, सर्वांगीण विकास झालेल्या व्यक्तिमत्वाचे उमेदवार आजकाल SSBसमोर कमीच येतात. त्यामुळे, एकूण उमेदवारांच्या मानाने निवडल्या जाणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. त्याच कारणाने, एक नकारात्मक  प्रतिक्रिया ऐकायला मिळते की, 'SSB हा निव्वळ Rejection Board असतो'. पण वस्तुस्थिती अर्थातच तशी नाही. 

अशा या तंत्रशुद्ध आणि निष्पक्ष  निवडप्रक्रियेमध्ये यशस्वी होण्यासाठी उमेदवाराला काय काय करता येऊ शकेल हे आता पाहू.

"निवडप्रक्रियेत यशस्वी होण्यासाठी नेमके काय करावे?" 

हा प्रश्न नेहमी ऐकायला मिळतो. उत्तरादाखल काही गोष्टी  सांगता येतील. सर्वप्रथम, लेखी परीक्षेसाठी लागू असलेल्या विषयांचा अभ्यास पक्का करावा. सहसा, या परीक्षेतील प्रश्न केंद्रीय बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात. त्यामुळे त्या अभ्यासक्रमातील विषय नीट अभ्यासल्यास ही परीक्षा विशेष अवघड जात नाही. इंग्रजी भाषा, सामान्यज्ञान आणि गणित यांच्या तयारीवर विशेष भर द्यावा. अपेक्षित प्रश्नसंच इंटरनेटवर सापडतात. त्यांचा भरपूर सराव करावा. एक रणनीती आखून, सुनियोजित प्रयत्न केल्यास साधारण बुद्धिमत्तेचे उमेदवारदेखील ही लेखी परीक्षा पार करू शकतात. 

SSB चाचणीत यशस्वी होण्यासाठी मात्र, कुठलीही विशेष रणनीती अथवा चाचणीपूर्वी काही दिवस केलेला सराव उपयोगी का पडू शकत नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. 

प्रत्येक मनुष्याच्या व्यक्तिमत्वातले नेतृत्वगुण एकमेकांशी निगडित असतात, व त्यांची पातळी निव्वळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसते. घर, शाळा-कॉलेज, व्यवसाय, आणि इतरत्रही मिळालेल्या संधी व आलेली संकटे, या सर्वांमधून थोडेफार बरे-वाईट अनुभव माणसाला येत राहतात. या सर्वांमधून त्याचे व्यक्तिमत्व बदलत जाते, घडत आणि बिघडतदेखील राहते. SSB साठी येणारे उमेदवार कमीतकमी १८ वर्षांचे असतात. त्यांच्या घडणीच्या काळात, पालक व शिक्षकांनी जाणीवपूर्वक काही प्रयत्न केलेले असल्यास मुलांचे व्यक्तिमत्व बऱ्याच अंशी चांगले तयार झालेले असते.  SSB मध्ये ते व्यक्तिमत्व शास्त्रोक्तपणे व बारकाईने तपासले जात असल्याने, एखादी रणनीती वापरून, आपण जे नाही ते दाखवणे कोणालाही अशक्य असते. 

मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबनाची सवय, व वेगवेगळ्या गटांमध्ये मिळून-मिसळून काम करण्याची आवड लावल्यास मुलांमधले नेतृत्वगुण आपोआप विकसित होऊ लागतात. घरगुती समारंभाचे नियोजन, सांघिक खेळ, सार्वजनिक उत्सवामध्ये एखादी जबाबदारी, नाटक व वक्तृत्वस्पर्धांमध्ये सहभाग अशा साध्या गोष्टींमधून मुलांना व्यवहारज्ञान आणि प्रसंगावधान शिकवता येते. शाळा-कॉलेजमधल्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, खेळाच्या किवा कुठल्याही संघाचे नेतृत्व, तसेच NSS व NCCमधील अनुभव विशेष उपयोगी ठरतो. सहकार्याची,  संघभावनेची,  डोळसपणे निर्णय घेण्याची, आपले निर्णय सकारण पटवून देण्याची, आणि घेतलेल्या योग्य निर्णयावर ठाम राहण्याची मानसिकता मुलांमध्ये हळू-हळू विकसित होते. काही सुजाण पालक, डोळस शिक्षक व उच्च मूल्ये जपणाऱ्या शाळा, मुलां-मुलींचा व्यक्तिमत्वविकास जाणीवपूर्वक करतात. काही मुला-मुलींना घरच्या बिकट परिस्थितीमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते व त्यायोगेच त्यांचे व्यक्तिमत्व उत्तम प्रकारे घडत जाऊ शकते. 

ज्या विद्यार्थ्यांची घडण अशाप्रकारे झालेली नसेल, त्यांनी स्वतः मनाशी ठरवून, योग्य दिशेने प्रयत्न केल्यास, काही वर्षांत त्यांच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडणे शक्य आहे. स्वावलंबनाची व प्रत्येक काम पुढाकार घेऊन करण्याची सवय लावून घ्यावी. नवनवीन अनुभवांना आपणहून सामोरे जावे व त्या अनुभवाकडे डोळसपणे पाहून स्वतःच्या बुद्धीने त्यातून निष्कर्ष काढावे. आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याचा सराव करावा. उपलब्ध असलेली साधने कल्पकतेने वापरून, घेतलेले काम चिकाटीने साध्य करण्याचा ध्यास घ्यावा. शक्य असेल तिथे सामूहिक  कार्यक्रमात जबाबदारी उचलावी व उत्तम प्रकारे कामे पार पाडावी. प्रवास, चौफेर वाचन, तसेच सांघिक खेळांमध्ये व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग यांचाही खूप उपयोग होतो.  

"नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी काही क्लासेस लावावेत का?"

हा प्रश्नही नेहमी विचारला जातो. त्यावर इतकेच म्हणता येईल की, योग्य मार्गदर्शनाचा उपयोग निश्चितच होऊ शकतो. सुज्ञ प्रशिक्षक एखाद्याच्या व्यक्तिमत्वातील त्रुटी दाखवून, व्यक्तिमत्वविकासाबद्दल काही मौलिक सूचनाही करू शकतो. जी मुले नेतृत्वगुणांच्या अभावामुळे नव्हे तर भिडस्तपणामुळे व न्यूनगंडामुळे SSB चाचणीत उठून दिसत नाहीत आणि अयशस्वी ठरतात, त्यांना योग्य मार्गदर्शनाचा उपयोग निश्चित होतो. 

हे सर्व जरी खरे असले तरी, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, त्या-त्या वेळी आवश्यक असलेले प्रसंगावधान व व्यावहारिक हुशारी, कुठलाही क्लास थोडक्या काळात शिकवू शकत नाही. तसेच, काही क्लासेसमध्ये शिकवल्या जाणाऱ्या ठोकळेबाज 'युक्त्या' उमेदवारांसाठी घातक ठरू  शकतात. "अमुक परिस्थितीत असंच वागायचं, तमुक करायचं नाही" असे काही क्लासेसमधून पढवले जाते. परंतु, SSB चाचण्या घेण्याची पद्धत अतिशय शास्त्रशुद्ध असते आणि परीक्षक अत्यंत तरबेज असतात. 'दिखावा' किंवा 'मुखवटा' यांमागचे नैसर्गिक व्यक्तिमत्व त्यांना लक्ख दिसते. म्हणून, कृत्रिम वागणुकीचा फायदा तर होत नाहीच, पण प्रसंगी तोटाही होऊ शकतो. तेंव्हा, उमेदवारांसाठी मोलाचा सल्ला असा की SSB चाचणीत परीक्षकांना कृत्रिमपणे काहीतरी 'दाखवण्याची' चूक करू नये. समोर असलेल्या परिस्थितीत आपल्या नैसर्गिक घडणीनुसारच बोलावे आणि वागावे.
 
SSB विषयी प्रचंड प्रमाणात प्रसृत असलेले गैरसमज दूर होण्यासाठी काही गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहे: -
  • नेतृत्वगुण उठून न दिसल्याने एक-दोन वेळा अयशस्वी ठरलेले उमेदवार पुढे यशस्वी होऊही शकतात. 
  • उमेदवाराच्या सैनिकी कौटुंबिक पार्श्वभूमीचा सेनाधिकारी म्हणून निवड होण्याशी काहीही संबंध नसतो. 
  • केवळ सफाईदार इंग्रजी बोलणारे व शहरी भागातले उमेदवारच निवडले जातात असे मुळीच नाही.  
  • ओळख, वशिला किंवा लाच-लुचपतीने सेनाधिकारी म्हणून निवड होऊ शकत नाही.  
  • 'निवड करून देऊ' अशा भूलथापा देणाऱ्या एजंटांच्या जाळ्यात चुकूनही अडकू नये.     
समारोपात इतकेच सांगावेसे वाटते की SSB हा एक निष्कारण तयार झालेला 'बागुलबुवा' आहे. सेनाधिकारी म्हणून निवड होण्यासाठी आवश्यक त्या निकषांमध्ये बसण्याकरिता आपण काय करू शकतो हे जर नीटपणे ध्यानात घेतले आणि त्या दिशेने योग्य प्रयत्न वेळीच सुरु केले तर यशस्वी होणे अजिबात अवघड नाही.   


कर्नल.  आनंद भास्कर बापट (सेवानिवृत्त )

[लेखक SSB अलाहाबाद येथे चार वर्षे गट-परीक्षण अधिकारी (GTO) पदावर कार्यरत होते]