शनिवार, १९ मार्च, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग १

लिहायला सुरुवात करण्यापूर्वी मला भीती वाटत होती. कारण, "काश्मीरवरचा आणखी एक लेख? नकोच!" असे वाचकाला वाटणे स्वाभाविक आहे. पण, काश्मीरविषयी माझ्याकडे असलेली माहिती, आणि त्यावर आधारलेली माझी मते, मी स्वतंत्रपणे आणि निष्पक्षपणे व्यक्त केली पाहिजेत असे मला प्रकर्षाने वाटले. 


'काश्मीर फाइल्स' या सिनेमाने भारतीय समाजाच्या एका घटकाने भोगलेले अत्याचार आणि अवहेलना, यांच्या सत्यकथा आपल्याला दाखवल्या. तो सिनेमा त्या घटनांच्या कारणांची विस्तृत चर्चा करत नाही. तो सिनेमा "भाजप-कॉंग्रेस, डावे-उजवे, हिंदू-मुस्लिम, ब्राह्मण-ब्राह्मणेतर" असे वाददेखील उपस्थित करत नाही. म्हणूनच, त्या सिनेमाच्या अनुषंगाने, समाजमाध्यमांवर व्यक्त होत असलेले विचार, वाद-प्रवाद, आणि लोकांच्या प्रकट होणाऱ्या भावना वाचत असताना, माझ्या मनात राहून-राहून एक वाक्य घोळत होते.

"The truth lies somewhere between the reasons and the stories."

हेलन फ्रीमॉन्ट या लेखिकेच्या "आफ्टर लॉंग सायलेन्स" या पुस्तकातले हे वाक्य आहे. ते पुस्तक म्हणजे तिची स्वतःची कहाणी आहे, आणि योगायोग असा की त्या कहाणीला ज्यू लोकांच्या छळाची पार्श्वभूमी आहे!

काश्मीरची समस्या मोठी जटिल आहे. त्याचे सरळसोपे विश्लेषण किंवा कारणमीमांसा सहजी करता येणार नाही. कोणत्याही एका धर्माच्या किंवा राजकीय पक्षाच्या भूमिकेतून तर या समस्येला पाहणे अयोग्यच ठरेल. पण जेंव्हा-जेंव्हा काश्मीर प्रश्नावर चर्चा होते तेंव्हा, वेगवेगळे चष्मे घातलेले लोक फक्त १९ जानेवारी १९९० व त्यानंतरच्या घटनांचीच कारणमीमांसा करताना दिसतात. 

काश्मीरमधील दहशतवादाची सुरुवात १९८९-९० साली नव्हे, तर त्याच्या बरेच आधीपासून झालेली होती. मुळात, ही समस्या तब्बल काही शतके जुनी आहे. तेथपासून जर घटनांचा मागोवा आपण घेतला तर कदाचित या समस्येच्या 'हिमनगाचे टोक' सापडू शकेल!

ख्रिस्तपूर्व काळात अनेक शतकांपासून काश्मीरमध्ये विविध कला आणि ज्ञानाची उपासना होत होती. इसवी सन (इ.स.) १३०० पर्यंत तेथे अनेक हिंदू राजवटी होऊन गेल्या. मार्तंड मंदिर आणि शारदा पीठ ही हिंदू धर्माचीच नव्हे तर ज्ञानाचीही मंदिरे म्हणून प्रसिद्ध होती. १४व्या शतकाच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये अस्तित्वात असलेल्या हिंदू व बौद्ध धर्मांव्यतिरिक्त सूफी इस्लामचेदेखील तेथे आगमन  झालेले होते. 

बुलबुल शाह या सूफी संतांच्या शिकवणीने प्रभावित होऊन, रिनचेन नावाच्या एका लडाखी बौद्ध सरदाराने स्वेच्छेने इस्लामचा स्वीकार केला. त्याच्यापाठोपाठ इतर काही सरदारांनी व त्यांच्या प्रजेनेही इस्लाम स्वीकारला. सरदार रिनचेन उर्फ सद्र-उद-दीन हा अतिशय महत्वाकांक्षी होता. १३२० साली काश्मीर राज्यात अंतर्गत दुही माजल्यामुळे लोहार राजवटीचा राजा सहदेव हा राजधानी श्रीनगरमधून पळून गेला. त्या परिस्थितीचा फायदा घेऊन, रिनचेन उर्फ सद्र-उद-दीन हा काश्मीरच्या गादीवर बसणारा पहिला मुस्लिम राजा ठरला. काही वर्षातच त्याला हटवून सहदेवाची पत्नी कोटाराणीने राज्य सांभाळले. पण अखेर, १३३९ साली राज्याचा सेनापती शाह मीर याने सत्ता काबीज केली आणि शाहमीर राजवटीची सुरुवात झाली. 

याच शाहमीर राजवटीचा क्रूर सुलतान, सिकंदर 'बुतशिकन' (बुत+शिकन म्हणजे मूर्ति+भंजक) याने इस्लामेतर नागरिकांचे अनन्वित छळ सुरु केले. त्याने अनेकांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. मार्तंड मंदिर, शारदा पीठ आणि इतर अनेक मंदिरे उध्वस्त करून तेथील मूर्ती फोडल्या. काश्मिरात अलीकडे ऐकलेल्या "रालीव, त्सलिव या गलीव" या घोषणेची आणि दहशतकांडाचीही ती कदाचित पहिलीच घटना असेल. सुलतानाच्या दहशतीला कंटाळून अनेक काश्मिरी हिंदू व बौद्ध लोकांनी खोऱ्याच्या बाहेर पलायन केले. 

पुढील दोन शतके काश्मीरमध्ये सुलतानी राजवट राहिली. या राजवटीत, खोऱ्यामध्ये उरल्या-सुरल्या हिंदूंसोबत, शिया मुस्लिम, आणि सूफी शिकवणीचे अनुयायीदेखील मोठ्या प्रमाणात होते. १५ व्या शतकात सुलतान झैन-उल-अबेदीन याने मूळ काश्मिरी लोकांना अभय दिले, कला आणि ज्ञान टिकून राहावे यासाठी प्रयत्नही केले. पण, हळूहळू राजदरबारातील हिंदूची संख्या कमी झाली, राजभाषा संस्कृतचे उच्चाटन झाले, आणि फारसी हीच राजभाषा झाली. 

सोळाव्या शतकात काश्मीर खोरे मुघल बादशाह अकबरच्या ताब्यात गेले. मुघलांच्या सरदारांनी हिंदूच नव्हे, तर शिया मुस्लिम आणि सूफी संतांनाही 'सळो की पळो' करून सोडले. औरंगझेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य उतरणीला लागले. इ.स. १७५२ नंतरची ६०-६५ वर्षे काश्मीरवर अफगाणिस्तानच्या दुर्राणी राजवटीची सत्ता राहिली. त्या काळातही दहशत आणि छळामुळे हिंदूचे काश्मिरातून पलायन सुरूच राहिले.

पंजाबचा शीख राजा महानसिंग याने इ.स. १७८० मध्ये जम्मूचे डोग्रा राज्य ताब्यात घेतले होते. महान सिंगाचा मुलगा महाराजा रणजितसिंग याने इ.स. १८२० मध्ये काश्मीर खोरेही जिंकले. जम्मू आणि काश्मीरचा राज्यकारभार महाराजा रणजितसिंगाच्या वतीने हिंदू डोग्रा राजा गुलाबसिंग सांभाळू लागला. गुलाबसिंगाचा हिंदू डोग्रा सरदार झोरावर सिंग याने लडाख, गिलगिट, आणि बाल्टिस्तानही जिंकून शीख साम्राज्यात आणले. 

महाराजा रणजितसिंग सर्व धर्मांना समान वागणूक देत असला तरी, त्याच्या काळात मुस्लिमांचे महत्व निश्चितच कमी झाले.  श्रीनगरच्या जामा मशिदीला कुलुप ठोकले गेले. मशिदींमधून अझानची 'बांग' देण्यावर प्रतिबंध घातला गेला. त्या काळात हिंदू व शीख जनतेला पूर्वीपेक्षा जरा बरे दिवस पाहायला मिळाले हे खरे, पण एकंदरीत शीख राजवटसुद्धा दमनकारीच होती.
 
उत्तरेत हे सगळे घडत असताना, महाराष्ट्रामध्ये इंग्रजांनी पेशवाई बुडवून मराठा साम्राज्याचा अंत केला आणि भारतात आपली मुळे मजबूत रोवली. 

इ.स. १८४५ मध्ये फिरोझपूरच्या लढाईत इंग्रजांनी शिखांचा पराभव केला आणि जम्मूचे डोग्रा राज्यही ब्रिटिशांच्या अधीन गेले. 

शीख व ब्रिटिशांदरम्यान १८४६ साली अमृतसर येथे झालेल्या तहाद्वारे डोग्रा राजा गुलाब सिंग याने ब्रिटिशांना केवळ ७५ लाख रुपये देऊन त्यांच्याकडून काश्मीरचे खोरे विकत घेतले.
 
पाचशे वर्षांनंतर प्रथमच काश्मीरमध्ये हिंदू राजाची राजवट सुरु झाली !

त्यानंतर काय घडले?

(क्रमशः… भाग २...  पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

४० टिप्पण्या:

Abhay Bhat म्हणाले...

Anand. Very Good research. Sharp and crisp. Looking forward for part 2.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

Thanks, Abhay! 🙂👍

Swatee Bapat म्हणाले...

अभ्यासपूर्ण लेख!

Unknown म्हणाले...

खूप अभ्यास पूर्ण लेख.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙂🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

V.R.Kulkarni. म्हणाले...

चांगली माहिती दिलीत. पुढच्या भागाची वाट पहातोय. 🙏

नितीन चौधरी म्हणाले...

छान, इतिहास नीट समजुन घेतला पाहिजे पुढील ब्लॉग लवकर अपेक्षीत आहे

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद नितीन! 🙏

नीलिमा माईणकर म्हणाले...

आभ्यासपूर्ण आहेच लिखाणही अगदी मुद्देसूद आहे त्यामुळे सर्व घटना क्रमाक्रमाने डोळ्यासमोर उभ्या रहातात

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙂धन्यवाद 🙏

Jajabor म्हणाले...

very informative .

सुरेश भावे. म्हणाले...

छान माहिती. काही संदर्भ देता आले तर अधिक उपयुक्त.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

Pradip Narsale म्हणाले...

खूप छान माहिती दिलीत...अजून पुढचे भाग लवकरात लवकर मिळावे ही विनंती✌️

Ajit vaidya म्हणाले...

Very informative sir. One can make out your deep study and knowledge. Great quality

Gauri Milind Deshpande म्हणाले...

आपण फार चांगली माहिती दिली आहे . इतिहास हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मी इतर देशांच्या इतिहासाबद्दल सुद्धा वाचते , संदर्भ शोधते . मात्र आपल्याच देशाच्या एका महत्वपूर्ण भागाच्या इतिहासाबद्दल मला काहीही माहित नव्हते हे आपल्या लिखाणावरून कळले आणि जबर धक्का बसला , लाजही वाटली . आता याबद्दल अधिक जाणून घेणे आवश्यक वाटते आहे . पुढील लिखाणाची वाट बघते आहे . मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏼

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

1. KASHMIR: A TRAGEDY OF ERRORS
By Tavleen Singh
2. My Frozen Turbulence in Kashmir
By Jagmohan
आणखीही नंतर सांगू शकेन.

धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

अवश्य. 🙂
धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

अवश्य 🙂.
मीही तुमच्यासारखाच विद्यार्थी आहे.
या निमित्ताने संदर्भ शोधून लिखाण केले इतकेच.
आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏

Unknown म्हणाले...

Anand,
Very short but precise/ crisp write up on decades old kashmiri history.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

Thanks.🙏
Your comment figures here as 'Unknown'.
Who's this?

Unknown म्हणाले...

खुप माहिती पूर्ण लेख. हिंदूंचा काश्मीर मधील इतिहास कळतो. कश्यप ऋषी ंच्या नावावरून काश्मीर. हो ना?

Sneha desai म्हणाले...

अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
हा इतिहास काहीच माहीत नव्हता.
पुढील भागाची उत्सुकता आहे.
धन्यवाद!

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙂 प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

Unknown म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Subhash Joshi म्हणाले...

पुढील लेखमालेची प्रतीक्षा आहे

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙏धन्यवाद

rsb म्हणाले...

Quite an eye opener and details are given in brief

Unknown म्हणाले...

विस्तृत अन् विश्लेषणात्मक लेखन ...आनंदजी खूप छान

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद रवि! 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

अनामित म्हणाले...

अतिशय छान माहिती

Unknown म्हणाले...

माहिती खूप अभ्यास पूर्ण आहे.एकंदरीत मुस्लिमांनी बरेच वर्ष काश्मीरवर राजवट चालविली.पण त्यावेळीही हिंदू मुस्लिमांना पदच्युत करण्यात कमी पडले.पण आता जागृत झाले आहेत हक्कासाठी भांडण्या इतपत जागृत झाले आहेत पण तरीही 100 टक्के हिंदू साम्राज्य होणे अवघड वाटत नाही का?

Unknown म्हणाले...

पुढील भाग जरूर पाठव

Ashish Li म्हणाले...

सर, लेख अप्रतिम आहेत त्याबद्दल प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. पण या लेखाच्या शेवटी पुढील भागांच्या लिंक नाहीत त्यामुळे पुढं पुढं वाचत जाण अवघड जाते आहे. कृपया ती सुविधा दयावी ही विनंती 🙏🙏

ADV. GIRISH GODBOLE म्हणाले...

Good beginning of the Kashmir che Ashru Series.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏
ब्लॉगच्या मुख्यपृष्ठावर गेल्यास सर्व लेख ओळीने वाचता येतील.