"वीर मरणाचं मोल…" हा लोकसत्तेतला गिरीश कुबेरांचा लेख वाचला. माहिती व ज्ञानाचे अमाप भांडार कुबेराघरी आहे यात शंका नाही. परंतु, हा वरकरणी माहितीपर लेख वाटला तरी त्यातला गर्भित उपरोध लक्षात येण्याकरिता लागणारी माफक हुशारी काही थोड्या वाचकांकडे असू शकते हे कुबेर विसरले असावेत. किंवा, आपल्या साहित्यिक शैलीने आपण त्यांना भुलवून टाकू शकू असा भ्रम त्यांना झाला असावा. देशद्रोहाच्या आरोपाखाली देहदंडाची शिक्षा झालेल्या मीर तोबिआन्स्की या इस्राएली लष्करी अधिकाऱ्याच्या दुःखद सत्यकथेची पार्श्वभूमी वापरून लिहिलेल्या या लेखाचा रोख मुख्यत्करून, 'देहदंडाची शिक्षा असावी अथवा नसावी' या मुद्द्यावर आहे. परंतु कुबेरांनी काही तपशील अर्धवट आणि गुळमुळीतपणे लिहिल्याने सामान्य वाचकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे. म्हणून काही मुद्दे मांडावेसे वाटतात.
- लेखाच्या सुरुवातीला इस्राएलच्या 'कडव्या राष्ट्रवादावर' आणि त्या 'राष्ट्रवादाच्या' नावाखाली 'मनमानी करणाऱ्यांवर' कुबेरांनी आसूड ओढले आहेत. असे करण्याचे त्यांना काहीच कारण नव्हते. त्याउलट, इस्राएलच्या तुलनेत किमान १% राष्ट्रवाद जरी भारतीयांमध्ये जागृत करता आला तर आपले किती भले होईल हे त्यांनी मांडायला हवे होते. पण तसे केल्यास, आज भारतीयांमध्ये राष्ट्रवाद जागवू पाहणाऱ्या सरकारच्या बाजूने बोलल्यासारखे झाले असते. तेच नेमके त्यांना होऊ द्यायचे नसावे!
- मीर तोबिआन्स्की या अधिकाऱ्याला देहदंड सुनावण्यात, आणि काही वैयक्तिक कारणांसाठी तो तडकाफडकी अमलात आणण्यामागे, इस्सार बीरी नावाच्या इस्राएली लष्करी गुप्तचर विभागप्रमुखाचा मुख्य हात होता. कोर्ट मार्शलचा निव्वळ देखावा करून, आपले म्हणणे रीतसर मांडण्याची संधीही न देता मीरला ठार केले गेले. असे करणे लष्करी कायद्यान्वयेदेखील गैरच होते. या बेकायदेशीर कृत्त्याबद्दल इस्सार बीरीवर काहीच कारवाई झाली नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे हेही नक्की. मात्र, कोर्ट मार्शल म्हणजे, कोर्ट-कचेऱ्या, वकील, साक्षी-पुरावे वगैरे टाळून देहदंडाची शिक्षा ठोठावता येईल अशी, एखादी झटपट न्यायप्रक्रिया असते, असा सूर या लेखातून उमटला आहे. तसे मुळीच नसते, हे सव्वीस वर्षे लष्करी अधिकारी म्हणून काम केल्यामुळे मी छातीठोकपणे सांगू शकतो. लष्करी न्यायप्रक्रिया जलद असली तरी त्यामध्ये नैसर्गिक न्यायाची तत्त्वे पायदळी तुडविली जात नाहीत हे सामान्य वाचकाला या लेखातून समजणे गरजेचे होते.
सरतेशेवटी, देहदंडाची शिक्षा रद्द करणाऱ्या, तथाकथित 'मानवतावादी' इस्राएलची भलावण करणाऱ्या कुबेरांना, इस्राएलच्या हल्ल्यांमध्ये ठार झालेल्या हजारो निरपराध पॅलेस्टीनी नागरिकांचा विसर पडलेला दिसतो!
तेंव्हा, राष्ट्रवाद आणि देहदंडाची शिक्षा अशा दोन स्वतंत्र विषयांची सांगड या लेखात घालून वाचकांची दिशाभूल करण्याचा आणि स्वतःचा छुपा अजेंडा त्यांच्या गळी उतरविण्याचा कुबेरांचा प्रयत्न होता असेच वाटते.
- कर्नल आनंद बापट
- कर्नल आनंद बापट