गुरुवार, ३१ मार्च, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग ७

#काश्मीरचे_अश्रू 

(भाग  नंतर पुढे चालू...)

१९३४ सालच्या प्रजासभा निवडणुकीतील यशानंतर, 'शेर-ए-काश्मीर' शेख अब्दुल्लांनी, स्वतःच्या विचारसरणीनुसार काश्मीरची राजकीय घडी बसवण्यास सुरुवात केली.

शेख अब्दुल्लांची राजकीय चळवळ मूलतः, काश्मीरमधल्या पीडित, शोषित, जनतेच्या उत्थानासाठी सुरु झाली होती. अर्थातच, राजा व त्याच्या अधिकाऱ्यांकडून या चळवळीला विरोध होत होता. परंतु, विशेष म्हणजे, श्रीमंत व्यापारी आणि एकूणच, काश्मिरी सरंजामशाहीचे सर्व प्रतिनिधी, या चळवळीच्या विरोधात राजाला साथ देत होते. हिंदू जहागीरदारांसोबतच, श्री. नाझीर हुसेन, राजा विलायत खान, श्री. अक्रम खान, यासारखे मुस्लिम जमीनदारदेखील शेख अब्दुल्लांच्या चळवळीला विरोध करीत होते. १९३२ नंतर, मिरवाईझ मोहम्मद युसूफ शाहदेखील शेख अब्दुल्लांच्या विरोधात काम करू लागले. या विरोधामुळे वैतागून एकदा शेख अब्दुल्ला म्हणाले होते, "काश्मीरमध्ये एकूण किती हरीसिंग आहेत, कोण जाणे? एक हरीसिंग तर स्वतः महाराजच आहेत, दुसरे हरीसिंग म्हणजे इथले सधन लोक, आणि तिसरे हरीसिंग आहेत आमचे मिरवाईझ मोहम्मद युसूफ शाह!"

१९३५ साली, शेख अब्दुल्ला आणि पंडित प्रेमनाथ बजाज यांनी मिळून, 'हमदर्द' नावाचे एक साप्ताहिक काढले. राजकीय चळवळीमध्ये मुस्लिमांसोबतच हिंदू आणि शिखांचाही सहभाग असावा याकरिता त्या दोघांचेही प्रयत्न होते. कट्टरपंथी मुसलमानांच्या विरोधात असलेले, डाव्या विचारसरणीचे मुस्लिम विद्यार्थीही हळूहळू शेख अब्दुल्लांकडे आकर्षित होऊ लागले. त्याच वर्षी, काँग्रेस पक्षाचे काश्मिरी नेते श्री. सैफुद्दीन किचलू यांनी श्रीनगरमध्ये येऊन शेख अब्दुल्लांची भेट घेतली. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत, श्रीनगरमध्ये प्रथमच 'गांधीजी झिंदाबाद' च्या घोषणा ऐकू आल्या. 

शेख अब्दुल्लांना राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीकडे आकर्षित करण्यासाठी, १९३६ साली पंडित नेहरूंनी श्री.पुरुषोत्तम दास टंडन यांना शेख अब्दुल्लांच्या भेटीसाठी काश्मीरमध्ये पाठवले. त्याच वर्षी, श्री. प्रेमनाथ बजाज यांनी 'काश्मीर यूथ लीग' ही संस्था स्थापन केली.  केवळ काश्मीरच्याच नव्हे तर, संपूर्ण भारताच्या राजकीय परिस्थितीविषयी चर्चा, 'काश्मीर यूथ लीग' मध्ये होत असत. त्यायोगे, काश्मीरमध्ये हिंदू, मुस्लिम आणि शीख विद्यार्थ्यांची एक नवी, शिक्षित, आणि प्रेरित पिढी तयार करण्याचे काम होऊ लागले. 

१९३७ साली, 'ऑल काश्मीर स्टूडन्ट्स फेडरेशन'ची स्थापना झाली. पंडित काशीनाथ बामझाई हे त्याचे पहिले अध्यक्ष होते आणि मोहम्मद सुलतान हे सचिव होते. सर्व धर्मातील तरुणांना सुजाण नागरिक बनवणे, आणि त्यांच्या राजकीय व सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणे ही या संघटनेची प्रमुख उद्दिष्ट्ये होती. त्याच वर्षी, वायव्य सरहद्द प्रांतामधले लोकप्रिय काँग्रेस नेते, खान अब्दुल गफ्फार खान यांनी काश्मीरमध्ये येऊन शेख अब्दुल्लांची भेट घेतली. हळूहळू शेख अब्दुल्ला काँग्रेसच्या विचारसरणीकडे झुकू लागले होते. १९३७ साली, लाहोर रेल्वे स्टेशनवर पंडित नेहरूंसोबत झालेली त्यांची पहिली भेट, ही एका दीर्घकालीन मैत्रीपर्वाची सुरुवात ठरली. 

१९३८ साली नेहरूंनी शेख अब्दुल्लांना सुचवले की, मुस्लिम कॉन्फरन्स संघटनेचे नाव बदलल्यास तिला आपोआप धर्मनिरपेक्ष रूप मिळेल आणि संघटना अधिक सशक्त होईल. या सूचनेने प्रभावित होऊन शेख अब्दुल्लांनी आपल्या पक्षापुढे नामबदलाचा प्रस्ताव ठेवला. अर्थातच, पक्षातील कट्टरपंथी नेत्यांना तो विचार पसंत पडला नाही. "काँग्रेससोबत राजकीय सौदेबाजी करून, शेख अब्दुल्ला काश्मिरी मुसलमानांच्या हिताशी प्रतारणा करीत आहेत" असे आरोप त्यांच्यावर झाले. परंतु, १२ जून १९३९ च्या विशेष अधिवेशनामध्ये, 'मुस्लिम कॉन्फरन्स' पक्षाचे, 'जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स' असे नवीन नामकरण झाले. 

दरम्यान, १९३८ साली काश्मीर प्रजासभेची दुसरी निवडणूक झाली. पक्षाचे नवीन नाव, आणि धर्मनिरपेक्षतेच्या घोषणेसह शेख अब्दुल्ला निवडणुकीत उतरले. त्यांच्या पक्षाने लढलेल्या सर्वच्यासर्व १९ जागांवर त्यांनी यश मिळवले. पुढे दोन अपक्ष उमेदवारदेखील 'नॅशनल कॉन्फरन्स'मध्ये सामील झाले. 

'ऑल इंडिया स्टेट पीपल्स कॉन्फरन्स' ही भारतातल्या सर्व संस्थानांमधील राजकीय पक्षांची एक संघटना होती. १९३९ साली, शेख अब्दुल्लांचा 'नॅशनल कॉन्फरन्स' पक्ष त्या संघटनेमध्ये सामील झाला. शेख अब्दुल्लांना आणि 'नॅशनल कॉन्फरन्स' पक्षाला राष्ट्रीय स्तरावर ओळखले जाऊ लागले. 

मात्र, पक्षाच्या या नवीन रूपामुळे, 'नॅशनल कॉन्फरन्स' मध्ये बरीच पडझड झाली. संस्थापक सदस्य, चौधरी गुलाम अब्बास यांनी जरी नामबदलाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला असला तरी त्यांना शेख अब्दुल्लांची धर्मनिरपेक्षतेची भूमिका पसंत नव्हती. ते हळूहळू 'मुस्लिम लीग' च्या प्रभावाखाली येऊ लागले होते. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून, शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या पक्षाचे दुसरे मोठे संस्थापक सदस्य, मिरवाईझ मुहम्मद युसूफ शाह यांच्यादरम्यान असलेले वादही याच सुमारास विकोपाला गेले.

शेख अब्दुल्लांनी आपल्या पक्षाची विचारसरणी धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांतावर उभी केलेली असली तरी, व्यक्तिशः त्यांना आपल्या धर्माचा अभिमान होताच. त्यांच्या पक्षातील काही मुस्लिम नेत्यांनी त्यांना याविषयी विचारले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते, "मी सर्वप्रथम मुसलमान आहे, आणि अखेरपर्यंत राहीन." 

१९४० साली, 'ऑल इंडिया मुस्लिम लीग' च्या लाहोर अधिवेशनामध्ये एक महत्वपूर्ण ठराव केला गेला. त्यामध्ये प्रथमच स्पष्टपणे मागणी केली गेली की, भारताच्या उत्तरेला, वायव्येला आणि पूर्वेकडे असलेल्या सर्व मुस्लिम-बहुल प्रदेशांना, 'मुस्लिमांची मायभूमी' म्हणून, स्वतंत्र आणि सार्वभौम राज्यांचा दर्जा देण्यात यावा, आणि भारतीय गणराज्यामधून या प्रदेशांना वेगळे काढले जावे. 'पाकिस्तान' या शब्दाचा उल्लेख या ठरावात नसला तरी, इतिहासात तो 'पाकिस्तान ठराव' म्हणूनच ओळखला जातो. 

'पाकिस्तान ठराव' झाल्यानंतर, काश्मीरला आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न मुस्लिम लीगने सुरु केले. शेख अब्दुल्ला, मुस्लिम लीगच्या या 'द्विराष्ट्रवाद' सिध्दांताचा जाहीरपणे विरोध करीत राहिले. कदाचित, काश्मीरला आणि तेथील लोकांना 'काश्मिरियत' द्वारे मिळणारी स्वतंत्र ओळख पाकिस्तानमध्ये पुसली जाण्याची भीती त्यांना वाटत असावी.   

शेख अब्दुल्लांची मुस्लिमांमधील लोकप्रियता कमी करण्याच्या हेतूने, जिन्ना स्वतः १९३६ साली काश्मीरमध्ये येऊन गेले होते. त्यापूर्वीच 'ऑल इंडिया मुस्लिम लीग' ची शाखा काश्मिरात स्थापन झालेली होती. त्या काळात अजूनही मुस्लिम कॉन्फरन्सचेच सदस्य असलेल्या चौधरी गुलाम अब्बास यांना मुस्लिम लीगच्या विचारसरणीकडे खेचण्यात जिन्ना यशस्वी झाले होते. अखेर, १९४१ साली चौधरी गुलाम अब्बास 'नॅशनल कॉन्फरन्स' मधून बाहेर पडले आणि त्यांनी जुन्या 'ऑल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' चे पुनरुज्जीवन केले. शेख अब्दुल्लांच्या धर्मनिरपेक्षतेच्या मुद्दयाला शह देण्यासाठी, 'ऑल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' जम्मू प्रदेशात सक्रिय झाली.

स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची कल्पना काश्मीरमध्ये लोकप्रिय करण्याच्या हेतूने, १९४४ साली जिन्ना काश्मीरच्या दौऱ्यावर आले. शेख अब्दुल्ला, तसेच त्यांच्या पक्षाबाहेरील इतर समविचारी मंडळींनीही जिन्नांच्या प्रचाराचा कडाडून विरोध केला. परंतु, अनेक काश्मिरी नेते पाकिस्तानसोबत जाण्यास उत्सुक झाले होते. 

एप्रिल १९४४ मध्ये शेख अब्दुल्लांनी राजासमोर 'नया काश्मीर' नावाचा एक प्रस्ताव ठेवला. सोविएत रशियामध्ये १९३६ साली अमलात आलेले 'स्टालिन संविधान' हे त्या प्रस्तावामागची मूळ प्रेरणा होते. अर्थातच, 'डाव्या' विचारसरणीच्या काही नेत्यांनी शेख अब्दुल्लांना ती संकल्पना सुचवली होती. लाहोरमध्ये कार्यरत असलेल्या अनेक साम्यवादी नेत्यांनी तो प्रस्ताव बनवण्यात आपले योगदान दिले होते. परंतु, तो  प्रस्ताव लिहिण्याचे काम मुख्यत्वे ज्या शीख दांपत्याने केले, ते होते बाबा प्यारेलाल सिंग बेदी आणि त्यांची ब्रिटिश पत्नी सौ. फ्रेडा बेदी. (अभिनेता कबीर बेदी याचे आई-वडील) !

काश्मीरमधील तत्कालीन परिस्थितीच्या तुलनेमध्ये, 'नया काश्मीर' हा प्रस्ताव अतिशय दूरगामी आणि युगप्रवर्तक म्हणता येईल असाच होता. 

काय होता हा प्रस्ताव? 


(क्रमशः)
(भाग ८ पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मंगळवार, २९ मार्च, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग-६

#काश्मीरचे_अश्रू 

(भाग ५ नंतर पुढे चालू...)


१९३० चे दशक काश्मीरच्या राजकीय घडणीकरिता अतिशय महत्वाचे ठरले. 

१९३२ साली शेख अब्दुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली 'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' या राजकीय पक्षाची स्थापना झाली. काश्मीरचे तत्कालीन मिरवाईझ, मौलाना मोहम्मद युसूफ शाह यांच्या भक्कम पाठिंब्यावरच शेख अब्दुल्लांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती. पण हळूहळू त्यांच्यामधील वैचारिक मतभेदांमुळे त्यांचे परस्परसंबंध बिघडत गेले. भविष्यात काश्मीरमध्ये फोफावलेल्या कट्टर इस्लामवादाची पाळे-मुळे, काही अंशी त्या मतभेदांमध्ये सापडतात.  

'मिरवाईझ' हे अनुवांशिक, धार्मिक पद फक्त काश्मिरी मुस्लिम समाजातच अस्तित्त्वात होते. काश्मिरी जनतेमध्ये या पदाला पूर्वीपासूनच खूप मान होता. १८९० ते १९०९ या काळात मिरवाईझ असलेले मौलाना गुलाम रसूल शाह, हे प्रगत विचारसरणीचे होते, आणि सामान्य मुस्लिम जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय होते. राजाचे व त्यांचे संबंधही सलोख्याचे होते. मुस्लिम जनतेसाठी आधुनिक शिक्षण, आणि मुस्लिम समाजसुधारणा यांवर त्यांनी नेहमीच भर दिला. 

एकोणिसाव्या शतकाच्या अंतापर्यंत बहुसंख्य काश्मिरी मुसलमान अशिक्षित होते. काही लोक मदरशांमध्ये, केवळ धार्मिक शिक्षण घेत असत. इंग्रज मिशनरींनी काश्मीरमध्ये काही प्राथमिक शाळा सुरु केल्या असल्या तरी त्यामध्ये उच्चभ्रू कुटुंबातील मुलेच जात असत. मिरवाईझ मौलाना गुलाम रसूल शाह यांनी १८९९ साली मुसलमानांसाठी पहिली प्राथमिक शाळा चालू केली. त्याचेच रूपांतर १९०५ साली 'इस्लामिया हायस्कूल' मध्ये झाले. या शाळेसाठी त्यांनी राजाकडून अनुदानही मिळवले. पुढे शेख अब्दुल्लांचे माध्यमिक शिक्षण त्याच शाळेत झाले. 

पण, मिरवाईझ मौलाना गुलाम रसूल शाह अल्पायुषी होते. १९०९ साली त्यांचा मृत्यू झाला तेंव्हा त्यांचा मुलगा  मोहम्मद युसूफ शाह केवळ ९-१० वर्षांचाच होता. त्यामुळे, १९३१ सालापर्यंत, गुलाम रसूल शाह यांच्या भावाने 'मिरवाईझ' हे पद सांभाळले. त्यांनीही मौलाना रसूल शाह यांचेच धोरण पुढे चालू ठेवले. त्यामुळे, हळूहळू मुसलमानांची प्रगती होत राहिली. राज्यातील अल्पसंख्य हिंदू प्रजेसोबत सर्वसामान्य मुस्लिमप्रजेचे संबंधही शांतीपूर्णच होते. 

मोहम्मद युसूफ शाह १९३१ साली काश्मीरचे मिरवाईझ बनले. त्यांचे सुरुवातीचे धार्मिक शिक्षण उत्तर प्रदेशात, देवबंद येथील 'दार-उल-उलूम' मध्ये झाले होते. त्या संस्थेत, कट्टर 'वहाबी' इस्लामची शिकवण मिळत असे. वहाबी शिकवणीनुसार, दर्ग्यांमध्ये जाणे, कबरींवर नतमस्तक होणे, सूफी संतांची प्रवचने ऐकणे, सूफी भक्तिसंगीत गाणे-ऐकणे, अशा सर्व गोष्टी इस्लाममध्ये वर्ज्य होत्या. 'अहमदिया', 'इस्माइली', वगैरे इस्लाम धर्माच्याच इतर पंथांना ते गैर-इस्लामी मानत असत. 

दार-उल-उलूम देवबंद मधून शिकून बाहेर पडल्यानंतर मोहम्मद युसूफ शहांनी लाहोरच्या पंजाब विद्यापीठातून 'मौलवी फाझिल' ही पदवी प्राप्त केली होती. ज्या प्रकारचे शिक्षण त्यांना मिळाले होते त्यानुसार, मिरवाईझ मौलाना मोहम्मद युसूफ शाह हे मध्ययुगीन इस्लामच्या चालीरीतींना मानत होते. सामाजिक बदल, आणि  'प्रगतिशील'  इस्लामची कल्पना त्यांना पसंत नव्हती. तसेच, गैर-इस्लामी लोकांविरुद्ध त्यांची भूमिका उघड-उघड आक्रमक जरी नसली तरी, केवळ काश्मिरी मुस्लिम लोकांचे हित, आणि मुस्लिम धर्माचे वर्चस्व, हेच त्यांच्या दृष्टीने सर्वाधिक  महत्वाचे होते. 

चौधरी गुलाम अब्बास हेहीदेखील कट्टर मुसलमान होते. पण काश्मीरपेक्षा, जम्मू प्रदेशातील मुस्लिमांच्या हिताचा विचार त्यांच्याकरता अधिक महत्वाचा होता. कदाचित, या दोन्ही कट्टरपंथी मुस्लिम नेत्यांच्या नजरेसमोर, कवि 'अल्लामा' मुहम्मद इक्बाल यांचा आदर्श असावा. कारण, त्याच काळात, म्हणजे डिसेंबर १९३० मध्ये अलाहाबाद येथे पार पडलेल्या 'मुस्लिम लीग' च्या अधिवेशनात, अल्लामा इकबाल यांनी भारतातील मुसलमानांसाठी स्वतंत्र देशाची कल्पना सर्वप्रथम मांडली होती. 

'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' पक्षाच्या या दोन्ही वरिष्ठ नेत्यांशी शेख अब्दुल्ला सहमत नव्हते. त्यांच्या मते, पक्ष फक्त मुस्लिमांच्याच नव्हे तर, समस्त काश्मिरी जनतेच्या नेतृत्वासाठी कटिबद्ध होता. काश्मीरमधील हिंदू नेते पंडित प्रेमनाथ बजाज यांच्यासोबत शेख अब्दुल्लांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. काँग्रेसची विचारसरणी व नेहरूंच्या व्यक्तिमत्वाचाही त्यांच्या मनावर पगडा होता. काश्मीरमधील अहमदिया मुस्लिमांसोबत शेख अब्दुल्लांचा सलोखा होता. शेख अब्दुल्लांचे हे विचार आणि वागणूक त्यांच्या पक्षातील सुन्नी मुस्लिम नेत्यांच्या डोळ्यात सलत होते. 

मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या, मायकल हॅरी नेडू नावाच्या एका इंग्रज माणसाच्या मुलीशी १९३३ साली शेख अब्दुल्लांनी केलेला विवाह, त्यांच्या विरोधकांच्या पचनी पडणे अवघडच होते. 

एकीकडे, "कट्टर मुस्लिम नेत्यांची विचारसरणी सामान्य जनतेच्या हिताची नसून, फक्त समाजातील उच्चवर्गीय मुस्लिमांनाच धार्जिणी आहे", असे शेख अब्दुल्ला आपल्या जाहीर भाषणात सांगत होते. त्याउलट, "मिरवाईझ यांचे विचार न मानणारे लोक मुसलमानच नव्हेत" असे वक्तव्य खुद्द मिरवाईझ यांनीच केले होते. चौधरी गुलाम अब्बास,  मिरवाईझ मुहम्मद यसुफ शाह आणि त्यांच्या समर्थकांनी उघडपणे शेख अब्दुल्लांचा विरोध सुरु केला. पक्षाच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या विचारसरणीमधील मूलभूत फरकांमुळे, 'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' पक्षामध्ये हळूहळू फूट पडू लागली.

१९३४ साली झालेल्या प्रजासभा निवडणुकीमध्ये शेख अब्दुल्लांनी जोरदार प्रचार केला. 'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' मधून फुटलेले बंडखोर उमेदवार हरले, आणि श्रीनगरमधील सर्व जागा शेख अब्दुल्ला गटाने जिंकल्या. मिरवाईझ युसुफ शहांसारख्या कट्टर धर्मगुरूंचा प्रचंड प्रभाव जनतेवर असूनही त्यांच्या समर्थकांऐवजी, काश्मिरी जनतेने शेख अब्दुल्लांच्या बाजूने कौल दिला ही बाब अतिशय लक्षणीय होती. त्यामुळेच, 'शेर-ए-काश्मीर' हा खिताब शेख अब्दुल्लांकडे आपोआप चालत आला!  

१९३४ नंतर शेख अब्दुल्ला आणि त्यांच्या काही समविचारी मित्रांनी मिळून, जम्मू-काश्मीरच्या विचारधारेला एक निश्चित दिशा देण्याचे काम सुरु केले...   
   

(क्रमशः)
(भाग  पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

रविवार, २७ मार्च, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग-५

#काश्मीरचे_अश्रू

(भाग  नंतर पुढे चालू...)

१३ जुलै १९३१ च्या घटनेने काश्मीरमधील वातावरण आमूलाग्र बदलले. शेख अब्दुल्लासह इतर नेत्यांना काश्मिरी जनतेला राजाविरुद्ध उठवून उभे करायचे होते. परंतु, एप्रिल ते जुलैदरम्यान ज्या घटना घडत गेल्या त्यांचे परिणाम हळू-हळू त्या नेत्यांच्या नियंत्रणाबाहेर गेले. 
राजा हरिसिंग हा अतिशय स्वतंत्र बाण्याचा राजा होता. इंग्रजांचा हस्तक्षेप त्याला नेहमीच जाचक होत असे. पण, १८४६ च्या अमृतसर तहापासूनच, इंग्रजांनी काश्मीरचा राजा त्यांच्या ऐकण्यात राहील अशी व्यवस्था केलेली होती. शिवाय, काश्मीरच्या वायव्य दिशेला वाढत चाललेला रशियन साम्राज्याचा धोका, इंग्रजांच्या दृष्टीने, काश्मिरी जनतेच्या हितापेक्षा अधिक महत्वाचा होता. जनतेच्या नाराजीमुळे काश्मीरची राजगादी डळमळीत होणे इंग्रजांना परवडणार नव्हते. त्यामुळे, काश्मीर राज्यातल्या गैरकारभारावर इंग्रज सरकार बारीक लक्ष ठेऊन होते. 

श्रीनगरमधील गोळीबाराची घटना, आणि राजाविरुद्ध मुस्लिम नेत्यांनी दिलेल्या लेखी तक्रारींवर इंग्रज सरकारने कारवाई करण्याचे ठरवले. त्यांच्या दृष्टीने बहुसंख्य मुस्लिम जनतेला चुचकारणे सोयीचे होते. मात्र, राजा हरिसिंगाविरुद्ध टोकाची पावले उचलणेदेखील अवघड होते. कारण, काश्मिरातल्या त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपाबद्दल बिकानेरचे महाराज आणि भोपाळच्या नवाबांनी इंग्रज सरकारकडे आपली नाराजी स्पष्ट शब्दात पूर्वीच व्यक्त केलेली होती. भारतात स्वातंत्र्यलढ्याने जोर धरलेला असताना, अशा कठीण काळात भारतीय संस्थानिकांचाही रोष पत्करणे इंग्रजांना जड गेले असते. त्याशिवाय, हिंदुमहासभेचे अध्यक्ष डॉ. मुंजे यांनी तर राजा हरिसिंगाच्या समर्थनार्थ इंग्रजांविरुद्ध आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. 

अशा परिस्थितीत, इंग्रजांनी एक सावध खेळी केली. त्यांनी राजालाच अशी शिफारस केली की, काश्मीर राज्यातील प्रशासनपद्धतीमध्ये योग्य बदल सुचवण्यासाठी राजानेच एक अभ्यास-समिती नेमावी. निष्पक्षपणे अभ्यास व्हावा म्हणून, काश्मीर मंत्रिमंडळाचेच एक माजी इंग्रज सदस्य आणि वित्त सल्लागार, श्री. बर्ट्रांड ग्लॅन्सी यांना समितीचे अध्यक्ष नेमावे, आणि जम्मू व काश्मीरच्या हिंदू-मुस्लिम समाजातील प्रत्येकी एक-एक सन्माननीय व्यक्ती सदस्य म्हणून समितीत असावी असेही इंग्रजांनी सुचवले. राजा हरिसिंगाने इंग्रजांची ही शिफारस मान्य केली. 

ग्लॅन्सी समितीमध्ये नेमलेल्या हिंदू आणि मुस्लिम सदस्यांचा परस्परांवर विश्वास नव्हता. समितीच्या गठनालाच हिंदू समाजाचा तीव्र विरोध असल्याने, जम्मूचे हिंदू प्रतिनिधी, श्री. लोकनाथ शर्मा यांनी समितीच्या कामकाजात सहभागी होण्यास नकार दिला. काश्मीरचे हिंदू प्रतिनिधी, श्री.प्रेमनाथ बजाज यांनी मात्र समितीतून राजीनामा दिला नाही. 

मुस्लिमांना जाचक वाटणारे काही नियम-कायदे त्वरित रद्द झाल्याशिवाय समितीचे काम सुरु होऊ नये, यासाठी काही मुस्लिम नेत्यांचा प्रचार सुरू होता. त्यामुळे, समितीमधील मुस्लिम सदस्यांनीही आपले अंग काढून घेतले. राज्याबाहेरील एखादया मुस्लिम व्यक्तीला ग्लॅन्सी समितीवर नेमण्याची शेख अब्दुल्ला यांची शिफारस मान्य करण्यात आली नाही.

हिंदुमहासभेचे अध्यक्ष श्री. मुंजे यांनी, हिंदूंच्या हक्करक्षणासाठी काश्मिरात येऊन प्रचार करण्यासाठी मागितलेली परवानगीही राजाने नाकारली. मात्र, राज्यातील समस्यांबद्दल स्वतंत्रपणे मते मांडण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद आणि सर तेज बहादूर सप्रू या भारतीय नेत्यांना काश्मिरात बोलावले. 

अशा अनिश्चित वातावरणामध्ये श्री. बर्ट्रांड ग्लॅन्सी यांनी स्वतः समितीचे काम नेटाने पुढे रेटले. त्यांनी दोन्ही समाजाची गाऱ्हाणी ऐकली, आणि मार्च १९३२ मध्ये आपला अहवाल सादर केला. काश्मीरच्या राजकीय भविष्यावर अतिशय दूरगामी परिणाम करणाऱ्या काही शिफारसी ग्लॅन्सी समितीने केल्या: -
  • सरकारने अधिग्रहण केलेली मुस्लिम धार्मिक स्थळे मुस्लिम समाजाच्या ताब्यात द्यावीत. 
  • मुसलमानांना शिक्षणसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक विशेष अधिकारी नियुक्त करावा. 
  • नोकऱ्यांसाठीच्या अर्हतेमध्ये मुस्लिमांना थोडी सूट देण्यात यावी. 
  • नवीन नोकरभरतीमध्ये मुस्लिमांना प्राधान्य द्यावे. 
  • नोकरकपात करताना मुस्लिमांना शक्यतो कमी करू नये.
  • शेतकरी कसत असलेल्या जमिनी त्यांना मालकी हक्काने दिल्या जाव्या. 
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकीय संघटनांवरची बंदी काढून टाकावी. 
  • लोकप्रतिनिधींची एक 'प्रजा सभा' अस्तित्वात आणावी, आणि तिला काही मर्यादित अधिकार दिले जावेत. 
राजा हरिसिंगाने ग्लॅन्सी समितीच्या शिफारसी स्वीकारल्यानंतर काश्मीरमध्ये राजकीय हालचालींनी वेग घेतला. समितीच्या बहुतेक शिफारसी मुसलमानांना अनुकूल होत्या. हिंदूंनी, आणि विशेषतः जम्मूमधील हिंदू संघटनांनी त्या शिफारसी लागू करण्यास तीव्र विरोध केला. पण त्या विरोधाचा फारसा परिणाम झाला नाही. यादीमधील शेवटच्या दोन शिफारसींमुळे तर काश्मीरमधील राजकीय चित्र पूर्णपणे पालटले. 

मिरवाईझ मौलाना मोहम्मद युसूफ शाह, आणि 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन'चा अध्यक्ष व जम्मू प्रदेशातील महत्वाचा मुस्लिम नेता, चौधरी गुलाम अब्बास, या दोघांच्या सहकार्याने शेख अब्दुल्लांनी, ऑक्टोबर १९३२ मध्ये 'अखिल जम्मू-काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्स' या राजकीय पक्षाची स्थापना केली. 

१९३३ साली राजा हरिसिंगाने नेमलेल्या 'नागरिक मताधिकार समिती'च्या शिफारशींनुसार राज्यात लोकप्रतिनिधींची एक 'प्रजा सभा' स्थापन करण्याचे निश्चित झाले. परंतु, प्रजासभा ही केवळ राज्यकारभारावर लक्ष ठेवण्यासाठी नेमली जाणार होती. कोणतेही कार्यकारी अधिकार प्रजासभेला असणार नव्हते. लोकतांत्रिक प्रक्रियेची सुरुवात काश्मिरात झाली इतकेच.  

पण, भविष्यकाळात, काश्मीरमधील  राजकीय परिस्थिती नेमकी कशी घडत (की बिघडत) गेली? 

  
 (क्रमशः)
(भाग ६  पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

शुक्रवार, २५ मार्च, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग-४



#काश्मीरचे_अश्रू

(भाग ३ नंतर पुढे चालू...)

परकीय जुलमी राजाच्या विरुद्ध काश्मीरच्या भूमिपुत्रांनी, 'काश्मिरीयत' च्या अस्मितेसाठी पुकारलेल्या आंदोलनाचे रूपांतर 'इस्लामियत'च्या लढ्यामध्ये कसे झाले?

त्यामागे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. एखाद्या जुलमी ताकदीपुढे एकटा-दुकटा मनुष्य कदाचित हतबल होईल. पण संघटित आणि प्रेरित झालेला मनुष्यसमूह अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही करू शकतो.
जगातल्या काही मानवसमूहांमध्ये 'धर्मरक्षण' ही एक मोठी प्रभावी प्रेरणा आहे. पण, तिचे स्वरूप बाटलीतल्या 'जिन' राक्षसासारखे आहे. पुष्कळ वेळा, 'धर्मरक्षण' हे केवळ एक 'साधन' असते. बाटली उघडणाऱ्या 'आका' ला प्रत्यक्षात काही निराळेच हेतू साध्य करायचे असतात. 'जिन' आपल्या 'आका'ची उद्दिष्टे साध्य करायला मदतही करतो. पण काम झाल्यावर मात्र, त्या 'जिन'चा 'आका'च नव्हे, तर कोणीही 'जिन'ला पुन्हा बाटलीत बंद करू शकत  नाही. 

नेमके हेच सत्य, काश्मीरमध्ये १९३१ साली घडलेल्या काही घटनांनी अधोरेखित केले.

लाहोरमधून प्रसिद्ध होणाऱ्या 'एका साप्ताहिकात १० मे १९३१ रोजी एक बातमी छापून आली होती. त्यानुसार, २९ एप्रिल १९३१ रोजी जम्मूमध्ये, ईदच्या प्रार्थनेनंतर, इमाम अताउल्ला शाह बुखारी, राजा हरिसिंगाविरुद्ध प्रक्षोभक भाषण करीत असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांचे भाषण (खुतबा) बंद पाडले. ईदसाठी एकत्र आलेल्या मुसलमानांना ते अजिबात आवडले नाही. त्यांच्यापैकी मीर हुसेन बक्ष नावाच्या एका तरुणाने उठून पोलिसांविरुद्ध आणि 'हिंदू' राजाविरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात केली. 'हिंदू' राजा आणि त्याचे 'हिंदू' पोलीस मुस्लिम धर्मावर घाला घालत असल्याचा आरोप करून त्याने जमावाला चिथावणी दिली. नव्यानेच स्थापन झालेल्या 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन' नावाच्या राजकीय संघटनेने हा मुद्दा उचलून धरला आणि या घटनेच्या निषेधार्थ जाहीर सभा घेतली. 

जम्मू-काश्मीरमधील 'रणबीर' या एकमेव वृत्तपत्रावर राजाने १९३० साली बंदी घातली होती. त्यामुळे, जम्मूमधील घटनेची लाहोरच्या वृत्तपत्राने छापलेली बातमी काश्मीरमध्ये पसरेपर्यंत जम्मूमधील मुसलमानांचा असंतोष काहीसा शमलेला होता.

पुढच्याच महिन्यात, म्हणजे जून १९३१मध्ये 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन' ने संपूर्ण काश्मिरातील मुसलमानांना निदर्शने करण्याचे आवाहन केले. त्यामागचे कारण असे सांगण्यात आले की, जम्मू प्रदेशातील मीरपूर पोलीस स्टेशनमध्ये पवित्र कुराणाचा अवमान झाला होता. ड्यूटीवर उशिरा आलेल्या एका मुसलमान शिपायाची गादी आणि गादीवर ठेवलेली कुराणाची प्रत एका हिंदू इन्स्पेक्टरने खोलीबाहेर फेकून दिली होती.

परंतु, प्रत्यक्षात असे काही घडलेच नव्हते, असे इतिहासकार श्री. शबनम कय्यूम यांनी 'काश्मीर का सियासी इन्कलाब' या पुस्तकात लिहिले आहे. (संदर्भ: श्री. झहिरउददीन यांचा लेख, दि. २३ जून २०१७, 'ग्रेटर काश्मीर' नियतकालिक) त्यांच्या मते, जम्मूमध्ये ईदच्या दिवशी घडलेल्या घटनेची खबर उशिरा मिळाल्यामुळे काश्मिरी मुस्लिमांना पुरेशी चिथावणी मिळू शकली नव्हती. काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिमांना संघटित करण्यासाठी, रीडिंग रूम पार्टी आणि 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन'च्या नेत्यांनी, मिरपूरमधील एका मुसलमान शिपायाला हाताशी धरून ही खोटीच तक्रार देण्यास सांगितले होते.

२१ जून रोजी, 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन' संघटनेची एक जाहीर सभा श्रीनगरमध्ये झाली. राजाला भेटून, सर्व मुस्लिमांतर्फे निवेदन देण्यासाठी एका समितीची स्थापना केली गेली. त्या समितीमध्ये तरुण नेता शेख अब्दुल्ला याचाही समावेश होता.

सभेमध्ये शेख अब्दुल्ला व इतर नेत्यांची भाषणे झाली. सभा संपता-संपता, एक तरुण अचानक उठून हिंदूविरोधी घोषणा देऊ लागला. "पवित्र कुराणाचा अवमान खपवून का घेता? जुलमी राजाविरुद्ध विद्रोह करा" असे आवाहन तो सर्व उपस्थित लोकांना करू लागला. राजमहालाकडे बोट दाखवत त्याने, जुलमाचे प्रतीक असलेली ती वास्तू जाळून खाक करण्यासाठी सभेला चिथावणी दिली. तातडीने त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, धर्माच्या नावाने त्याने दिलेली ती हाक सभेसाठी जमलेल्या लोकांच्या भावना भडकवण्यासाठी पुरेशी होती.

प्रत्यक्षात, ते भाषण करणाऱ्या, अब्दुल कादिर नावाच्या तरुणाचा काश्मीरशी काहीच संबंध नव्हता. तो वायव्य सरहद्द प्रांतातला मूळ निवासी होता आणि सुट्टीसाठी काश्मीरमध्ये आलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्यांचा खानसामा म्हणून सोबत आलेला होता!

अब्दुल कादिरवर राजद्रोहाचा आरोप निश्चित होऊन खटला सुरु झाला. १३ जुलै रोजी, जिथे सुनावणी सुरु होती त्या तुरुंगाबाहेर मुसलमानांचा प्रचंड जनसमुदाय जमा झाला. बंदोबस्तासाठी मोठा सशस्त्र पोलीस ताफा हजर होता. सरकारचे सर्व अधिकारी व पोलीस अर्थातच हिंदू होते. 

तुरुंगाजवळील मशिदीमधून दुपारच्या नमाजाची 'बांग' दिली गेली. पण, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी कोणालाच जागेवरून हलू दिले नाही. एक तरुण उत्स्फूर्तपणे जागीच उभा राहून अझानची 'बांग' देऊ लागला. त्याला गोळी घातली गेली. त्यानंतर, प्रक्षोभित जमावावर केल्या गेलेल्या गोळीबारामध्ये २२ लोक ठार झाले.

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी राजा हरिसिंगाने एक चौकशी समिती नेमली. जम्मू-काश्मीर हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती बरजोर दलाल यांच्यासह आणखी दोन न्यायाधीश, आणि हिंदू व मुस्लिम समाजाचे प्रत्येकी दोन-दोन प्रतिनिधी असे या समितीचे स्वरूप होते. पण मुस्लिम प्रतिनिधींनी समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि समितीचा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचे सांगून नामंजूर केला.

मुस्लिम नेत्यांनी या सर्व घटनांचे भरपूर भांडवल केले. त्यांच्या अपप्रचारामुळे या घटनांचे हिंदूविरोधी पडसाद संपूर्ण राज्यभर ऐकू येऊ लागले. शेख अब्दुल्लासह इतर दोन मुस्लिम नेत्यांना राजाने तीन आठवडे कैदेत टाकले. पण या अटकेबद्दल नाराजीचे सूर काश्मीरबाहेर संबंध भारतभरात ऐकू येऊ लागले. त्यामुळे धास्तावलेल्या राजाने त्या नेत्यांना सोडून दिले आणि तात्पुरता समेट झाला.

काश्मिरी मुस्लिमांचे निर्विवाद नेतृत्व म्हणून शेख अब्दुल्लांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती.

परंतु, बाटलीतला 'जिन' देखील बाहेर पडला होता!

काश्मीरच्या दुःखद इतिहासातल्या आणखी एका रक्तरंजित पर्वाची सुरुवात १३ जुलै १९३१ रोजी झाली. 

[तेंव्हापासून १३ जुलै हा दिवस काश्मीरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जात होता. २०१९ साली भारत सरकारने ही प्रथा बंद केली आहे.]


(क्रमशः)
(भाग   पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

बुधवार, २३ मार्च, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग-३

 #काश्मीरचे_अश्रू

(भाग २ नंतर पुढे चालू ...)


काश्मीरमध्ये राजा हरिसिंगाविरुद्ध विद्रोहाची पहिली ठिणगी शेख अब्दुल्लांनी १९३१ साली पेटवली, असे जरी  म्हटले, तरी ती अचानक घडलेली घटना नव्हती. त्याला एक प्रदीर्घ आणि अतिशय दुःखद पार्श्वभूमी होती

काश्मीरच्या शीख आणि डोग्रा राजांनी, शिक्षणासारख्या मूलभूत गरजेपासूनही, समस्त काश्मिरी जनतेला कित्येक वर्षे वंचित ठेवले होते. जे काश्मिरी पंडित काही पिढ्यांपासून काश्मीरबाहेर स्थलांतरित झालेले होते त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळत होत्या. भारतातल्या जवळजवळ सर्व संस्थानिकांच्या दरबारांमध्ये काश्मिरी पंडित मोठ्या पदांवर नोकरी करीत होते. न्यायमूर्ती शंभूनाथ पंडित यांना १८६२ साली कोलकाता उच्च न्यायालयातले पहिले भारतीय न्यायमूर्ती होण्याचा मान मिळाला होता. मात्र, खुद्द काश्मिरात प्राथमिक शिक्षणाचीही वानवा होती.

मुघलांच्या काळापासून काश्मीरच्या दरबारी कामकाजाची भाषा फारसी होती. शिखांच्या आणि डोग्रा राजांच्या काळातही तीच राजभाषा राहिली

बरेच काश्मिरी पंडित फारसी भाषेत प्रवीण असल्याने त्यांना सरकारी नोकऱ्या मिळत असतपरंतु, दरबारामध्ये डोग्रा व पंजाबी अधिकाऱ्यांचेच वर्चस्व होते.

राज्यातील संपूर्ण जमीन राजाच्याच मालकीची होती. राजदरबारात वजन असल्याने, पंडितांनी वेळोवेळी शेतजमिनी बिगरशेतकी जमिनीचे तुकडे राजाकडून मालकीहक्काने मिळवले. हळूहळू पंडितांचा सामाजिक  स्तर उंचावत  गेला.

काश्मिरात बहुसंख्येने असलेली मुसलमान जनता मात्रशिक्षणाअभावी नोकऱ्यांपासून वंचितच राहिली. काही अपवाद वगळता, मुसलमान लोक लहान-सहान व्यापारी, किंवा शाली, गालिचे तत्सम हस्तकलेचे कारागीर आणि विक्रेते असत

१८६० च्या दशकात, शालींवर लागू असलेला कर वसूल करण्याचे  कंत्राट, पंडित राज काक धर नावाच्या एका  व्यक्तीने राजाकडून मिळवले होते. तयार शालींवर ८५ टक्के मूल्यवर्धित कर सरकारतर्फे वसूल केला जात असे. उरलेल्या उत्पन्नातून कारागिराला प्राप्तीकर भरावा लागे. त्यानंतर हाती लागणाऱ्या पैशातून त्याला आपल्या  कुटुंबाची गुजराण करावी लागे. शालींवरचा महसूल बुडण्याच्या भीतीने, सरकारने  शाल कारागिरांना राज्य सोडून जाण्यास बंदी केली होती. कोणी पळून गेल्यास त्याच्या बायका-मुलांना अटक होत असे.

(अमेरिकेत शिकागोमध्ये  मे १८८६ रोजी झालेल्या कामगार आंदोलनाच्या स्मरणार्थ, मे हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' म्हणून साजरा होतोपण त्या घटनेच्या २१ वर्षे आधी काश्मीरमध्ये कामगार आंदोलन झाले होते, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.) 

२९ एप्रिल १८६५ रोजी, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शाल कारागिरांनी एक मोर्चा काढला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पंडित राज काक धर याने, स्वतःवर हल्ला झाल्याची खोटी तक्रार नोंदवली. कारागिरांचा जमाव पांगवण्यासाठी राजाच्या सैनिकांनी केलेल्या भालेहल्ल्यात २८ कारागीर मरण पावले आणि अनेक जखमी झाले

शाल कारागिरांव्यतिरिक्त इतर सर्वच हस्तकला कारागिरांची आपापली गाऱ्हाणी होती, पण त्याला उठावाचे स्वरूप आले नव्हते. राजाविरुद्ध येणाऱ्या असंख्य तक्रारींची दखल घेत, इंग्रज सरकारने राजा प्रतापसिंगला १८८९ सालीकाही काळासाठी राजगादीवरून पायउतार केले. पुन्हा त्याला गादीवर बसवताना, त्याचा धाकटा भाऊ राजा अमर सिंग (राजा हरिसिंगाचे वडील), आणि दरबारातला इंग्रज रेसिडंट या दोघांचे संयुक्त नियामक मंडळ नेमून राजा प्रतापसिंगवर अंकुश आणला

१८९१ साली वेठबिगारीची प्रथा सरकारने अंशतः रद्द केली असली तरी, त्यातून पळवाटा काढून सावकार, जमीनदार,  सरकारी अधिकारी जनतेची पिळवणूक करतच राहिले

सरकारी नोकरीतील काश्मिरी पंडितांमध्येही राजाविरुद्ध असंतोष होताच१८८९ साली फारसीऐवजी उर्दू ही काश्मीर दरबारची राजभाषा करण्यात आली. त्यामुळे, पंजाबी उत्तर हिंदुस्थानी अधिकाऱ्यांचे फावलेपण काश्मिरी पंडितांच्या नोकरीवर हळूहळू गदा येऊ लागली. पंडित हे काश्मीरचे 'भूमिपुत्र' असल्याने, आपल्या  हक्कांच्या रक्षणासाठी आवाज उठवायला त्यांनी 'अखिल काश्मीर पंडित संघटनास्थापन केली.

परंतु, समाजाच्या कोणत्याही घटकाच्या निषेधांचा राजावर काहीही परिणाम होत नव्हता.  

आंदोलने आणि राजकीय मोर्चे काश्मीरमध्ये बेकायदेशीर होते. इतकेच नव्हे तर, राज्यात वर्तमानपत्रे छापण्यावरही बंदी होती. लाहोरहून गुप्तपणे वर्तमानपत्रे आणून वाचली जात असत. असे करताना कोणी पकडले गेल्यास त्यांवर कडक शिक्षेची तरतूदही होती. 

१९२४ साली, लाला मुल्कराज सराफ या पत्रकाराने राजाच्या मिनतवाऱ्या करून 'रणबीर' नावाचे वृत्तपत्र काढण्याची परवानगी मिळवली. काश्मीरमध्ये प्रकाशित होणारे ते पहिले वृत्तपत्र ठरले!

१९२२ साली श्रीनगरमध्ये 'रीडिंग रूम' या नावाची एक संस्था स्थापन झालीएक अहमदिया मुस्लिम वकील, मौलवी मुहम्मद अब्दुल्ला, आणि एक सधन सुन्नी मुसलमान  काश्मीरचे पहिले पदवीधरश्री. गुलाम अहमद अशाई यांनी ती स्थापन केली. त्या संस्थेचे बाह्य रूप वाचनालयाचे असले तरी प्रत्यक्षात, राजकीय चर्चांसाठी तरुणांना उपलब्ध करून दिलेले ते एक व्यासपीठ होते.

शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी राजकीय चळवळींचे महत्व चांगलेच ओळखले होते. त्या काळात भारतभरामध्ये काँग्रेस आणि विशेषतः गांधीजींच्या स्वातंत्र्यलढ्याने जनमानस ढवळून निघाला होता. जुलूम आणि पिळवणुकीतून काश्मीरची जनता मुक्त व्हावी, असे शेख अब्दुल्लांना वाटले तरच नवल होते. म्हणूनच, लाहोर व अलिगढमध्ये शिकून काश्मीरमध्ये परतताच, १९३० साली शेख अब्दुल्ला 'रीडिंग रूम' या संघटनेचे सक्रिय सदस्य झाले.

मे १९३० मध्ये गांधीजींच्या अटकेनंतर जम्मूमध्ये प्रचंड जनसमुदायाने निदर्शने केली. त्याची सविस्तर बातमी आणि अग्रलेख 'रणबीर' वृत्तपत्राने छापले. त्या लेखात लिहिले होते की, कदाचित खुद्द राजा हरिसिंगानेही गांधीजींच्या अटकेविरुद्ध झालेल्या निदर्शनाला पाठिंबा दिला असता. राजाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी काहीच घेणे-देणे नव्हते. त्याला फक्त आपले राज्य टिकवण्यात रस होता. चुकीचे वृत्त छापून लोकांना राजद्रोहासाठी चिथावणी दिल्याचा आरोप ठेवत, 'रणबीर' या एकमेव काश्मिरी वृत्तपत्रावर राजा हरिसिंगाने बंदी घातली

डोग्रा राजाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होण्याची इच्छा समस्त काश्मिरी जनतेला होती. पण त्याशिवाय, सुखवस्तू काश्मिरी पंडितांविरुद्ध एक सुप्त अढीदेखील मुस्लिम जनतेच्या मनात होती.   

एप्रिल ते जुलै १९३१ दरम्यान राज्यात अशा काही घटना 'घडल्या' (किंवा घडवल्या गेल्या) ज्यामुळे, बहुसंख्य मुस्लिम जनतेच्या मनात, सर्वच अल्पसंख्याक हिंदूंच्या विरुद्ध चीड उत्पन्न होण्यास वाव मिळाला.

मुळात, परकीयांच्या जोखडाखालून सुटून 'काश्मिरीयत' जोपासण्याकरिता सुरु झालेल्या लढ्याचे रूपांतर 'इस्लामियत'च्या रक्षणासाठी उभारलेल्या लढ्यामध्ये होऊ लागले. 

भविष्यात घडू पाहणाऱ्या भीषण नाट्याची नांदीच होती ती...  


(क्रमशः)
(भाग   पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)