सोमवार, ७ जून, २०२१

परि अमृतातेंही पैजा जिंके...

आजकाल, (विशेषतः लॉकडाऊनच्या काळात करण्यासारखं फारसं काही नसल्यामुळे) फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप किंवा इतरही समाजमाध्यमांद्वारे विविध विषयांवर चर्चा घडत असतात. काही विषय गंभीर, आणि विचार करायला प्रवृत्त करणारे असतात. क्वचित, कुणा राजकीय पुढाऱ्याचा किंवा एखाद्या वलयांकित परिवाराचा कुणीतरी उदोउदो करतो. मग त्या विचारांचे समर्थक आणि विरोधक शाब्दिक हाणामारी करत बसतात. काही चर्चांमध्ये तर, सरसकट एखाद्या विशिष्ट धर्म अथवा जातीविषयी टीकाटिप्पण्या आणि उलट-सुलट मते प्रदर्शित केली जातात. 


एखाद्या भाषेच्या वापरातील शुद्धता आणि अशुद्धता यांचा उहापोह कधी-कधी काही ग्रुप्समध्ये होत असतो. तसे पाहता, कोणतीच भाषा कायमस्वरूपी अचल किंवा static राहू शकत नाही. आठव्या-नवव्या शतकातली इंग्रजी भाषा जर आज आपण बोलू लागलो, तर एखादा इंग्रजदेखील आपल्याकडे, "आखिर कहना क्या चाहते हो भाई?" असा चेहरा करून उभा राहण्याची शक्यता आहे. तसेच, आज एखाद्या सर्वसामान्य मराठीभाषिक व्यक्तीसमोर, "परि अमृतातेंही पैजा जिंके" असे गौरवोद्गार आपण आपल्या भाषेसाठी काढले, आणि जर त्याला वाटले की, 'अमृता नावाच्या परीने कसली तरी पैज जिंकली असेल', तरीही आपल्याला नवल वाटायचे कारण नाही.   

प्रत्येक भाषा, ही इतर भाषांमधले शब्द कळत-नकळत स्वीकारत राहते आणि काळानुरूप बदलत जाते. तरीदेखील, एखाद्याने उच्चारलेला किंवा लिहिलेला शब्द जर आज आपल्या स्वतःच्या मते अशुद्ध असला तर आपल्याला खटकतो हेही खरेच. मग काही लोक, "हा शब्द असा नाहीये, असा-असा आहे" असे त्या व्यक्तीला समजावतील. काही लोक, "छ्या, एवढी साधी गोष्ट माहीत नाही?" असे विचारून हिणवतील. तर काही लोक नुसतेच नाक मुरडून तिसऱ्याच्या कानात कुजबुजतील, "अरे, वो इतना भी नहीं जानता!"

टेबल, शर्ट, पँट हे मराठीमध्ये सर्रास वापरात आलेले इंग्रजी शब्द आज आपल्याला खटकत नाहीत, कारण ते आता 'आपलेच' झालेले आहेत. त्याचप्रमाणे, 'गरज' आणि 'अक्कल' हे शब्द आपण फारसीमधून उचलले, याचा अर्थ असा नव्हे की आपण 'गरजवंत' होतो आणि आपल्याला 'अक्कल' नव्हती. हा केवळ बोली (आणि लेखी) भाषेच्या उत्क्रांतीचा भाग आहे. अनेक परकीय लोक आपल्या भूमीवर आले आणि आपल्या भाषेत हे शब्द रूढ करून गेले. अशा सर्व शब्दांना मराठीमध्ये प्रतिशब्द नाहीत असे नाही. शिवाय, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कित्येक परकीय शब्दांना मराठी पर्यायी शब्द नव्याने उपलब्धही करून दिले आहेत. 

पण, रोजच्या व्यवहारात आपली मातृभाषा जेंव्हा आपण वापरतो, तेंव्हा 'शुद्ध भाषा म्हणजे नेमकी कोणती आणि अशुद्ध कशाला म्हणायचं' असा आपला गोंधळ उडतोच. 'एखाद्याची भाषा गावठी आहे म्हणून अशुद्ध आहे' असे जर तुम्ही म्हणाल तर, त्यो पावना पुलंच्या 'ती  फुलराणी' मधला ड्वायलाग मारून तुमची विकेट काढायची शक्यता नाकारता येत नाही -- "जर 'नव्हतं' शुद्ध हाय, तर मंग 'व्हतं' अशुद्ध कसा?"  

अशा भाषाविषयक चर्चांमध्ये, नकळतच, भाषेचा संबंध जात-धर्माशीही जोडला जातो. "अमुक जातीचा असूनही त्याची भाषा इतकी अशुद्ध कशी?", किंवा "तो मनुष्य मुस्लिम (किंवा ख्रिश्चन) असूनही किती छान मराठी बोलतो नाही?" असे प्रश्न अभावितपणेच, पण विचारले जातात खरे. भाषेचा संबंध भौगोलिक प्रांताशी आहे, जाती-धर्माशी नव्हे, हे आपण बरेचदा विसरतो.  

या बाबतीत मला आलेले एक-दोन अनुभव डोळ्यात अंजन घालणारे आहेत. 

एकदा पुण्यामध्ये कॅम्पातल्या 'फॅशन स्ट्रीट' नावाच्या गल्लीत सपत्नीक शॉपिंगला गेलो होतो. एकंदर शॉपिंगमध्ये माझे यथातथाच लक्ष होते. तेवढ्यात, त्या गाळाधारकाचे शब्द कानावर आले, "अहो ताई, तुम्ही अगदी निश्चिन्तपणे घेऊन जा. मी खात्री देतोय ना! कपड्याचा रंग गेला तर खुशाल परत या, मी बदलून देईन, किंवा तुम्ही पैसे परत घेऊन जा. मग तर झालं? मी इथेच असतो आणि गेली ३० वर्षे या व्यवसायात आहे."

अस्सल आणि शुद्ध 'पुणेरी' मराठी बोलणारा हा कोण 'सदाशिवपेठी' मनुष्य कॅम्पात गाळा टाकून व्यवसाय करतोय? असा विचार करत मी पुढे झालो. पाहतो तो काय? डोक्यावर गोल टोपी घातलेला, झब्बा-लुंगीवाला एक दाढीधारी मुस्लिम विक्रेता होता तो! 

"अरेच्या, असं कसं काय बुवा?" असा टिपिकल संकुचित विचार माझ्याही मनात आला. पण, लगेच मी स्वतःच्या डोक्यात टप्पल मारून घेतली, आणि "यात आश्चर्य का वाटावं?'' असं मनाशी म्हटलं. 

स्वतःला टप्पल मारून घेण्याकरता सबळ कारण होतं ते म्हणजे, काही वर्षांपूर्वी माझी झालेली फजिती!

मी आर्मी सर्व्हिसमध्ये असताना, एकदा माझे एक केरळी सहकारी, कर्नल जोसेफ यांच्यासोबत मी गप्पा मारत बसलो होतो. त्यांच्या धर्मानुसार चाललेला त्यांचा ४० दिवसांचा उपवासाचा काळ (Lent period) संपत आला होता. लवकरच, येशू ख्रिस्ताचा महानिर्वाण दिवस, म्हणजेच 'गुड फ्रायडे', आणि मग पाठोपाठ ईस्टर संडेची मेजवानी असणार होती. आम्ही बोलत असतानाच, त्यांना त्यांच्या मुलाचा फोन आला. 

त्यांचे बोलणे संपल्यावर मी कर्नल जोसेफना अगदी सहजच म्हटले, "सर, तुम्ही तर अतिशय भाविक ख्रिश्चन आहात. मग तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'आकाश' कसे काय ठेवले?"

माझा प्रश्न नीटसा न कळल्याने कर्नल जोसेफ म्हणाले, "आकाश हे नाव आम्हाला चांगलं वाटलं म्हणून. पण असं का विचारतो आहेस?" 

"काही नाही. आकाश हे हिंदू नाव आहे म्हणून जरा आश्चर्य वाटलं."

कर्नल जोसेफ अत्यंत मृदुभाषी होते. माझ्याकडे शांत आणि सुहास्य मुद्रेने पाहत ते म्हणाले, "आनंद, हाऊ इज आकाश ए हिंदू नेम? आकाश मीन्स द स्काय. स्काय इज द सेम फॉर यू अँड फॉर मी. डू यू थिंक वुई लिव्ह अंडर ए डिफरंट स्काय दॅन युवर्स ?"

त्यांच्या बोलण्यात हेटाळणी अजिबात नव्हती. त्यांनी अतिशय शांतपणे मला एक मूलभूत प्रश्न केला होता, आणि माझा भोटमपणा त्याच क्षणी माझ्या लक्षात आला होता. किती नकळतपणे मी भाषा आणि धर्माची गल्लत केली होती! त्यांचे बोलणे ऐकून मी इतका खजील झालो होतो की मी तो प्रसंग आजही विसरू शकत नाही. 

म्हणूनच जेंव्हा-जेंव्हा एखाद्या भाषाविषयक चर्चेमध्ये, भाषेचा संबंध जात-धर्माशी जोडला जातो, किंवा एखादा Stereotyped, संकुचित विचार व्यक्त होतो, तेंव्हा-तेंव्हा, मी स्वतः तर लगेच सावध होतोच, पण इतरांनाही सावध करायला चुकत नाही. 

मंगळवार, १ जून, २०२१

यू माईट कम बॅक !

 

मी लहान असताना, 'पाहुणे' या शब्दाचा एकच अर्थ मला ठाऊक होता. आपल्या घरी येऊन काही काळ राहणारे कोणी नातेवाईक किंवा स्नेही म्हणजे पाहुणे. 

पण सातारला सैनिकी शाळेच्या वसतिगृहात दाखल झाल्यानंतर एकदा मी चांगलाच बुचकळ्यात पडलो होतो. माझे आईवडील पुण्याला असतात हे समजल्यावर माझ्या वर्गातला एक मुलगा मला म्हणाला, "मी एकदा गेलो होतो पुण्याला. तिथं आमचे पावणे आहेत."

मला कळेना, ज्यांच्या घरी हा मुलगा स्वतः पाहुणा म्हणून गेला होता त्यांनाच हा 'पाहुणे' का म्हणतोय? पुढे मला समजले की पश्चिम महाराष्ट्राकडील भाषेत, पाहुणे हा शब्द नातेवाईकांसाठी वापरला जातो. तसेच लग्नाच्या मुलाकडील मंडळी मुलगी बघायला येणार असतील तरी, "मुलाकडचे पावणे येणार आहेत हिला बघायला" असे म्हटले जाते. 

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अथवा एरवीही काही सणा-समारंभानिमित्त, परगावच्या नातेवाईकांकडे, आणि विशेषतः आजोळी जाऊन मुक्काम ठोकण्याचा प्रघात आमच्या लहानपणी निश्चितच होता. बदलत्या काळाबरोबर ते चित्र हळूहळू बदलत आहे. आजकाल कोणी कोणाच्या घरी जाण्याऐवजी २-३ कुटुंबे मिळून एखाद्या तिसऱ्याच गावी जाऊन हॉटेल अथवा रिसॉर्टमध्ये राहिलेले अधिक दिसतात. 

त्या काळी, पाहुणे येणार म्हटल्यावर लहान मुलांमध्ये कमालीचा उत्साह संचारत असे. कारण, पाहुणे त्यांच्यासाठी निश्चितच काही खाऊ अथवा खेळणी आणत असत. काही-काही पाहुणे मात्र जरासे वेगळे असायचे. दूरच्या नात्यातले, किंवा मुलांच्या आजोबांच्या परिचयाचे एखादे वयस्कर गृहस्थ, क्वचित घरी येऊन मुक्काम ठोकायचे. ऐन सुट्टीत, घरातील लहान मुलांना एकत्र करून, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे, त्यांना अवघड गणिती कोडी घालणे, व्यायाम करायला लावणे, स्तोत्रे व पाढे-परवचा म्हणून घेणे हे या 'पाहुण्यां'चे आवडते काम असे. घरातील मोठ्या माणसांना त्याचे कितीही कौतुक वाटले तरी त्या बालमनांची होणारी तगमग कोणाला कशी दिसणार? रांगड्या सातारी भाषेत, पाहुण्यांना निरोप देणे या अर्थी, 'घालवणे' असा शब्दप्रयोग रूढ आहे. त्या पाहुण्याला खरोखरीच 'घालवायला' मुले अगदी उत्सुक असायची!


शेवटी मग, 'वात्रट कार्टे' या कॅटॅगरीत मोडणारे एखादे मूल अशा पाहुण्याला, "तुम्ही केंव्हा जाणार?" असा प्रश्न विचारी. घरच्या वडिलधाऱ्यांचा धपाटा पाठीत मिळाला तरी मुला-मुलांच्यात मात्र त्या 'कार्ट्या'ला डोक्यावर घेतले जाई.   

निरोप देणे हादेखील पूर्वीच्या काळी मोठा हृद्य प्रसंग असायचा. स्वतःच्या घरी परतताना डोळ्याला पदर लावणारी एखादी माहेरवाशीण, किंवा आते-मामे-मावस भावंडांना, "आता आपण पुढच्या सुट्टीतच भेटणार" असे हिरमुसून म्हणणारी मुले, विरहाच्या कल्पनेने व्याकुळ निश्चितच होत असत. आजच्या मोबाईल फोन आणि व्हॉट्सऍपच्या जमान्यात सगळेच सर्वांशी सतत संपर्कात राहू शकतात. त्यामुळे, ती व्याकुळताही हल्ली फारशी अनुभवायला मिळत नाही असेच मला वाटते.  

माझा मेहुणा, त्याच्या पत्नी आणि मुलासह परवाच येऊन आमच्या घरी एक-दीड दिवस राहून गेला. त्यांची अगदीच धावती भेट होती. पण सध्याच्या करोना संक्रमणाच्या काळात आमच्यासाठी त्या भेटीचे महत्व खूपच होते. आम्हाला त्यांचा सहवास कितीही हवाहवासा असला तरी दुसऱ्या दिवशी त्यांना परत जाणे भाग होते. आमच्या घरून त्यांचाही पाय निघत नव्हता. पण त्यांची बरीच कामे खोळंबलेली असल्याने नाइलाज होता. 

नमस्कार-चमत्कार झाल्यानंतर, त्यांच्या बॅगा गाडीत ठेवण्याच्या उद्देशाने मी त्या लिफ्टपाशी नेऊ लागलो. ते पाहताच, चेष्टेखोरपणे आमचा भाचा स्वातीला म्हणाला, "आत्या, बघ बघ, आनंदकाकांना आम्हाला घरातून बाहेर काढायची किती घाई झालीय!" 

मीही त्याला चेष्टेखोरपणेच प्रत्त्युत्तर दिले, "अरे हो ना! तुम्ही आणखी दोन दिवस राहतो म्हणालात तर आमच्यावर संकटच की!" यावर आम्ही सगळेच दिलखुलास हसलो. मला मात्र त्या निमित्ताने एक वेगळीच आठवण झाली. 

७-८ वर्षांपूर्वी, मी सिम्बायोसिस समूहाच्या दोन महाविद्यालयांमध्ये काही विषय शिकवीत असे. डॉ. कर्नल उदय विद्वांस नावाचे निवृत्त सेनाधिकारी त्यांपैकी एका महाविद्यालयाचे प्रमुख होते. सडसडीत बांधा, तरतरीत नाक, लकाकते डोळे, आणि पीळदार मिश्या असे त्यांचे आकर्षक रूप होते. हुशारी, हजरजबाबीपणा, आणि सतत जागृत असलेली विनोदबुद्धी, या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे आमच्या वयांमध्ये जरी काही वर्षांचे अंतर असले तरीही, आमची लवकरच छान मैत्री झाली. शिकवण्यासाठी वर्गावर जाण्यापूर्वी, किंवा माझे व्याख्यान संपल्यानंतर, क्वचित थोडा वेळ मिळाल्यास मी त्यांच्या केबिनमध्ये डोकावत असे. मला बघताच, हातातील काम सोडून ते त्यांच्या खास शैलीमध्ये म्हणत, "अरे वा, बरं झालं आलास! चल बिडी मारायला जाऊ!" कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारता-मारता मी चहाचे घुटके घेत असे, आणि ते चहासोबत सिगारेटचे झुरके मारत असत. 

एकदा काही लहानश्या कामानिमित्त मी विद्वांस सरांच्या घरी गेलो होतो. त्याच सुमारास त्यांच्या दुसऱ्या नवीन घराच्या फर्निशिंगचे काम चालू होते. त्यांच्या पत्नी त्या कामावर देखरेख करण्यासाठी गेलेल्या असल्याने, कर्नल विद्वांस एकटेच घरी होते. त्यामुळे, गप्पांसाठी माझी 'कंपनी' मिळताच ते खूष झाले. माझे काम जरी लगेच झाले, तरी आमच्या गप्पा मात्र बराच काळ रंगल्या. मी जसा त्यांच्या घरून निघालो तसे, माझ्यासोबत रस्त्यापर्यंत येऊन, मला निरोप देण्याच्या उद्देशाने कर्नल विद्वांसही उठून निघाले. 

मी त्यांना दरवाज्यातच थांबवून म्हटले, "अहो सर, मी फाटकासमोरच स्कूटर लावली आहे. तुम्ही उगाच दोन जिने उतरून निरोप द्यायला कशाला येताय? No formalities please!"

त्यावर, डोळे रोखून माझ्याकडे बघत गंभीर आवाजात ते म्हणाले, "No no. I must ensure that you go. Otherwise you might come back!"

पुढच्या क्षणी, स्वतःच्याच विनोदावर खळखळून हसत त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. मीही हसतच त्यांना जोरदार टाळी दिली. कर्नल विद्वांस खरोखरच जिने उतरून मला फाटकापर्यंत सोडायला आले. तिथेही आमच्या २-५ मिनिटे गप्पा झाल्या. विद्वांस सरांच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहत, त्यांचा निरोप घेऊन मी निघालो. त्यानंतर आमचा फोनवर संपर्क होत राहिला पण बरेच दिवस प्रत्यक्ष भेट मात्र होऊ शकली नव्हती. 

एक दिवस अचानकच मला एका स्नेह्यांचा फोन आला, "कर्नल उदय विद्वांस हार्ट अटॅकने गेले!" ते शब्द ऐकले आणि आमच्या शेवटच्या भेटीची आणि, "You might come back!" या त्यांच्या शब्दांची आठवण मला झाली. आपले जीवन किती अनिश्चित आणि क्षणभंगुर आहे याची जाणीव होऊन मी सुन्न झालो.  

आजही दरवाज्यावर कुणाला निरोप देण्याचा प्रसंग आला की मला हटकून विद्वांस सरांची आठवण येते. अनंताच्या प्रवासाला निघून गेलेला मनुष्य परत येत नाही हे माहीत असूनही, विषादाने मी मनातल्या मनातच त्यांना म्हणतो, "सर, आय माईट कम बॅक. बट, विल यू?"