सोमवार, ७ जून, २०२१

परि अमृतातेंही पैजा जिंके...

आजकाल, (विशेषतः लॉकडाऊनच्या काळात करण्यासारखं फारसं काही नसल्यामुळे) फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप किंवा इतरही समाजमाध्यमांद्वारे विविध विषयांवर चर्चा घडत असतात. काही विषय गंभीर, आणि विचार करायला प्रवृत्त करणारे असतात. क्वचित, कुणा राजकीय पुढाऱ्याचा किंवा एखाद्या वलयांकित परिवाराचा कुणीतरी उदोउदो करतो. मग त्या विचारांचे समर्थक आणि विरोधक शाब्दिक हाणामारी करत बसतात. काही चर्चांमध्ये तर, सरसकट एखाद्या विशिष्ट धर्म अथवा जातीविषयी टीकाटिप्पण्या आणि उलट-सुलट मते प्रदर्शित केली जातात. 


एखाद्या भाषेच्या वापरातील शुद्धता आणि अशुद्धता यांचा उहापोह कधी-कधी काही ग्रुप्समध्ये होत असतो. तसे पाहता, कोणतीच भाषा कायमस्वरूपी अचल किंवा static राहू शकत नाही. आठव्या-नवव्या शतकातली इंग्रजी भाषा जर आज आपण बोलू लागलो, तर एखादा इंग्रजदेखील आपल्याकडे, "आखिर कहना क्या चाहते हो भाई?" असा चेहरा करून उभा राहण्याची शक्यता आहे. तसेच, आज एखाद्या सर्वसामान्य मराठीभाषिक व्यक्तीसमोर, "परि अमृतातेंही पैजा जिंके" असे गौरवोद्गार आपण आपल्या भाषेसाठी काढले, आणि जर त्याला वाटले की, 'अमृता नावाच्या परीने कसली तरी पैज जिंकली असेल', तरीही आपल्याला नवल वाटायचे कारण नाही.   

प्रत्येक भाषा, ही इतर भाषांमधले शब्द कळत-नकळत स्वीकारत राहते आणि काळानुरूप बदलत जाते. तरीदेखील, एखाद्याने उच्चारलेला किंवा लिहिलेला शब्द जर आज आपल्या स्वतःच्या मते अशुद्ध असला तर आपल्याला खटकतो हेही खरेच. मग काही लोक, "हा शब्द असा नाहीये, असा-असा आहे" असे त्या व्यक्तीला समजावतील. काही लोक, "छ्या, एवढी साधी गोष्ट माहीत नाही?" असे विचारून हिणवतील. तर काही लोक नुसतेच नाक मुरडून तिसऱ्याच्या कानात कुजबुजतील, "अरे, वो इतना भी नहीं जानता!"

टेबल, शर्ट, पँट हे मराठीमध्ये सर्रास वापरात आलेले इंग्रजी शब्द आज आपल्याला खटकत नाहीत, कारण ते आता 'आपलेच' झालेले आहेत. त्याचप्रमाणे, 'गरज' आणि 'अक्कल' हे शब्द आपण फारसीमधून उचलले, याचा अर्थ असा नव्हे की आपण 'गरजवंत' होतो आणि आपल्याला 'अक्कल' नव्हती. हा केवळ बोली (आणि लेखी) भाषेच्या उत्क्रांतीचा भाग आहे. अनेक परकीय लोक आपल्या भूमीवर आले आणि आपल्या भाषेत हे शब्द रूढ करून गेले. अशा सर्व शब्दांना मराठीमध्ये प्रतिशब्द नाहीत असे नाही. शिवाय, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कित्येक परकीय शब्दांना मराठी पर्यायी शब्द नव्याने उपलब्धही करून दिले आहेत. 

पण, रोजच्या व्यवहारात आपली मातृभाषा जेंव्हा आपण वापरतो, तेंव्हा 'शुद्ध भाषा म्हणजे नेमकी कोणती आणि अशुद्ध कशाला म्हणायचं' असा आपला गोंधळ उडतोच. 'एखाद्याची भाषा गावठी आहे म्हणून अशुद्ध आहे' असे जर तुम्ही म्हणाल तर, त्यो पावना पुलंच्या 'ती  फुलराणी' मधला ड्वायलाग मारून तुमची विकेट काढायची शक्यता नाकारता येत नाही -- "जर 'नव्हतं' शुद्ध हाय, तर मंग 'व्हतं' अशुद्ध कसा?"  

अशा भाषाविषयक चर्चांमध्ये, नकळतच, भाषेचा संबंध जात-धर्माशीही जोडला जातो. "अमुक जातीचा असूनही त्याची भाषा इतकी अशुद्ध कशी?", किंवा "तो मनुष्य मुस्लिम (किंवा ख्रिश्चन) असूनही किती छान मराठी बोलतो नाही?" असे प्रश्न अभावितपणेच, पण विचारले जातात खरे. भाषेचा संबंध भौगोलिक प्रांताशी आहे, जाती-धर्माशी नव्हे, हे आपण बरेचदा विसरतो.  

या बाबतीत मला आलेले एक-दोन अनुभव डोळ्यात अंजन घालणारे आहेत. 

एकदा पुण्यामध्ये कॅम्पातल्या 'फॅशन स्ट्रीट' नावाच्या गल्लीत सपत्नीक शॉपिंगला गेलो होतो. एकंदर शॉपिंगमध्ये माझे यथातथाच लक्ष होते. तेवढ्यात, त्या गाळाधारकाचे शब्द कानावर आले, "अहो ताई, तुम्ही अगदी निश्चिन्तपणे घेऊन जा. मी खात्री देतोय ना! कपड्याचा रंग गेला तर खुशाल परत या, मी बदलून देईन, किंवा तुम्ही पैसे परत घेऊन जा. मग तर झालं? मी इथेच असतो आणि गेली ३० वर्षे या व्यवसायात आहे."

अस्सल आणि शुद्ध 'पुणेरी' मराठी बोलणारा हा कोण 'सदाशिवपेठी' मनुष्य कॅम्पात गाळा टाकून व्यवसाय करतोय? असा विचार करत मी पुढे झालो. पाहतो तो काय? डोक्यावर गोल टोपी घातलेला, झब्बा-लुंगीवाला एक दाढीधारी मुस्लिम विक्रेता होता तो! 

"अरेच्या, असं कसं काय बुवा?" असा टिपिकल संकुचित विचार माझ्याही मनात आला. पण, लगेच मी स्वतःच्या डोक्यात टप्पल मारून घेतली, आणि "यात आश्चर्य का वाटावं?'' असं मनाशी म्हटलं. 

स्वतःला टप्पल मारून घेण्याकरता सबळ कारण होतं ते म्हणजे, काही वर्षांपूर्वी माझी झालेली फजिती!

मी आर्मी सर्व्हिसमध्ये असताना, एकदा माझे एक केरळी सहकारी, कर्नल जोसेफ यांच्यासोबत मी गप्पा मारत बसलो होतो. त्यांच्या धर्मानुसार चाललेला त्यांचा ४० दिवसांचा उपवासाचा काळ (Lent period) संपत आला होता. लवकरच, येशू ख्रिस्ताचा महानिर्वाण दिवस, म्हणजेच 'गुड फ्रायडे', आणि मग पाठोपाठ ईस्टर संडेची मेजवानी असणार होती. आम्ही बोलत असतानाच, त्यांना त्यांच्या मुलाचा फोन आला. 

त्यांचे बोलणे संपल्यावर मी कर्नल जोसेफना अगदी सहजच म्हटले, "सर, तुम्ही तर अतिशय भाविक ख्रिश्चन आहात. मग तुम्ही तुमच्या मुलाचे नाव 'आकाश' कसे काय ठेवले?"

माझा प्रश्न नीटसा न कळल्याने कर्नल जोसेफ म्हणाले, "आकाश हे नाव आम्हाला चांगलं वाटलं म्हणून. पण असं का विचारतो आहेस?" 

"काही नाही. आकाश हे हिंदू नाव आहे म्हणून जरा आश्चर्य वाटलं."

कर्नल जोसेफ अत्यंत मृदुभाषी होते. माझ्याकडे शांत आणि सुहास्य मुद्रेने पाहत ते म्हणाले, "आनंद, हाऊ इज आकाश ए हिंदू नेम? आकाश मीन्स द स्काय. स्काय इज द सेम फॉर यू अँड फॉर मी. डू यू थिंक वुई लिव्ह अंडर ए डिफरंट स्काय दॅन युवर्स ?"

त्यांच्या बोलण्यात हेटाळणी अजिबात नव्हती. त्यांनी अतिशय शांतपणे मला एक मूलभूत प्रश्न केला होता, आणि माझा भोटमपणा त्याच क्षणी माझ्या लक्षात आला होता. किती नकळतपणे मी भाषा आणि धर्माची गल्लत केली होती! त्यांचे बोलणे ऐकून मी इतका खजील झालो होतो की मी तो प्रसंग आजही विसरू शकत नाही. 

म्हणूनच जेंव्हा-जेंव्हा एखाद्या भाषाविषयक चर्चेमध्ये, भाषेचा संबंध जात-धर्माशी जोडला जातो, किंवा एखादा Stereotyped, संकुचित विचार व्यक्त होतो, तेंव्हा-तेंव्हा, मी स्वतः तर लगेच सावध होतोच, पण इतरांनाही सावध करायला चुकत नाही. 

१७ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

सुंदर विवेचन

नितीन चौधरी म्हणाले...

छान लिहिलय, पण साधारणता नाव धर्माशी ओळख सांगतात , अर्थात काही आडनांव जे कॉमन आहेत जसे माझे, ते समोरच्याला कन्फ्युज ही करतात, मला असा अनुभव मी जर नवीन व्यक्ती सोबत नांदेड कडे बोलल्या जाणाऱ्या उर्दू मिश्रित हिंदीत बोललो तर नेहमी येतो, मजा येते

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

😀👍

Dr Manjiri Karandikar म्हणाले...

राजस झाला तेव्हा माझ्या आत्ते नणदेने त्याचे नाव ताहिर ठेवावे असे सुचवले होते. अर्थ - पवित्र (उर्दू)
पण मी ताबडतोब reject केले. कारण obvious आहे. त्याची आठवण झाली.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

नूरचा उल्लेख करावा अशी स्वाती व दादांची सूचना होती. पण मी ते टाळलं.
🙂

PradeepRB- Pune म्हणाले...

प्रत्येक (शुद्ध) मराठी बोलणार्याच्या आयुष्यात एकदा तरी असा प्रसंग येतोच.

परफेक्ट कॅप्चर!!!

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙏🙂

Ajit vaidya म्हणाले...

Very nicely written sir. Appreciate your depth of knowledge and grasping power. Great. Worth reading

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙂
Thanks! 🙏

rsb म्हणाले...

Good one👍🏻

विश्वास म्हणाले...

यावरून आठवण आली. माझ्या मेहुण्याचे वकिल अॅड शिवाजीराव क्षक्षक्षक्षक्षक्ष यांच्याबरोबर कोर्टात ५ वर्ष एका कामासंदर्भात भेट व्हायची. एकदाच घरी जायची गरज पडली. आणि तेव्हा समजले ते 'शिवाजीराव ' असले तरी मुस्लिम आहेत! मला विशीत बसलेला हा मोठा धक्काच होता.
तुझे लेखन मात्र एकदम ओघवतं आहे.
लिहित जा.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

हे 'शिवाजीराव' भारीच! 😀

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

Thanks Ravi! 🙏

shekhar म्हणाले...

अतिशय सुंदर विवेचन आणि सत्य स्वतः ला विचार करा वयास प्रवृत्त करते

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद शेखर! 🙂🙏

Milind Ranade म्हणाले...

Revealing experiences and thoughtful observations about changes in language. Yes sky is the same for all!
If someone's name generates feelings arising from preconceived notions and prejudice its a warning bell to correct our perspective.
But Colonel, usually we associate names with a country or faith not because of ill feeling for that community but because the name is common there.
Milind Ranade

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

I haven't understood the last part of your comment, Milind. 🤔
Can you please explain in a PM?