मंगळवार, १ जून, २०२१

यू माईट कम बॅक !

 

मी लहान असताना, 'पाहुणे' या शब्दाचा एकच अर्थ मला ठाऊक होता. आपल्या घरी येऊन काही काळ राहणारे कोणी नातेवाईक किंवा स्नेही म्हणजे पाहुणे. 

पण सातारला सैनिकी शाळेच्या वसतिगृहात दाखल झाल्यानंतर एकदा मी चांगलाच बुचकळ्यात पडलो होतो. माझे आईवडील पुण्याला असतात हे समजल्यावर माझ्या वर्गातला एक मुलगा मला म्हणाला, "मी एकदा गेलो होतो पुण्याला. तिथं आमचे पावणे आहेत."

मला कळेना, ज्यांच्या घरी हा मुलगा स्वतः पाहुणा म्हणून गेला होता त्यांनाच हा 'पाहुणे' का म्हणतोय? पुढे मला समजले की पश्चिम महाराष्ट्राकडील भाषेत, पाहुणे हा शब्द नातेवाईकांसाठी वापरला जातो. तसेच लग्नाच्या मुलाकडील मंडळी मुलगी बघायला येणार असतील तरी, "मुलाकडचे पावणे येणार आहेत हिला बघायला" असे म्हटले जाते. 

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अथवा एरवीही काही सणा-समारंभानिमित्त, परगावच्या नातेवाईकांकडे, आणि विशेषतः आजोळी जाऊन मुक्काम ठोकण्याचा प्रघात आमच्या लहानपणी निश्चितच होता. बदलत्या काळाबरोबर ते चित्र हळूहळू बदलत आहे. आजकाल कोणी कोणाच्या घरी जाण्याऐवजी २-३ कुटुंबे मिळून एखाद्या तिसऱ्याच गावी जाऊन हॉटेल अथवा रिसॉर्टमध्ये राहिलेले अधिक दिसतात. 

त्या काळी, पाहुणे येणार म्हटल्यावर लहान मुलांमध्ये कमालीचा उत्साह संचारत असे. कारण, पाहुणे त्यांच्यासाठी निश्चितच काही खाऊ अथवा खेळणी आणत असत. काही-काही पाहुणे मात्र जरासे वेगळे असायचे. दूरच्या नात्यातले, किंवा मुलांच्या आजोबांच्या परिचयाचे एखादे वयस्कर गृहस्थ, क्वचित घरी येऊन मुक्काम ठोकायचे. ऐन सुट्टीत, घरातील लहान मुलांना एकत्र करून, त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे, त्यांना अवघड गणिती कोडी घालणे, व्यायाम करायला लावणे, स्तोत्रे व पाढे-परवचा म्हणून घेणे हे या 'पाहुण्यां'चे आवडते काम असे. घरातील मोठ्या माणसांना त्याचे कितीही कौतुक वाटले तरी त्या बालमनांची होणारी तगमग कोणाला कशी दिसणार? रांगड्या सातारी भाषेत, पाहुण्यांना निरोप देणे या अर्थी, 'घालवणे' असा शब्दप्रयोग रूढ आहे. त्या पाहुण्याला खरोखरीच 'घालवायला' मुले अगदी उत्सुक असायची!


शेवटी मग, 'वात्रट कार्टे' या कॅटॅगरीत मोडणारे एखादे मूल अशा पाहुण्याला, "तुम्ही केंव्हा जाणार?" असा प्रश्न विचारी. घरच्या वडिलधाऱ्यांचा धपाटा पाठीत मिळाला तरी मुला-मुलांच्यात मात्र त्या 'कार्ट्या'ला डोक्यावर घेतले जाई.   

निरोप देणे हादेखील पूर्वीच्या काळी मोठा हृद्य प्रसंग असायचा. स्वतःच्या घरी परतताना डोळ्याला पदर लावणारी एखादी माहेरवाशीण, किंवा आते-मामे-मावस भावंडांना, "आता आपण पुढच्या सुट्टीतच भेटणार" असे हिरमुसून म्हणणारी मुले, विरहाच्या कल्पनेने व्याकुळ निश्चितच होत असत. आजच्या मोबाईल फोन आणि व्हॉट्सऍपच्या जमान्यात सगळेच सर्वांशी सतत संपर्कात राहू शकतात. त्यामुळे, ती व्याकुळताही हल्ली फारशी अनुभवायला मिळत नाही असेच मला वाटते.  

माझा मेहुणा, त्याच्या पत्नी आणि मुलासह परवाच येऊन आमच्या घरी एक-दीड दिवस राहून गेला. त्यांची अगदीच धावती भेट होती. पण सध्याच्या करोना संक्रमणाच्या काळात आमच्यासाठी त्या भेटीचे महत्व खूपच होते. आम्हाला त्यांचा सहवास कितीही हवाहवासा असला तरी दुसऱ्या दिवशी त्यांना परत जाणे भाग होते. आमच्या घरून त्यांचाही पाय निघत नव्हता. पण त्यांची बरीच कामे खोळंबलेली असल्याने नाइलाज होता. 

नमस्कार-चमत्कार झाल्यानंतर, त्यांच्या बॅगा गाडीत ठेवण्याच्या उद्देशाने मी त्या लिफ्टपाशी नेऊ लागलो. ते पाहताच, चेष्टेखोरपणे आमचा भाचा स्वातीला म्हणाला, "आत्या, बघ बघ, आनंदकाकांना आम्हाला घरातून बाहेर काढायची किती घाई झालीय!" 

मीही त्याला चेष्टेखोरपणेच प्रत्त्युत्तर दिले, "अरे हो ना! तुम्ही आणखी दोन दिवस राहतो म्हणालात तर आमच्यावर संकटच की!" यावर आम्ही सगळेच दिलखुलास हसलो. मला मात्र त्या निमित्ताने एक वेगळीच आठवण झाली. 

७-८ वर्षांपूर्वी, मी सिम्बायोसिस समूहाच्या दोन महाविद्यालयांमध्ये काही विषय शिकवीत असे. डॉ. कर्नल उदय विद्वांस नावाचे निवृत्त सेनाधिकारी त्यांपैकी एका महाविद्यालयाचे प्रमुख होते. सडसडीत बांधा, तरतरीत नाक, लकाकते डोळे, आणि पीळदार मिश्या असे त्यांचे आकर्षक रूप होते. हुशारी, हजरजबाबीपणा, आणि सतत जागृत असलेली विनोदबुद्धी, या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे आमच्या वयांमध्ये जरी काही वर्षांचे अंतर असले तरीही, आमची लवकरच छान मैत्री झाली. शिकवण्यासाठी वर्गावर जाण्यापूर्वी, किंवा माझे व्याख्यान संपल्यानंतर, क्वचित थोडा वेळ मिळाल्यास मी त्यांच्या केबिनमध्ये डोकावत असे. मला बघताच, हातातील काम सोडून ते त्यांच्या खास शैलीमध्ये म्हणत, "अरे वा, बरं झालं आलास! चल बिडी मारायला जाऊ!" कॅन्टीनमध्ये बसून गप्पा मारता-मारता मी चहाचे घुटके घेत असे, आणि ते चहासोबत सिगारेटचे झुरके मारत असत. 

एकदा काही लहानश्या कामानिमित्त मी विद्वांस सरांच्या घरी गेलो होतो. त्याच सुमारास त्यांच्या दुसऱ्या नवीन घराच्या फर्निशिंगचे काम चालू होते. त्यांच्या पत्नी त्या कामावर देखरेख करण्यासाठी गेलेल्या असल्याने, कर्नल विद्वांस एकटेच घरी होते. त्यामुळे, गप्पांसाठी माझी 'कंपनी' मिळताच ते खूष झाले. माझे काम जरी लगेच झाले, तरी आमच्या गप्पा मात्र बराच काळ रंगल्या. मी जसा त्यांच्या घरून निघालो तसे, माझ्यासोबत रस्त्यापर्यंत येऊन, मला निरोप देण्याच्या उद्देशाने कर्नल विद्वांसही उठून निघाले. 

मी त्यांना दरवाज्यातच थांबवून म्हटले, "अहो सर, मी फाटकासमोरच स्कूटर लावली आहे. तुम्ही उगाच दोन जिने उतरून निरोप द्यायला कशाला येताय? No formalities please!"

त्यावर, डोळे रोखून माझ्याकडे बघत गंभीर आवाजात ते म्हणाले, "No no. I must ensure that you go. Otherwise you might come back!"

पुढच्या क्षणी, स्वतःच्याच विनोदावर खळखळून हसत त्यांनी टाळीसाठी हात पुढे केला. मीही हसतच त्यांना जोरदार टाळी दिली. कर्नल विद्वांस खरोखरच जिने उतरून मला फाटकापर्यंत सोडायला आले. तिथेही आमच्या २-५ मिनिटे गप्पा झाल्या. विद्वांस सरांच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहत, त्यांचा निरोप घेऊन मी निघालो. त्यानंतर आमचा फोनवर संपर्क होत राहिला पण बरेच दिवस प्रत्यक्ष भेट मात्र होऊ शकली नव्हती. 

एक दिवस अचानकच मला एका स्नेह्यांचा फोन आला, "कर्नल उदय विद्वांस हार्ट अटॅकने गेले!" ते शब्द ऐकले आणि आमच्या शेवटच्या भेटीची आणि, "You might come back!" या त्यांच्या शब्दांची आठवण मला झाली. आपले जीवन किती अनिश्चित आणि क्षणभंगुर आहे याची जाणीव होऊन मी सुन्न झालो.  

आजही दरवाज्यावर कुणाला निरोप देण्याचा प्रसंग आला की मला हटकून विद्वांस सरांची आठवण येते. अनंताच्या प्रवासाला निघून गेलेला मनुष्य परत येत नाही हे माहीत असूनही, विषादाने मी मनातल्या मनातच त्यांना म्हणतो, "सर, आय माईट कम बॅक. बट, विल यू?" 

२९ टिप्पण्या:

शर्मिला जगताप म्हणाले...

पाहुणे शब्दाने बालपणीच्या आठवणी जाग्या होऊन मजा घेत होते,तेवढ्यात शेवट वाचून हळहळ वाटली. पण मस्त वाटले. असेच छान लिहून हसवत रहा.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

लहानपणीच्या आंबटगोड आठवणी असतातच.
पण काही अनुभव असा चटका लावूनही जातात. 😒

Unknown म्हणाले...

Can't take things for granted in life.Enjoy every moment to the fullest Asif it is your last.

Aviator म्हणाले...

पूर्वी निघताना, "पोचल्यावर कार्ड टाक" असं सांगायचे. :)

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

True

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

गेलेच ते दिवस... 😒

Sanjay म्हणाले...

वा वा छान वर्णन पाहुण्यांचं . .

कर्नल विद्वांस यांचा उल्लेख आणि शेवट हृदयस्पर्शी !!

Unknown म्हणाले...

Very nice sir..

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙂🙏

मिलिंद म्हणाले...

अजूनही, कोल्हापूर कडे पाहुणे हाच शब्द नातेवाईकांसाठी सर्रास वापरला जातो. मी सुरुवातीला जेव्हा नवीन कोल्हापुरात आलो, तेंव्हा, मला हे थोडं पचनी पडायला वेळ लागला होता.

असो, जुन्या आठवणी (कडू किंवा गोड, दोन्ही) नेहमीच आनंद देऊन जातात.

नेहमी प्रमाणे लेखन उत्तम. Keep it up.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙏🙂

Ajit vaidya म्हणाले...

Very touching fact covered in polite manner. Understood today the ultimate word"you might comeback

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙂🙏

Mahesh k म्हणाले...

Anand khup chan and the last 'twist in the tale', touches the heart !


Mahesh

Mahesh k म्हणाले...

Anand khup chan and the last 'twist in the tale', touches the heart !


Mahesh

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙏धन्यवाद महेश!

Unknown म्हणाले...

खर च आनंद.बालपनी च्या आठवणी जाग्या ज़ाल्या. फार छान लेख. अभि नं द न

Unknown म्हणाले...

Arun Sarade

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद अरुण! 🙂🙏

श्रीधरपंत गवई म्हणाले...

गेले ते दिवस गेले

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

खरंच!

नितीन चौधरी म्हणाले...

छान लिहलय, शेवट वाचकाला गंभीर करतो , मला लिखाणाची शैली आवडली.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏
कर्नल विद्वांसांचे ते शब्द आणि त्यांची उत्स्फूर्त विनोदबुद्धी मला वरचेवर आठवतात. 😒

V.R.Kulkarni. म्हणाले...

"You might come back" ह्या शब्दांचा अर्थ सैनिकांशिवाय कुणाला चांगला समजणार?
खूप छान लिहिलंत सर!
मलाही आता कुणाला निरोप देताना हे शब्द आठवतील.👍

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद! 🙏🙂

PradeepRB- Pune म्हणाले...

खूपच छान लिहीले आहेस

शेवटचा प्रसंग मात्र चटका लावून जाते

- प्रदीप

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद प्रदीप. 🙏

rsb म्हणाले...

Very sad to know that Col Vidhwans is no more. ही तुझी त्यांना ष्रध्दांजली ओम शांती

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

Yes. 😒
I often remember him.