मंगळवार, २२ नोव्हेंबर, २०२२

बँकेतला सुखद अनुभव

सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आणि पोलीस कर्मचारी व अधिकारी, यांच्याबद्दलचे वाईट अनुभव अनेकदा वाचायला मिळतात.
म्हणूनच, मला आलेले दोन चांगले अनुभव आवर्जून सांगावेसे वाटतात. पहिला अनुभव बँकेतला...
 
आज दुपारी एकच्या सुमारास मी पुण्यातल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत गेलो. व्हिसाकरता माझ्या आणि सौ. स्वातीच्या दोन्ही खात्यांचे सहा महिन्यांचे स्टेटमेंट लागणार होते. ते घ्यायला टूर कंपनीचा मनुष्य आजच्या आजच संध्याकाळी घरी येतो म्हणाला होता.

बँकेतले हे काम इतक्या तातडीने होणार नाही, असेच मनात धरून मी बँकेत गेलो होतो. आज निदान अर्ज तरी भरून द्यावा इतकाच उद्देश होता.

श्री. उत्तम मरगज नावाचा एक दिव्यांग तरुण बँकेच्या दर्शनी काऊंटरवरच्या कॉम्प्युटरसमोर बसलेला होता. कानातल्या इयरफोनमधून ऐकत आणि कीबोर्ड हाताने चाचपडत तो लोकांना मदत करीत होता. त्याच्यासमोरचे दोन-तीन लोक एकाच वेळी आपापल्या शंकांचा भडिमार त्या तरुणावर करीत होते. पण विशेष म्हणजे, त्या सर्व शंकांचे निरसन तो लीलया व शांतपणे करीत होता.

मधेच संधी साधून मीही त्याला मदत मागितली. त्याने खुणेनेच मला फॉर्म्स ठेवायचा काऊंटर दाखवला व म्हणाला, "स्टेटमेंटसाठीचा विनंती अर्ज भरून १७ नंबर काऊंटरवर द्या."
या 'सरकारी चक्रव्यूहात' आता इकडून तिकडे फिरावे लागणार हे उमजून, "आलिया भोगासी..." असे मनात म्हणत मी १७ नंबर काऊंटरवर गेलो.

श्री. संजय सिन्हा नावाचा १७ नंबरवरचा अधिकारी आधीच एका ग्राहकाचे काम करण्यात व्यग्र होता. मी थांबून राहिलो. मध्येच तो ग्राहक आपले पासबुक शोधू लागल्याने, श्री. सिन्हांनी मला खुणेनेच, "काय?" असे विचारले. थोडक्यात बोलून, माझे विनंती अर्ज मी त्यांच्यासमोर ठेवले. खटाखट कीबोर्ड वाजवत दोन्ही खात्यावरच्या माझ्या सह्या त्यांनी ताडून बघितल्या. अर्जांवर शिक्के मारून सह्या केल्या, अर्ज मला परत केले, आणि हसतमुखाने म्हणाले, "त्या दर्शनी काउंटरवर हे नेऊन द्या".
एव्हाना, बँकेत शिरून मला जेमतेम पाच मिनिटेच झालेली होती.

मी पुन्हा श्री. उत्तम मरगज नावाच्या त्या दिव्यांग तरुणासमोर गेलो आणि सह्या व्हेरिफाय करून आणल्याचे त्याला सांगितले. तो चटकन म्हणाला, "दोन्हीपैकी कोणत्याही एका अकाउंटचा नंबर सांगा."
त्याने चाचपडतच, पण तथाकथित 'डोळस' माणसालाही लाजवेल अशा चपळाईने मी सांगितलेला नंबर आणि स्टेटमेंटच्या कालावधीच्या तारखा कॉम्प्युटरवर भरल्या. प्रिंटरला कमांड देऊन तो मला म्हणाला, "त्या प्रिंटरपाशी जाऊन उभे राहा. प्रिंटिंग पूर्ण झाले की मला सांगा. मी दुसऱ्या खात्याचे स्टेटमेंटही देईन."

सहापैकी तीन महिन्यांच्या एंट्र्यांचे प्रिंटिंग पूर्ण झाल्यावर, काही कारणाने ते मशीन थांबले. मी सांगण्यापूर्वीच त्याच्या कानांनी ते टिपले होते. तो उठून प्रिंटरपाशी आला. चाचपडतच त्याने मशीन बंद करून परत चालू केले व म्हणाला, "कुठपर्यंत प्रिंटिंग झाले आहे ती तारीख वाचून मला सांगा."
मी सांगताच, त्याने त्या तारखेपासूनची कमांड पुन्हा प्रिंटरला दिली आणि प्रिंटिंग चालू झाले.

माझ्या दोन्ही स्टेटमेंटचे प्रिंटिंग पूर्ण झाल्यावर उत्तम मला म्हणाला, "आता ते प्रिंट झालेले कागद प्रिंटरमधून एकसंध स्वरूपातच काढून घ्या आणि त्याच अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांच्या सह्या घ्या."
मी प्रिंटरमधून तो कागदांचा रोल टरकावून घेतला आणि माझ्या लक्षात आले की ते अक्षरशः 'मारुतीचे शेपूट' झाले होते. किमान पन्नास तरी शीट्स होत्या त्या!

टूर एजंटच्या सूचनेनुसार त्या प्रत्येक कागदावर ऑफिसरची सही घ्यायची होती. पण, श्री. संजय सिन्हांना माझी विनंती मान्य नव्हती. मी खूप विनवल्यावर ते म्हणाले, "अहो, तुमच्या प्रत्येक कागदावर मी सही करत बसलो तर माझी बाकीची कामे केंव्हा करू? पहिल्या व शेवटच्या कागदावर मी सही देतो. एकसंध छापलेला रोल असल्याने तेवढे पुरेल." 
खरे पाहता, मलाही श्री. सिन्हांचे म्हणणे पटत होते. परंतु, नंतर कुठे माशी शिंकायला नको, म्हणून मी टूर एजंटला तेथूनच फोन लावला. त्याने नाईलाजाने ते मान्य केले पण प्रत्येक पानावर बँकेचा शिक्का मात्र मारून घ्यायला मला सांगितले. 

माझा फोन झाल्यावर श्री. संजय सिन्हा पुन्हा हसतमुखाने मला म्हणाले, "साहेब, ही अशी कामे आम्ही नेहमीच करतो. तुम्हाला व्हिसाकरता हे स्टेटमेंट हवे असणार. काळजी करू नका. मी वर-खाली दोन सह्या केल्या आहेत. आता हा बँकेचा शिक्का घ्या, प्रत्येक पानावर जिथे हवा असेल तिथे-तिथे स्वतःच्या हातानेच शिक्का मारा आणि मला शिक्का परत करा."

स्टेटमेंट छपाईसाठी लागलेला वेळ, आणि शिक्के मारण्यासाठी मी घेतलेला वेळ जर वजा केला, तर माझे बँकेतले एकूण काम जेमतेम दहा-बारा मिनिटात झाले होते. माझ्याकडून मी काही केले असेल तर इतकेच, की बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्याशी मी शांतपणे, नम्रपणे आणि मुद्देसूद बोललो होतो.

"सरकारी बँकेतले लोक उगाच वेळखाऊपणा करतात, उर्मटपणे बोलतात, काम कसे टाळता येईल हेच बघतात..." वगैरे तक्रारी काही प्रमाणात खऱ्या असतीलही, पण चांगले अनुभवदेखील खूपदा येतात. असे आलेले अनुभव आपण सर्वांनी जर आवर्जून इतरांना सांगितले तर बँक कर्मचाऱ्यांबाबतचे पूर्वग्रह काही प्रमाणात कमी होतील अशी मला आशा आहे.

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

Really true sir
Among my visits at sbi miraj wanless branch i always had good
Cooperation and out of hundred may had undue extra time only once or twice that was also because of technical issues.