रविवार, ६ मार्च, २०२२

'प्रेस्टीज'चा प्रश्न


आपल्या मनाच्या कप्प्यांमध्ये अनेक जुन्या आठवणी दडून असतात. कोणत्या प्रसंगामुळे कुठली आठवण जागी होईल, काही सांगता येत नाही. एके दिवशी गुलज़ारसाहेबांच्या 'परिचय' या गाजलेल्या सिनेमातल्या एका प्रसंगाची आठवण अशीच जागृत झाली.  
 
वर्तमानपत्रात आलेली, 'प्रेस्टीज' कुकरची एक जाहिरात स्वाती वाचत होती. 'जुने द्या, नवे घ्या' अशा स्वरूपाची ती एक स्कीम होती. जाहिरातीत दिलेल्या नंबरवर चौकशी करता असे समजले की कोणत्याही कंपनीच्या जुन्या कुकर, कढई, किंवा पॅनवर, प्रेस्टीज कंपनीची तसलीच एखादी नवी वस्तू २० ते ४० टक्के स्वस्तात मिळणार होती. 

"आपल्याकडचे दोन्ही कुकर आणि एक पॅन जुनेच झालेत. ते बदलून आपण नवीन घेऊ. जरा ते बाहेर काढून ठेवतोस का?" 

माझा असा अनुभव आहे की, असली कामे नेहमीच अतिशय मोघमपणे सांगितली जातात. त्यामुळे त्यात चुका होण्याची (आणि अर्थातच त्यासाठी बोलणी खाण्याची) शक्यता अधिक असते. 

दोन्ही कुकर मी लगेच काढून ठेवले. परंतु, पॅनचे नेमके वर्णन मला सांगितले गेले नसल्याने, संपूर्ण द्रोणागिरी पर्वतच उचलून आणणाऱ्या मारुतीरायाचे उदाहरण समोर ठेवून, घरातील सगळी पॅन्स काढून मी स्वातीसमोर ठेवली. 

"अरे, ही सगळी चांगली पॅन्स आहेत! ही भंगारात नाही टाकायचीयत मला. नेमकं ते पॅन सोडून बाकीची सगळी पॅन्स तू काढून ठेवलीस! शी बाबा, तुला एकही काम सांगायची सोय नाही..." 

शेवटचे, परिचयाचे वाक्य कानावर येताच मी सावध झालो.

पॅनचे नेमके वर्णन मला आधी सांगितले गेले नव्हते, हा मुद्दा भांडणाकरता हातचा ठेवून, मी तात्पुरता बचावाचा पवित्रा घेतला. त्या ३-४ पॅन्सपैकी एक हँडल-मोडके पॅन फारसे वापरले जात नसल्याने, त्याच्याकडे बोट दाखवत मी म्हणालो, "हे पॅन नक्कीच काढून टाकायच्या लायकीचे आहे. मला असं वाटलं की हेच पॅन शोधायला तू मला सांगितले होतेस." 

"छे छे, या पॅनचे टेफ्लॉन कोटिंग अजून शाबूत आहे आणि ते मी कधी-कधी वापरते. उगीच कशाला नव्याच्या मोहापायी ते देऊन टाकायचं?"

या प्रश्नावर काहीच उत्तर किंवा प्रतिवाद संभवत नसल्याने मी गप्प बसलो. 'काम सांगायच्या लायकीचा माणूस' नसल्याने अर्थातच त्या कामातूनही माझी सुटका झाली!

दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टला त्या हॅण्डलतुटक्या पॅनमध्ये तेलावर हलके परतलेले, पनीर-मश्रूम समोर आले. अर्थात, तो पदार्थ उत्तम झाला असला तरी, त्या पॅनचे त्यामध्ये काहीच श्रेय नव्हते. 

ब्रेकफास्ट झाल्यावर स्वाती म्हणाली, "तुझ्या आवराआवरीच्या नादात ते पॅन घासायला टाकू नको बरं का! नंतर त्याच पॅनमध्ये मी भाजी करणार आहे."

हे वाक्य ऐकले आणि त्या पॅनकडे पाहत मी मनाशी म्हटले, "अरे वा! आज अगदी डबल ड्यूटी? तुझं भंगारात चाललेलं प्रेस्टीज वाचवलंस की गड्या!" 

टेबलवर बसलेला तो 'गडी'देखील माझ्याकडे विजयी मुद्रेने पाहत असल्याचा भास मला झाला.  

आणि अचानकच, तो "परिचय'  सिनेमातला सीन मला आठवला. 

सिनेमाचा हीरो, तरुण पदवीधर रवि (अभिनेता जीतेंद्र) नोकरीच्या शोधात असतो. एका शेटजींकडे त्याला कारकुनाची नोकरी मिळते. शेटजी सांगतात, "काम तसं फार नाहीये. रोज २-४ इंग्रजी पत्रे टाईप करायची, आणि महिन्याच्या शेवटी बिलं काढायची, इतकंच. आमचा जुना कारकून आता म्हातारा झालाय. असंख्य चुका करतो. त्याच्याकडून आता फार काही अपेक्षा ठेवता येणार नाहीत. म्हणूनच त्याच्या जागी मी तुला घेतोय."

एवढं बोलून शेटजी त्या जुन्या कारकुनाला बोलावतात आणि रविला काम समजावून द्यायला सांगतात. 

त्या जुन्या, म्हाताऱ्या कारकुनाला कल्पना आलेली असते की आता त्याची नोकरी जाणार आहे आणि ती रविला मिळणार आहे. तरीदेखील रविला काम समजावून देताना, आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल तो अगदी अभिमानाने बोलत असतो. 

सगळं सांगून झाल्यावर तो रविला म्हणतो, "शेटजी फार चांगले आहेत. माझ्या कुटुंबाला त्यांनी खूप आधार दिलाय. शेटजींनी मला जायला सांगितलं नाही. मी स्वतःच त्यांना विनंती केली की आता मला रिटायर करा... " 

रविला असे खोटेच सांगता-सांगता, त्याला अभावितपणे हुंदका फुटतो. 

स्वाभिमान जपायची त्याची केविलवाणी धडपड पाहून, रविला त्याची दया येते आणि तो स्वतःच ती नोकरी स्वीकारत नाही. 

जेमतेम दोन मिनिटांचा तो सीन माझ्या मनात अनेक वर्षे कुठेतरी दडून होता. भंगारात जाता-जाता वाचलेल्या त्या पॅनकडे पाहताना ती आठवण अचानक जागी झाली होती.

मग मनात विचार आला, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केंव्हा ना केंव्हा असेच घडत असेल का? 

"आता आपण निवृत्त झालो, आता वय झालं. आपल्या मुलांचे आचार-विचार, राहणं-खाणं, आवडी-निवडी सगळंच वेगळं आहे. नातवंडांच्या आयुष्याचा तर नुसता वेग पाहूनच आपल्याला भोवळ येते. आपण आता मिसफिट झालोय... " असे विचार कितीतरी माणसांच्या मनात येत असतील. 

मग, आसपासच्या वातावरणाशी रेलेव्हंट राहण्यासाठी, कालबाह्य न होण्यासाठी, प्रवाहातून बाहेर फेकले न जाण्यासाठी माणसं अशीच धडपडत असतील ?

अजूनतरी मला या बाबतीत स्वानुभव नाही. आणि त्यामुळे माझ्या या प्रश्नाचे निश्चित उत्तर माझ्यापाशी नाही. 

अज्ञानात खरंच खूप सुख असतं. नाही का?

१० टिप्पण्या:

Aviator म्हणाले...

सुंदर!👌😀

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙂🙏

नितीन चौधरी म्हणाले...

असं होतं खरं. पणं सृष्टीचा नियम आहे, वरिष्ठांनी back seat घ्यावीच लागते. काल लोकसत्ताच्या अग्रलेखात या विषयी छान लिहिलय. आज हा ब्लॉग मनाला भावला.

Milind Ranade म्हणाले...

फारच उत्तम तुलना केली आहे कर्नल. कालानुसार बदल होत असतात अन त्यातच माणसाचा टिकून राहण्यासाठी प्रयत्न. बर्‍याचदा हॅन्डल नीट असुन ही पॅन (माणूस) टाकाऊ होतो कारण हॅन्डल करण्याचीच पद्धतच बदलते.
मिलिंद रानडे

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

वा, मिलिंद! 👌
अतिशय मार्मिक आणि आशयगर्भ प्रतिक्रिया!
धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

खरंय.
धन्यवाद 🙏

Ajit vaidya म्हणाले...

Very nicely narrated sir. Your sense of humour is marvelous. Worth reading

V.R.Kulkarni. म्हणाले...

१. एका छोट्या प्रसंगातून तुम्ही मोठा विचार मांडलात. 'जुन्या कुकरचा' प्रश्न प्रत्येक माणसाला कधी ना कधी पडतोच. कुकर असो अथवा माणूस, ॲटॅचमेंट आली की, मोह-माया आलीच. 😀😀

२.प्रवाहातून बाहेर न पडण्यासाठी, आपले महत्त्व अबाधित राखण्यासाठी केविलवाणी धडपड करणारी अनेक माणसे आपल्या आजूबाजूला असतात. वास्तविक त्यांचेही चूकीचे नसते. जणुकाही स्वत:च्या अस्तित्वाची ती लढाई असते.
👍👍

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

अगदी खरं. 🙂🙏

Shruti Karmarkar म्हणाले...

Really touching !!