सफरीच्या पाचव्या दिवशी, नाश्ता लवकर उरकून आम्ही हॉटेल सोडले. आमच्या सफरीचा कप्तान देवाशीष आणि आमची सून आकांक्षा आमच्यासोबत येणार नव्हते. पुढचे तीन दिवस त्या दोघांचाच संयुक्त अरब अमिरातीमध्ये दौरा होता. तो आटोपल्यावर ते आम्हाला परतीच्या मस्कत-मुंबई प्रवासासाठी थेट मस्कत विमानतळावरच भेटणार होते.
ओमानच्या समुद्रकिनाऱ्यावर मस्कतपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर नावाच्या शहराकडे आमच्या मिनीबसने आम्ही निघालो. वाटेत एक-दोन प्रेक्षणीय 'वादियाँ' पाहत दुपार-संध्याकाळपर्यंत सूरला पोहोचायचे होते. आमचा गाईड, अल नासर आमच्यासोबत होताच. मस्कत सोडल्यानंतरचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगत जात नसल्याने, आजूबाजूचे निसर्गचित्र रुक्षच दिसत होते. चाकाखालचा रस्ता तेवढा मऊसूत असल्याने प्रवासाचा शीण अजिबात जाणवत नव्हता.
मस्कतपासून अंदाजे १०० किलोमीटर अंतरावर समुद्राच्या किनारी कुरियात नावाच्या एका लहान गावाकडे जाणारा फाटा लागला. आम्ही आधी वाचलेल्या वर्णनावरून असे समजले होते की ते एक पुरातन 'फिशिंग व्हिलेज' असून तिथल्या मच्छीमारांच्या बोटी आणि मासळी बाजार पाहण्यासारखा आहे. वर्णनावरून तरी आम्हाला अशी शंका आली होती की ते पर्यटकांना भुलवण्यासाठी केलेले एखादे 'फिशी' ठिकाण असावे. अल नसरनेही आमच्या शंकेला दुजोराच दिला. ज्याने कोकणातली कोळ्यांची वस्ती आणि मासळीबाजार पाहिलेला आहे त्यांना वाळवंटातलगतच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर विलक्षण अद्भुत असे काही पाहायला मिळायची शक्यता कमी असल्याने, कुरियातच्या फाट्याला आम्ही फाटा दिला आणि सरळ पुढे निघालो.
काही अंतर गेल्यावर हमरस्ताच आपसूक किनाऱ्याच्या दिशेने वळला आणि समुद्रकिनाऱ्याला समांतर धावू लागला. किनाऱ्यापासून सुमारे ६०० मीटर आत असलेल्या 'बिम्माह सिंक-होल' नामक ठिकाणी आमची बस थांबली. या जागेचे वर्णनदेखील आम्ही आधी वाचलेले होते. या भागात चुनखडीच्या दगडांचे प्रमाण खूप आहे. कदाचित हजारो वर्षांपूर्वी, एका ठिकाणची चुनखडी भुसभुशीत होऊन ती जमीन खचली आणि एक मोठा खड्डा तयार झाला. त्या खड्ड्याखाली पाण्याचा झराही असल्याने तिथे एक छोटे सरोवर तयार झाले. जमिनीपासून सुमारे ६०-६५ फूट खाली असलेले, नीलमण्याच्या रंगाचे हे तळे सव्वादोनशे फूट लांब आणि दीडेकशे फूट रुंद आहे. कडे-कडेने पाण्यातून चालत जाण्यासारखे किंवा डुंबण्याजोगे असले तरी मध्यभागी त्या तळ्याची खोली अंदाजे ३०० फूट आहे असे वाचले होते. जमिनीवरून खाली तळ्याजवळ उतरण्यासाठी जिना केलेला होता. आम्ही पाहिले तेंव्हा त्या सिंक-होल'मध्ये काही पर्यटक डुंबत असलेले दिसले. एक मनुष्य तळ्याशेजारच्या कपारीतून वर चढत जाऊन त्या तळ्यात उड्यादेखील मारत होता. कडक उन्हाची वेळ असल्याने जमिनीवर तापमान बरेच होते. पण खाली तळ्याजवळ उतरताच आल्हाददायक गारवा जाणवला. पुढे प्रवास करायचा असल्याने, कितीही मोह झाला तरी आम्हाला डुंबायला वेळ नव्हता. फक्त फोटो काढले आणि तिथून परत फिरलो.
पुढे सूरपर्यंतचा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगतच होता. आम्हाला अल नासरने सांगितले होते की सूरच्या अलीकडे 'वादी शब' आणि आणि 'वादी तिवी' अशा दोन 'वादियाँ' पाहण्यासारख्या होत्या. वाळवंटातल्या लोकांना दैनंदिन जीवनात पाण्याचे महत्व माहीत असल्यामुळे वादीचे अप्रूप असणे स्वाभाविकच आहे, कारण, डोंगरात एखादा झरा असल्यास त्याचे पाणी वादीमधूनच वाहत येते. 'वादी शब'जवळ पुष्कळ पर्यटक दिसले. वाहत्या पाण्यातून ते लोक बोटीने कुठेतरी जात होते. बोटीची फेरी करून परत येणाऱ्या एका भारतीय तरुणाकडून मी माहिती घेतली. १०-१५ मिनिटे बोटीतून जाऊन पलीकडच्या तीरावर ते डोंगरावर चढून आले होते. पण विशेष वेगळे असे काही पाहण्यासारखे नव्हते असे तो म्हणाला. थोडा वेळ तिथे थांबून आणि फोटो काढून आम्ही 'वादी तिवी'च्या दिशेने पुढे निघालो.
'वादी तिवी' मध्ये मात्र खूपच हिरवाई आणि फुलाफळांच्या बागा दिसत होत्या. आम्हाला बसमधून उतरवून अल नासर एका खासगी फार्ममध्ये घेऊन गेला. आपल्यासारख्या देशातील लोकांना अशा बागांचे फारसे कौतुक असायचे कारण नाही. पण या रुक्ष देशात फिरत असताना अचानक समोर आलेली, केळी, संत्री, पपयांनी लगडलेली झाडे व डेरेदार आंब्याची झाडे पाहून मन प्रसन्न झाले. पाणी साठवण्याकरता उंचावरच्या भागात हौद बांधून घेतलेले होते. एकमेकांना जोडणारे उभे-आडवे पाट संपूर्ण बागेतून काढलेले होते. उपलब्ध होणारे सगळे पाणी खुबीने वापरण्याची योजना केलेली होती. या वादीच्या दोन्ही बाजूंना बागा करण्यासाठी, ओमान सरकारने स्थानिक रहिवाश्यांना जमीन वाटून दिलेली आहे. इथे इतर व्यवसायाशी संबंधित बांधकामे करायला मनाई आहे, अशी माहिती अल नासरने आम्हाला पुरवली.
सूरमध्ये पोचायला दुपार होऊन गेली असल्याने भूक कडाडली होती. समुद्रकिनाऱ्यालगतच्या एका बऱ्यापैकी हॉटेलात बसून आम्ही अरबी जेवणावर ताव मारला. आता सूरमध्ये पाहण्यासारखे असे एकच महत्वाचे ठिकाण राहिले होते - ते म्हणजे काही शतकांपासून इथे कार्यरत असलेला बोटींचा कारखाना.
सहाव्या शतकापासूनच ओमानमधल्या ग्वादर, मस्कत, सूर, सलालाह येथील बंदरांचे महत्व व्यापाऱ्यांना समजलेले होते. बलुचिस्तानमधल्या कलात राज्याच्या खानाने अठराव्या शतकात, ग्वादर हे बंदर सांभाळण्यापुरते ओमानच्या राजाला देऊ केले होते. ते पुढची १५० वर्षे ओमानच्याच कब्जात राहिले. १९४७ नंतर बलुचिस्तानमधील सर्व संस्थाने पाकिस्तानात विलीन केली गेली. ओमानकडून ग्वादर बंदर परत मिळवण्यात पाकिस्तानला १९५८ साली यश आले. आज पाकिस्तानच्या संमतीनेच, चीनमधील शिंजियांग प्रांतातून ग्वादर बंदरापर्यंत, ३००० किलोमीटरचा थेट रस्ता बांधला जात आहे. आणि भारतासाठी दुर्दैवाची, आणि चीड आणणारी गोष्ट अशी, की पाकिस्तानने व्यापलेल्या, गिलगिट-बाल्टिस्तान या भारतीय भूभागातून तो 'China-Pakistan Economic Corridor' नावाचा रस्ता काढला जात आहे!
पूर्वीच्या काळी ओमानच्या मार्गाने होत आलेला व्यापार पाहता, सूरमध्ये बोटींचा कारखाना (Dhow Factory) उभारला गेला नसता तरच नवल वाटले असते. सध्या अस्तित्वात असलेला कारखाना सतराव्या शतकात सुरु झाला. त्यामध्ये पूर्वीपासून काम करणारे पुष्कळसे कारागीर भारतीय होते आणि आजही आहेत. या कारखान्यात आता लाकडी सांगाडा असलेल्या मोटरबोटी बनवल्या जातात. गेल्या तीन वर्षांपासून तिथे बनत असलेली एक मोठी लक्झरी बोट आम्ही पाहिली. सुमारे २१ कोटी रुपयांची ती बोट एक ओमानी व्यापारी बनवून घेत आहे असे समजले.
त्या फॅक्टरीच्या आवारातच एक भेटवस्तूंचे दुकान आणि एक छोटेसे संग्रहालय आहे. दुकानामध्ये बोटींच्या प्रतिकृती ठेवलेल्या होत्या ज्यांची लांबी हातभरापासून ते ४-६ फुटांपर्यंत होती. घरोघरी किंवा संस्थांच्या दर्शनी दालनात काचेच्या शोकेसमध्ये घालून त्या ठेवता येण्यासारख्या होत्या. खलाश्यांच्या जीवनाशी निगडित असलेल्या सुकाणू सारख्या इतरही अनेक वस्तू तिथे विकायला ठेवल्या होत्या. संग्रहालयामध्ये हिंडताना खूप नवीन माहिती मिळाली. बोट कारखान्याचा सतराव्या शतकांपासूनचा इतिहास, बोटी बनवताना वापरले जाणारे साहित्य आणि त्याची कृती, पूर्वापार होत आलेल्या सागरसफरींमध्ये वापरलेल्या विविध वस्तू, खलाशांनी वापरलेले जुने नकाशे, अनेक फोटो, शंभर वर्षांपूर्वीचे बोटीचे तिकीट, अशा अनेकविध वस्तू आम्ही पाहिल्या.
दिवसभराची आमची भटकंती पूर्ण झालेली होती. सूरमध्ये फक्त रात्रीपुरता मुक्काम होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाहिबाच्या वाळवंटाकडे कूच करायचे होते. हॉटेलमध्ये गेल्या-गेल्या समोर वेलकम ड्रिंक घेऊन एक मुलगी उभी होती. तिच्या ड्रेसवर लावलेले 'सौमिता' हे नाव वाचून ती बंगाली असावी असा मी अंदाज केला आणि हात जोडून 'धोंनोबाद' म्हटले. पाहुण्यांनी तिच्या मातृभाषेत आभार मानल्यामुळे अर्थातच ती सुखावली होती. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळेला शौमिता आणि शॉप्तर्षि या दोघांसोबत माझ्या थोड्या गप्पा झाल्या. दरम्यान गिरीश काउंटरवरून आमच्या खोलीच्या किल्ल्या घेत होता. तिथे ड्यूटीवर असलेल्या पाकिस्तानी तरुणीकडून त्याला काही आश्चर्यकारक माहिती मिळाली.
पण ते नंतर...
(क्रमशः)
©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)