शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ५)

मस्कत शहर पाहायला आम्ही बाहेर पडलो. आमच्या यादीमध्ये जुन्या शहरातला मत्रा 'सूक' नावाचा बाजार, जुना राजवाडा, रॉयल ऑपेरा हाऊस, आणि सुलतान काबूस मशीद या ठिकाणांचा समावेश होता. आमच्यातल्या हौशी 'शॉपर्स'ना सूकबरोबरच इथल्या मॉल्समध्येही जाऊन शॉपिंगचे सुख अनुभवायचे होते. पण अल नसरच्या सल्ल्यानुसार, सर्वप्रथम 'सुलतान काबूस ग्रँड मॉस्क' मध्ये जायचे ठरले, कारण ती मशीद सकाळी ११ नंतर दुपारच्या प्रार्थनेसाठी बंद होणार होती. ओमानमधल्या ठिकठिकाणच्या इमारतींना, उद्यानांना, संस्थांना ज्या व्यक्तीचे नाव दिलेले आहे त्या दिवंगत सुलतान काबूसबद्दल कुतूहल जागृत होणे स्वाभाविक आहे. 

इ.स. १७४४ मध्ये ओमानी वंशाच्या 'अल सैद' घराण्याचा पहिला शासक, 'इमाम अहमद बिन सैद अल बुसैदी' याने इराणी आक्रमकांना हुसकावून लावले आणि ओमान व झांझिबारमध्ये मध्ये एकहाती सत्ता स्थापन केली. त्यापुढे आजतागायत याच घराण्याची सत्ता ओमानमध्ये कायम आहे. 'काबूस बिन सैद अल सैद' हा ओमानच्या राजघराण्यातील चौदावा सुलतान होता. त्याचे महाविद्यालयीन शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. सँडहर्स्ट येथील ब्रिटिश मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर तो पुढील दोन वर्षे ब्रिटिश सैन्यात अधिकारी होता. १९६४ साली तो मायदेशी परतला. पण त्याचे पुरोगामी आणि स्वतंत्र विचार पसंत न पडल्यामुळे त्याच्या वडिलांनीच त्याला पुढील सहा वर्षे राजमहालामध्ये नजरकैदेत ठेवले. २३ जुलै १९७० ला काबूसने वडिलांविरुद्ध रक्तपातविरहित बंड केले आणि त्यांना निष्कासित करून तो ओमानचा नवा सुलतान झाला. या बंडाला ब्रिटिशांची फूस आणि अप्रत्यक्ष मदत होती असे बोलले जाते. परंतु, जे झाले ते ओमानच्या भल्यासाठीच झाले असे आता म्हणता येईल. 

सुलतान काबूसने सत्ता हाती येताच काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. गेली अनेक वर्षे स्वतःच्याच कोषात बंद होऊन जगापासून तुटलेल्या ओमान देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध त्याने पुनर्स्थापित केले. १९६० च्या दशकात ओमानमध्ये मोठ्या प्रमाणावर तेलसाठे सापडले होते. खनिज तेलाच्या निर्यातीमधून मिळत राहिलेला पैसा वापरून संपूर्ण देशभरात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा सुलतान काबूसने चंग बांधला. १९७० साली संपूर्ण ओमानमध्ये केवळ तीन शाळा होत्या ज्यात फक्त ९०० मुले शिकत होती. ओमानमधल्या एकाही मुलीने शाळा पाहिलीदेखील नव्हती. आज त्या देशातल्या एकूण १८०० देशी आणि आंतरराष्ट्रीय शाळांमधून साडेसात लाख विद्यार्थी शिकत आहेत, आणि त्यापैकी मुलींची संख्या सुमारे ५० टक्के आहे. ओमानमध्ये २१ भारतीय शाळा आहेत ज्यामध्ये भारतीय संस्कृतीला अनुसरून शिक्षण दिले जाते. ही माहिती आम्हाला पुढे वाहिबाच्या वाळवंटात भेटलेल्या एका भारतीय हिंदू डॉक्टरकडून मिळाली. ओमानमध्येच जन्मलेली त्याची धाकटी मुलगी अशाच एका 'इंडियन स्कूल' मध्ये शिकत होती.  

जी गत शिक्षणाची, तीच पूर्वी आरोग्यव्यवस्थेची आणि मूलभूत सुविधांची होती. १९७० साली मस्कतच्या रस्त्यांवर पथदिवेही नसल्याने लोक कंदील घेऊन हिंडत असत. घरोघरी वीज आणि नळातून येणारे पाणी कुणी बघितलेही नव्हते. संपूर्ण देशभरात फक्त एक ब्रिटिश व एक अमेरिकी अशी दोनच रुग्णालये होती ज्यामध्ये केवळ १३ डॉक्टर कार्यरत होते. प्राथमिक आरोग्यसेवेसाठी कित्येकांना ३-४ दिवसांची पायपीट करावी लागे. आता ओमानमध्ये सरकारी व खाजगी मिळून ७० मोठी रुग्णालये आहेत. त्या मोठ्या रुग्णालयातून आणि लहान-सहान खाजगी दवाखान्यांमधून हजारो डॉक्टर सेवा देत आहेत. ओमानमध्ये कित्येक भारतीय डॉक्टर्सही काम करतात. ओमानसफरीला निघण्यापूर्वी अशा दोन वेगवेगळ्या डॉक्टरांशी आमचा संपर्क झाला होता जे दोन-अडीच दशके ओमानमध्ये राहून काम केल्यानंतर आता परत येऊन पुण्या-मुंबईत स्थायिक झाले आहेत.  

१९७० मध्ये ओमानमधल्या दळणवळणाची अवस्था तर अठराव्या शतकातल्या भारतात जी काही असेल त्यापेक्षा वाईट होती. देशभरात एकूण फक्त १० किलोमीटर पक्के आणि १८०० किलोमीटर कच्चे रस्ते होते. आज ओमानमध्ये ३०००० किलोमीटर पक्क्या रस्त्यांचे जाळे देशभर पसरलेले आहे. त्याशिवाय, वाळवंटातल्या वाड्यावस्त्यांना जोडणारे आणखी ३०००० किलोमीटर लांबीचे कच्चे रस्ते आहेत. आमच्या सफरीत ओमानमध्ये आम्ही पाहिलेले एकूणएक रस्ते भलतेच मुलायम होते. काही डोंगराळ भागात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे खराब झालेला तुरळक भाग वगळता, एकाही हमरस्त्यावर किंवा शहरातील सडकेवर एकही खड्डा नव्हता. 

ओमान हा पूर्वीपासूनच एक इस्लामी देश आहे. परंतु, १००-१२५ वर्षांपासून इथे व्यापारानिमित्त स्थायिक झालेल्या गैरमुस्लिमांची संख्या कमी नाही. १८७० साली गुजरातमधल्या मांडवीतून इथे येऊन व्यापाराला सुरुवात केलेले रामदास ठाकरसी व त्यांचा मुलगा खिमजी यांची 'खिमजी रामदास आणि कंपनी' आज ओमानमधील मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्थांपैकी एक आहे. शेठ खिमजींचा नातू, कनकसी गोकुळदास खिमजी यांना सुलतान काबूसने 'शेख' ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान केली. त्यामुळे, ते जगातील एकमेव हिंदू शेख ठरले आहेत! 

सुलतान काबूसच्या धर्मविषयक उदारमतामुळे ओमानमध्ये धार्मिक तेढ अस्तित्वात नाही. इथल्या कायद्यानुसार प्रत्येकाला आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि धर्मा-धर्मात भेदभाव करणे वर्ज्य आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे साडेपाच टक्के लोक हिंदू आणि साडेसहा टक्के लोक ख्रिश्चन आहेत. या दोन्ही धर्मांच्या प्रार्थनास्थळांसाठी सुलतान काबूसने सरकारी जमीन देऊ केली. त्यापूर्वीच काही सिंधी व्यापाऱ्यांनी १९०९-१० साली मस्कतमधल्या जुन्या  राजवाड्याजवळ मोतीश्वर महादेव मंदिर बांधलेले होते जे आजही अबाधित आहे. त्या मंदिरात पूजाअर्चा आणि विविध सण-उत्सव नियमितपणे साजरे होतात. मस्कत, सलाला, सूर या शहरांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि श्रीगणेशाची चार प्रमुख मंदिरे आहेत. अल नसरसोबत आमची विस्तृत चर्चा झाली. त्यातून असे लक्षात आले की या देशात सर्वच धर्म आणि धार्मिक कार्यक्रम मुख्यत्वे घराघरांपुरते आणि आपापल्या प्रार्थनास्थळांपुरते मर्यादित आहेत. तसेच  परधर्माविषयी सार्वजनिक स्वरूपाची चर्चा किंवा टीका-टिप्पणी करणे निषिद्ध मानले जाते.

मस्कतदर्शनातला आमचा पहिला पडाव 'सुलतान काबूस ग्रँड मॉस्क' या भव्य मशिदीत होता. स्वतः सुलतानाने या मशिदीचे उदघाटन २००१ साली केले होते. सुमारे १०० एकर खुल्या जमिनीवर मध्यभागी बांधलेल्या या मशिदीची व्याप्ती १० एकर आहे. आजूबाजूला उरलेल्या ९० एकर जागेत उद्याने, हिरवळ आणि पार्किंग व इतर सोयी केलेल्या आहेत. भारत, इजिप्त, इटली, व ओमानमधील विविधरंगी संगमरवरी दगड आणि भारतातून आयात केलेला तीन लाख टन राजस्थानी लाल दगड वापरून ही मशीद बांधलेली आहे. या मशिदीत पुरुषांना व महिलांना प्रार्थना करण्यासाठी दोन स्वतंत्र दालने आहेत. त्यामध्ये ६५०० पुरुष व ७५० स्त्रिया एकावेळी प्रार्थना करू शकतात. त्याशिवाय,  चहूबाजूंनी असलेल्या ओसरीवर आणखी १५००० लोक गुडघे टेकून प्रार्थना करू शकतील इतकी जागा आहे. परंतु, अल नसरच्या सांगण्याप्रमाणे, मस्कतमध्ये इतरही मशिदी असल्याने आजपर्यंत अगदी ईदच्या प्रार्थनेसाठीही कधी इथे एवढी गर्दी जमलेली नाही. मशिदीच्या मुख्य दालनाच्या ४६७५० चौरस फूट फरशीवर एक मोठा इराणी गालिचा अंथरलेला आहे (चिकटवलेला नाही). एकवीस टन वजनाचा हा गालिचा २८ विविध रंगाच्या धाग्यांनी विणलेला आहे. इराणमधून आलेल्या ६०० स्त्री-पुरुष कारागिरांनी चार वर्षे खपून हा गालिचा त्या जागेवरच स्वतःच्या हातांनी विणून तयार केला होता. त्यावेळी तो जगातला सर्वात मोठा एकसंध गालिचा होता. अल नासरने आम्हाला हसत-हसत सांगितले की या मशिदीच्या उदघाटन सोहळ्यात उपस्थित राहून परत गेल्या-गेल्या संयुक्त अरब अमिरातीच्या सुलतान झाएदने एका इराणी कंपनीकडे याहीपेक्षा मोठ्या गालिच्याची ऑर्डर नोंदवली. त्यामुळे, २००७ साली उदघाटन झालेल्या अबू धाबी येथील 'शेख झाएद मशिदी'मध्ये आज इथल्यापेक्षाही मोठा गालिचा अंथरलेला आहे!

ओमानमध्ये १९७० सालापर्यंत संगीत-नृत्य-कला यांना मज्जावच होता. रेडिओ बाळगणे हा गुन्हा होता आणि त्यासाठी कडक शिक्षेची तरतूद होती. संपूर्ण देशात केवळ एक मिलिटरी बँड होता, पण त्यातील वादकही ओमानी नव्हे तर बलुची सैनिक होते. सुलतान काबूसने ओमानी आणि बैदू जमातीच्या लोकसंगीत व नृत्याच्या प्रसाराला प्रोत्साहन दिले आणि देशभरात या सर्व कलांना व्यासपीठ मिळवून दिले. स्वतः सुलतान काबूस याला संगीत-नृत्य-कला यांमध्ये रुचि होती. त्याची साक्ष म्हणून, भारताचे ओमानमधील माजी राजदूत श्री. अनिल वाधवा यांनी लिहिलेला अनुभव पुरेसा बोलका आहे. भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्वागतार्थ २००९ साली आयोजित केलेल्या शाही भोजनादरम्यान वाजणाऱ्या संगीतासोबत सुलतान काबूसने अभावितपणेच टेबलावर ठेका धरलेला वाधवांनी स्वतः पाहिला होता!

मस्कतमधले 'रॉयल ऑपेरा हाऊस' सुलतान काबूसच्या कलाप्रेमाचे एक सुंदर प्रतीक आहे. याचेही उदघाटन स्वतः सुलतान काबूसनेच २०११ साली केले होते. कलात्मक पद्धतीने रचलेले-सजवलेले हे संगीत-नाट्यगृह अतिशय प्रेक्षणीय आहे. खुर्च्या आणि बॉक्सेस मिळून यात ११०० प्रेक्षकांना बसायची सोय आहे. इथला रंगमंच केवळ फिरता किंवा सरकताच नव्हे तर खाली-वर हलणाराही आहे. एक कळ दाबताच रंगमंचासमोरचे 'पिट' आणि खुर्च्यांच्या पहिल्या दोन रांगा जमिनीखाली जातात, आणि दुसरी कळ दाबून स्टेजची लांबी (खोली) वाढवता येते. ओमानी संगीताच्या मैफली, शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम, सैनिकी बँडच्या सांगीतिक कवायती, देशोदेशीचे वाद्यवृंद, ऑपेरा संच, अशा अनेक प्रकारच्या  कार्यक्रमांनी या संगीत-नाट्यगृहाचे वार्षिक वेळापत्रक भरगच्च असते. आम्ही तिथे गेलो तेंव्हा, म्हणजे ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान जॉर्डन व ऑस्ट्रियाच्या सैन्यदलांच्या बँड्सचे सादरीकरण होणार होते. नुकताच, म्हणजे ३०-३१ ऑक्टोबरला तिथे भारतीय सतारवादक उस्ताद निशात खान यांचा कार्यक्रम होऊन गेला होता. तो कार्यक्रम ऐकून आलेली एक ऑस्ट्रियन बाई आम्हाला क्रूझच्या बोटीवर भेटली होती व तिने त्याचे फोटोही आम्हाला दाखवले होते.

मत्रा 'सूक' हा आमचा दिवसभरातला शेवटचा थांबा होता. खरे सांगायचे तर मला तिथे जाण्यात काडीचाही रस नव्हता. पण आमच्यापैकी उत्साही 'शॉपर्स' आणि 'विंडो शॉपर्स' तिथे हिंडून आले. सर्वसाधारणपणे पर्यटकांना आकर्षित करणारी जी दुकाने गावोगावी असतात तशीच तिथेही होती. 'आलोच आहोत तर काहीतरी घ्यावे' अशा विचाराने प्रेरित होऊन काहींनी तिथे अत्तरे, 'लोबान' वगैरे खरेदीही केली. परतीच्या वाटेवर जुना राजवाडा, म्हणजे 'अल आलम पॅलेस' आम्हाला बाहेरूनच पाहता आला. आत जाण्याची परवानगी नसल्याने, राजवाड्यासमोर उभे राहून आम्ही फोटो मात्र काढून घेतले.

पुढच्या दिवशी, आम्ही मस्कत किंवा ओमान-दर्शन करणार नव्हतो. एका निराळ्याच जगात आम्हाला जायचे होते. कमालीची उत्सुकता आमच्या मनात होती... 

(क्रमशः)

©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)


२ टिप्पण्या: