रविवार, १० नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग १)

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत पर्यटनासाठी कुठेतरी बाहेर जायचे होतेच. ओमान देशामधे एक-दोन दशके नोकरी-व्यवसायानिमित्त राहिलेल्या काही व्यक्तींकडून त्या देशाबद्दल आम्हाला खूपच चांगले ऐकायला मिळाले होते. त्यामुळे तो देश पाहायची इच्छा झाली होती. पूर्वी फार काही ऐकले-वाचले नसले तरी मस्कती डाळिंबाचे नाव तेवढे लहानपणापासून ऐकून होतो. 
सौ. स्वातीचा भाऊ गिरीश, त्याची पत्नी प्राची, मुलगी दीपशिखा, आणि मुलगा-सून म्हणजे देवाशीष-आकांक्षा, असे सर्वजण दिवाळीत ओमानच्याच सफरीवर जायचा बेत ठरवत होते. मग मी, स्वाती, आणि तिचे वडील (दादा) असे तिघे त्यांना सामील झालो.

देशा-परदेशातल्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्या-त्या प्रदेशाची जुजबी माहिती मिळवण्याचा प्रयत्न मी नेहमी करतो. स्वातीला पर्यटनाची आवड असल्याने तीही अनेक पर्यटकांनी बनवलेले व्हिडिओ पाहत असते. ओमानमधल्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती तिने काढली. ओमानचा इतिहास, भूगोल आणि तिथल्या लोकांविषयी मी वाचून काढले. 

अरबस्तानच्या आग्नेय टोकाला असलेला ओमान हा तसा एक लहान देश आहे. ओमानच्या ईशान्येकडे ओमानी आखात आणि आग्नेयेला अरबी समुद्र असल्याने त्याला लांबलचक किनारपट्टी लाभली आहे. परंतु किनाऱ्यापासून आत आले की सगळा प्रदेश डोंगराळ आणि वाळवंटी आहे. विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे अनेक शतकांपासून भारत, चीन आणि आफ्रिकी देशांसोबत ओमानचे व्यापारी संबंध आहेत. 

मुहम्मद पैगंबराच्या हयातीतच ओमानमध्ये मोठ्या प्रमाणात इस्लामचा प्रचार-प्रसार झाला. सुरुवातीला  'सुन्नी' इस्लाम मानणारा हा देश सातव्या शतकापासून हळूहळू 'इबादी' इस्लामचा अनुयायी झाला. इबादी पंथाचे लोक काहीसे मवाळ आणि कट्टरपंथी सुन्नींपेक्षा अधिक सहिष्णुता मानणारे आहेत. इस्लामच्या मूळ शिकवणीशी सर्वाधिक साम्य त्यांच्या पंथाचे आहे असे ते मानतात. गेल्या काही शतकांत भारत, पाकिस्तान, व बांगलादेशातून येऊन ओमानमध्ये स्थायिक झालेल्या सुन्नी लोकांमुळे इथल्या लोकसंख्येत लक्षणीय बदल झाला आहे. आता इथे सुमारे ४५% इबादी, ४५% सुन्नी आणि उरलेले इतरधर्मीय लोक आहेत. 

आमच्या प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. इथले बहुसंख्य धनिक व्यापारी आणि  राज्यकर्ते मूळ ओमानी वंशाचे आहेत. परंतु लहान-सहान दुकानदार, हॉटेलांमधले वेटर, पेट्रोल पंपावरचे कर्मचारी, बांधकाम किंवा सुतारकाम करणारे कामगार हे सगळे बाहेरच्या देशातून इथे पोटापाण्यासाठी आलेले आहेत. त्यातले बहुसंख्य लोक भारतीयच आहेत. त्यामुळे, आम्ही जाऊ तिथे खुशाल हिंदीतच संवाद सुरू करायचो आणि समोरून हिंदीतच प्रत्युत्तर येई. 

आम्हाला इथल्या हॉटेल-रिसॉर्टमध्ये मुख्यत्वे केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील तरुण-तरुणी भेटले.
ओमानच्या राष्ट्रीय संग्रहालयात भेटलेला पुण्याचा ज्ञानेश, सूरच्या हॉटेलातले कोलकात्याचे शॉप्तर्षी चॉक्रोबोर्ती किंवा शौमिता, आणि वहिबा वाळवंटातल्या रिसॉर्टमधली नाशिकचे ईशा, हर्षवर्धन, कुणाल वगैरे मुला-मुलींशी झालेल्या गप्पांवर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. पण तो नंतर... 
पक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: