गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ८)

सूरमधल्या हॉटेलात नाश्ता उरकून आम्ही ओमानच्या शार्किया प्रांतात असलेल्या 'वाहिबा सँड्स' च्या दिशेने निघालो. आम्ही आज जिथे राहणार होतो ते 'रिसॉर्ट' एका वैराण वाळवंटाच्या आत होते. तिथपर्यंत जायला एक कच्चा वालुकामय रस्ता होता. अशा रस्त्यांवर साध्या मोटरगाड्या किंवा बसेसची चाके घसरतात. त्यामुळे आम्हाला '४ X ४, किंवा फोर व्हील ड्राइव्ह' गाडीने जाणे भाग होते (जिच्या चारही चाकांना इंजिनाची चाल मिळते अशी गाडी). आम्हाला 'बिदियाह' नावाच्या गावातल्या एका पूर्वनियोजित ठिकाणापासून पिकअप करायला आमच्या रिसॉर्टनेच दोन ४ X ४ गाड्यांची व्यवस्था केलेली होती.

त्या गावाजवळच आम्ही एका ठिकाणी हलके अरबी जेवण जेवलो आणि आमची बस 'बिदियाह' गावात येऊन थांबली. आम्हाला घेऊन जायला आलेल्या दोन मोटारगाड्या तिथे येऊन आधीच थांबलेल्या होत्या. बिदियाह गावापासून  'Thousand Nights' कँम्प सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर होता. आमच्या गाडीचा ड्रायव्हर स्थानिक 'बैदू' जमातीतला एक तरुण होता. त्याच्या बोलण्याचा 'लहेजा' निश्चितच अल नासर किंवा इतर ओमानी माणसांच्यापेक्षा वेगळा होता. अल नासरसोबत त्याची टकळी अखंड चालू होती. त्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तो त्या वालुकामय रस्त्यावरून वेगात पण अत्यंत सफाईदारपणे गाडी चालवत होता. आमच्या गाडीत दादा असल्यामुळे, "गाडी शक्यतो कमी वेगात आणि हादरे बसणार नाहीत अशा पद्धतीनेच चालवावी लागेल" ही आम्ही अल नसरला दिलेली सक्त ताकीद त्याने ड्रायव्हरला कळवली असावी असे वाटले. कारण आमच्या कुटुंबाचीच दुसरी गाडी सुसाट पुढे निघून गेली होती. 
चहूकडे रेताड जमीन आणि वाळूच्या टेकड्या दिसत होत्या. अधूनमधून 'वाळवंटातली जहाजे' - म्हणजे उंट-चरताना दिसत होतेच. एका झोपडीवजा घरापाशी आमची गाडी थांबली. त्या झोपडीशेजारीच तारांच्या कुंपणाच्या  आत उंट होते.  "ही वाळवंटातच वास्तव्य करणाऱ्या 'बैदू' लोकांची झोपडी आहे. त्यांच्या 'जीवनशैलीचे दर्शन' होऊ शकेल" असे अल नासरने आम्हाला सांगितले होते. मात्र, 'बैदू' जीवनशैलीचा आभास निर्माण करण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता इतकेच मला जाणवले. तिथे आलेले काही गोरे पर्यटक मात्र त्या वातावरणामुळे 'भारावून गेलेले' वाटले. पुढच्या वाटेला लागल्यावर अल नासर हळूच म्हणाला, "आजकाल या वाळवंटांमध्ये 'बैदू' राहतच नाहीत. तुम्ही बिदियाह गावात एक पक्क्या घरांची वस्ती पाहिलीत ना? हे 'बैदू' तिकडे राहतात आणि दिवसा फक्त उंट चारायला वाळवंटात येतात!" 

काही वेळातच, 'Thousand Nights' कँम्पच्या समोर येऊन गाडी थांबली. वाळवंटात अचानक समोर दिसलेले ते 'रिसेप्शन लाउंज' पाहून गंमतच वाटली. आमच्या 'तंबू'च्या किल्ल्या घेण्यासाठी आम्ही काउंटरपाशी थांबलो होतो. आजच्या जमान्यात प्राणवायूइतकेच अत्यावश्यक झालेले 'वाय-फाय' कनेक्शन इथे उपलब्ध आहे म्हटल्यावर 'हुश्श' झाले. काउंटरवरची मुलगी गिरीशला 'वाय-फाय'चा पासवर्ड सांगू लागताच, तिच्या उच्चारांची ढब मला अगदी ओळखीची वाटल्यामुळे मी कान टवकारले. तिने पासवर्ड सांगताच मी तिच्याकडे पाहून म्हटले, "अरे वा! सोप्पा आहे" त्यावर डोळे विस्फारत ती शुद्ध मराठीत म्हणाली , "हो SSS ! अगदीच सोपा आहे!" लगेच चौकशी केली, तर ती नाशिकची ईशा आहे असे समजले. तिच्याच शेजारी उभा असलेला, नाशिकचाच हर्षवर्धनही लगबगीने पुढे आला. ओमानच्या वाळवंटी रिसॉर्टमध्ये आमच्या चक्क मराठीत गप्पा सुरु झाल्या. पण  गप्पा आवरत्या घेणे भाग होते, कारण सूर्यास्ताच्या आत आम्हाला वाळवंटातले काही विशेष अनुभव घ्यायला जायचे होते. 

खास वाळवंटात चालणाऱ्या स्कूटरवरून किंवा उंटांवरून फेरफटका मारता येणार होता, 'Dune Bashing Ride' घेता येणार होती.अर्थात, यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार होते.  Dune Bashing म्हणजे काय, तर एका ४ X ४ गाडीत बसवून वाळूच्या टेकड्यांवर रफ राईड! आर्मीच्या नोकरीत असताना, ईशान्य भारतात आणि राजस्थानमध्ये अनेक प्रकारच्या 'रफ राइड्स' मी केलेल्या असल्याने, पैसे भरून हाडे खिळखिळी करून घ्यायची मला अजिबात इच्छा नव्हती. स्वाती आणि गिरीशही इच्छूक नव्हते, आणि दादांना न्यायची तर कल्पनाही अशक्य होती. गिरीशची पत्नी प्राची आणि मुलगी दीपशिखा भलत्याच उत्साही असल्यामुळे त्या जायला निघाल्या. तिथेच त्यांना वाळवंटातला सूर्यास्तही दाखवणार होते. खरे पाहता सूर्यास्त सगळीकडे सारखाच असतो. तरीदेखील, समुद्राच्या पुळणीवरून, महाबळेश्वर किंवा माथेरानच्या 'सनसेट पॉईंट' वरून आपण तितक्याच औत्सुक्याने सूर्यास्त पाहतो हेही मानलेच पाहिजे!

सर्वप्रथम तंबूमध्ये सामान टाकून, जरा ताजे-तवाने होण्यासाठी आम्ही तंबूत गेलो. त्या वातानुकूलित तंबूमध्ये सर्व पंचतारांकित सोयी होत्या. खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. मी आणि गिरीश पाय मोकळे करायला अल नासरसोबत बाहेर पडलो आणि स्वाती दादांजवळ थांबली. अल नासर सहजच म्हणाला, "चला, आपल्याच गाडीतून तुम्हाला सूर्यास्त पाहायला नेतो. कोणत्या पॉईंटवरून बेस्ट दिसेल ते मला माहिती आहे !"
प्राची आणि दीपशिखा जो अनुभव पैसे भरून घेणार होत्या, तो आम्हाला फुकटात (आणि मुख्य म्हणजे आम्हाला हव्या त्या वेगाने) घ्यायला मिळतोय म्हटल्यावर आम्ही आनंदाने अल नासरसोबत निघालो. वाळूच्या टेकडीवर चढायला रस्ता असा नव्हताच, पण घाटामध्ये घेतात तशी वळणे घेत-घेत गाडी सफाईदारपणे चढत निघाली. पण टेकडीवर गेल्यावर मात्र 'योग्य जागे'च्या शोधात अनेक खड्ड्यांमधून आणि उंचवट्यांवरच्या अरुंद मार्गावरून आमचा बैदू चालक हिंडत निघाल्यामुळे आम्हालाही थोडेफार Dune Bashing करता आले. अर्थात, वेग जास्त नसल्यामुळे हाडे मात्र शाबूत राहिली! गाडीतून अनवाणी पायांनी उतरल्यावर मऊसूत वाळूत पावले लोळवत फिरायलाही मजा आली. अल नसरला अचानक मला 'शेख' बनवण्याची हुक्की आल्याने त्याने माझ्या डोक्यावर खास ओमानी पद्धतीचा फेटा बांधून माझा फोटोही काढला!

आसपास चिटपाखरूही नव्हते. वाऱ्यामुळे वाळूच्या टेकडीच्या कपाळावर पडलेल्या सुबक आठ्या मोजण्यात, आणि त्यावरून चालत गेलेल्या किड्यांच्या पायांच्या ठशांचा माग काढता-काढता, माझ्या आयुष्याची अनेक वर्षे नकळतच गळून पडली आणि मी पुन्हा शाळकरी मुलगा झालो! हळूहळू खाली जात चाललेल्या सूर्याकडे पाहत, 'कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा' असे म्हणेपर्यंत निघायची वेळ झाली. आम्ही गाडीत बसल्यानंतर अल नसरने घोषणा केली की आता आपण वळणे-वळणे घेत नव्हे तर वाळूच्या उभ्या कड्यावरून सरळ खाली उतरणार आहोत! कड्यांवरून गाड्या चढवण्या-उतरवण्याच्या अशा 'साहसी खेळां'चे व्हिडिओ मी पूर्वी पाहिले होते, पण अनुभव कधीच घेतलेला नव्हता. जी टेकडी चढायला आम्ही १५ मिनिटे घेतली होती, ती अक्षरशः तीस सेकंदात उतरून आम्ही खाली आलो आणि पुढच्या दोन मिनिटात कँम्पमध्ये परत पोचलोदेखील! तो अनुभव थरारक खरा, पण पुन्हा-पुन्हा घ्यावासा वाटण्यासारखा होता.  

वाळवंटातली संध्याकाळ तिथल्या दिवसाच्या तुलनेमध्ये खूपच आल्हाददायक असते, कारण तापमान बरेच खाली येते. रिसेप्शनला लागूनच एक 'कँम्प फायर'ची जागा होती. तिथे सात वाजल्यापासून शेकोटी पेटवलेली होती. त्या भोवती गोल रिंगण करून गाद्या घातलेल्या होत्या. लोक शांत बसून 'माहौल' चा आनंद घेत होते. शेजारी काही बैदू लोक आगीवर भाजलेल्या छोट्या-छोट्या गरम रोट्या खायला देत होते. तिथेच भेटलेल्या मुंबईच्या एका तरुण जोडप्याबरोबर माझ्या छान  गप्पा झाल्या. ते नवरा-बायको उत्साही पर्यटक होते आणि आजवर दोघे-दोघेच अनेक देश हिंडलेले होते. आता तर त्यांच्या वर्षभराच्या तान्ह्या मुलाला सोबत घेऊन, स्वतःच भाड्याची गाडी चालवत ओमानमधे सगळीकडे हिंडत होते! 
जवळच जेवणाच्या हॉलमध्ये बुफे लावलेला होता. पंचतारांकित हॉटेलात असतात तशा प्लेट्स, काटे-चमचे आणि सजावट होती. जेवणाचा मेनूदेखील पंचतारांकित आणि भरगच्च होता. तिथे जेवण बनवणारे, बुफे लावणारी मुले आणि तिथला केटरिंग व्यवस्थापक हे सगळे भारतीय व बांगलादेशी होते. त्यामुळे आमची विचारपूस ते अधिक आपुलकीने करीत होते. व्यवस्थापकानेही आवर्जून येऊन आम्हाला काय हवे-नको ते विचारून तशी सोय केली. 

जेवण झाल्यानंतर आम्ही जवळच असलेल्या एका हेलिपॅडवर गेलो. अहमद नावाचा एक खगोलशास्त्राचा अभ्यासक आमच्यासोबत होता. आसपास मनुष्यवस्ती अजिबात नसल्याने गडद अंधार होता. आकाशदर्शनाची मला तशी फारशी कधी गोडी लागलेली नाही. पण आमच्या दोन्ही मुलांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताकरता पदके जिंकलेली आहेत. त्याच्या पूर्वतयारीसाठी त्यांनी केलेल्या आकाशदर्शन मोहिमांमध्ये त्यांच्यासोबत जाण्याइतपतच माझा सहभाग असे. पण अहमद इतक्या उत्साहाने आणि आत्मीयतेने सगळी माहिती सांगत होता आणि प्रश्नांची उत्तरे देत होता, की माझ्यासारख्यालाही त्यात रस वाटावा. न राहवून मी त्याला त्याचे कारण विचारलेच. तो म्हणाला की, त्याला लहानपणापासून या विषयात रस होता. आता तर खगोलशास्त्राचा प्रचार-प्रसार करणे हाच त्याचा व्यवसाय होता. इथल्या पर्यटकांच्या गर्दीच्या काळात तो या कँम्पमध्ये येतो आणि इतर महिन्यांमध्ये इतरत्र जाऊन हेच काम करतो, असे त्याने सांगितले. 

अर्ध्या दिवसाच्या वास्तव्यात, वाळवंटातील भ्रमणाचा आनंद आम्ही पुरेपूर घेतला होता. दुसऱ्या दिवशी आम्ही मस्कतला परतणार होतो. अल नासरने रात्रीच्या जेवणानंतर आम्हाला बजावून सांगितले की, "उद्या मस्कतच्या वाटेवर, 'वादी बिन खालिद' या जागी आपण थांबायचे आहे. तिथल्या स्वर्गीय अनुभवासाठी तुम्हाला तीन तास देखील कमीच पडतील. त्यामुळे इथून सकाळी लवकर निघू या." 

उद्याचा विचार करता-करता, वाळवंटातल्या त्या शांत वातावरणात आम्हाला केंव्हा झोप लागली समजलेही नाही... 

(क्रमशः)

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

३ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

Col साहेब तुमचं लिखाण वाचणे नेहमीच आनंद दायी असते. नितिन चौधरी

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

अनामित म्हणाले...

प्रवास वर्णनाचे उत्तम पुस्तक होईल!