सोमवार, ११ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग २)

ओमानला आम्ही आमच्या कौटुंबिक सफरीवर निघालो होतो. यात्रा कंपनीसोबत जात नसल्याने सर्व नियोजन आम्हालाच करायचे होते. हॉटेल बुकिंग, प्रेक्षणीय ठिकाणे, तिथे जाण्यासाठी वाहनव्यवस्था, जेवणखाण अशा सर्व बाबींवर आमचा विचारविनिमय झाला होता. विमानतिकिटे आपली आपण काढायची आणि इतर सर्व खर्च सामायिकपणे करायचे हेच आमच्या सगळ्या कौटुंबिक सफरींचे सूत्र असते.  त्यानुसार आम्ही मुंबई-मस्कत-मुंबई तिकिटे तीन महिने आधीच काढली होती. पण व्हिसा काढण्यापासून पुढचे सर्व काही आमचा भाचा देवाशीष आणि त्याची पत्नी आकांक्षानेच समर्थपणे पार पाडले. 

मुंबईहून अडीच तासांचा विमानप्रवास करून आम्ही स्थानिक वेळेनुसार दुपारी १-१.३० च्या सुमारास मस्कतला पोचलो. बोशर या मस्कतच्या उपनगरात 'फ्रेझर स्युईट्स' नावाच्या एका 'अपार्ट-हॉटेल'मध्ये आमचे बुकिंग होते. 'अपार्ट-हॉटेल' म्हणजे हॉटेलवजा अपार्टमेंट किंवा अपार्टमेंटवजा हॉटेल! अलीकडच्या काळात खूपच लोकप्रिय होऊ लागलेली ही एक छान संकल्पना आहे. यात एकाच ग्रुपमधल्या ४-६-८ लोकांना एकत्र राहायचे असल्यास एक २-३-४ बीएचके अपार्टमेंट मिळू शकते. हॉटेलात मिळणाऱ्या सोयी, म्हणजे रूम सर्व्हिस, कॉंप्लिमेटरी नाश्ता वगैरे सर्व सोयी इथेही असतात. 

'फ्रेझर स्युईट्स' च्या समोरच एक पांढरीशुभ्र संगमरवरी मशीद होती. विमानतळावरून आम्हाला घेऊन येणाऱ्या ड्रायव्हरने पुरवलेल्या माहितीनुसार तिचे नाव 'मोहम्मद अल अमीन मशीद' असे होते. ओमानमधल्या 'बाहवान इंटरनॅशनल' या सुप्रसिद्ध बिझनेस ग्रुपने ती मशीद बांधलेली असल्याने तिला बाहवान मशीदही म्हटले जाते. ड्रायव्हरने असेही सांगितले की त्या मशिदीच्या घुमटांवर सुंदर नक्शी असून त्या नक्शीला सोनेरी पार्श्वभूमी आहे. शिवाय त्या मशिदीवरचे दिवे लावल्यानंतर तिच्यावर एक हलकी निळसर झाकही दिसते. त्या माहितीचा प्रत्यय मात्र मला दुसऱ्या दिवशी पहाटे आला आणि ते सुंदर दृश्य मी मोबाईलमध्ये कैद करून घेतले. (#ओह मॅन भाग १ मधला फोटो) 

अपार्टमेंटमध्ये सामान ठेवून आम्ही लगेच मस्कतच्या समुद्रकिनाऱ्यावर गेलो. एका क्रूझवर आमचे बुकिंग केलेले होते. त्या दुमजली बोटीत आमच्यासह देशोदेशीचे एकूण २०-२५ पर्यटक होते. खानपानाची रेलचेल होती. समुद्रकिनाऱ्यालगत प्रवास सुरू असताना एक माणूस आम्हाला माहिती पुरवत होता. मस्कतमधल्या इमारती, किनाऱ्यावर पोर्तुगीजांनी बांधलेला बुरूज, नांगरून ठेवलेली ओमानच्या सुलतानाची मोठी विशेष बोट, अशा अनेक गोष्टी आम्ही पाहत होतो. एका इमारतीकडे इशारा करत गाईडने आम्हाला सांगितले की ते मस्कतमधले सर्वात आरामदायी आणि सर्वाधिक महागडे हॉटेल होते. रिट्झ-कार्लटन कंपनीच्या त्या 'अल-बुस्तान पॅलेस हॉटेल' मधल्या आणि जवळच असलेल्या 'शांग्री ला' नावाच्या आणखी एका लक्झरी हॉटेलमधल्या सर्व खोल्या काही महिन्यांपूर्वी एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी श्री. मुकेश अंबानी यांनी बुक केल्या होत्या म्हणे! 
खऱ्या-खोट्याची शहानिशा मात्र आम्हाला करता आली नाही. 
अल बुस्तान पॅलेस हॉटेलजवळच्याच एका इमारतीबद्दल आमचा गाईड म्हणाला की तो सुलतानाचा जुना राजवाडा आहे. सुलतान आता तिथे राहत नाही परंतु ओमानला भेट देणारे सर्व देशांचे राष्ट्रपती-पंतप्रधान त्या राजवाड्यातच राहतात. त्या राजवाड्याबद्दल त्याने दिलेली अधिक माहिती अतिशय रोचक होती. जर सुलतान निपुत्रिक असेल किंवा त्याच्या पश्चात राजगादीसाठी दोघा-तिघा वारसांमध्ये चुरस होण्याची शक्यता असेल तर सुलतान मृत्यूपत्रात आपली इच्छा लिहून ठेवतो. ते पत्र एका लिफाफ्यात बंद करून जुन्या राजवाड्यात ठेवले जाते. सुलतानाच्या मृत्यूनंतर तो लिफाफा उघडला जातो आणि दिवंगत सुलतानाने नेमलेला उत्तराधिकारी गादीवर बसतो. १९७० पासून ओमानवर राज्य करणारा सुलतान, काबूस बिन सैद अल सैद, हा जानेवारी २०२१ मध्ये निपुत्रिक मरण पावला. त्यामुळे सध्याचा सुलतान हैथम अल तारिक बिन सैद याला त्याच पद्धतीने निवडले गेले.
दिवंगत सुलतान काबूस याने आपल्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत ओमान देशासाठी पुष्कळ काही केले. या देशाची प्रगती कशी होत गेली असेल याची झलक आम्हाला हळूहळू दिसू लागली होती. पण त्याबद्दल विस्तृत माहिती अजून मिळायची होती. दुसर्‍या दिवशी 'Oman across the Ages' नावाचे संग्रहालय पाहताना ती मिळाली... 

(क्रमशः) 

© कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: