निझवा आणि बाहला या दोन ठिकाणचे किल्ले आम्ही पाहिले, आणि त्यांचा इतिहासही ऐकला-वाचला. ते पाहून एकीकडे असे वाटले की, "यात काय आहे? यापेक्षा कितीतरी उंच, आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण असलेले अनेक गड आमच्या महाराजांच्या राज्यात आहेत." पण ओमानमधल्या त्या दोन्ही किल्ल्यांची डागडुजी व रंगरंगोटी, आणि तिथली स्वच्छता पाहून मात्र वैषम्य जाणवले. आपल्या गडकोटांची होणारी दुर्दशा आठवली आणि ती दुर्दशा दूर करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न किती तोकडे पडत आहेत हेही जाणवले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्याच काळात, म्हणजे सतराव्या शतकात ओमानमध्ये बांधल्या गेलेल्या निझवा किल्ल्याची उंची आणि व्याप्ती आपल्या सिंहगड, रायगडाच्या जवळपासही नाही. परंतु, आणखी एक मोठा फरक आहे. या किल्ल्यांनी फारशी तुंबळ युद्धेही पाहिलेली नाहीत, आणि आपल्या देशावर झाली तितकी विध्वंसक आक्रमणेही ओमानवर कधी झाली नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच हे किल्ले आजपर्यंत बऱ्यापैकी सुस्थितीत राहिले असावेत. बाहलाचा किल्ला आणखी जुना, म्हणजे बाराव्या शतकात बांधला गेलेला आहे. आज तो एक 'युनेस्को हेरिटेज साईट' म्हणून गणला जातो.
दोन्ही किल्ल्यांची रचना पुष्कळशी सारखीच आहे. आपल्या गडांना असतात तसेच भक्कम दरवाजे, त्या दरवाजांमध्ये ठोकलेले अणकुचीदार व जाडजूड लोखंडी खिळे, दरवाज्यातून शत्रू आत शिरलाच तर वरून उकळते तेल ओतण्याची योजना, बंदूकधारी सैनिकांसाठी बुरुजात केलेली भोके, किल्ल्याच्या एका कोपऱ्यात कैद्यांना ठेवण्यासाठी केलेली अंधारकोठडी, हे सर्व काही ओळखीचे होते. एक वेगळे वैशिष्ट्य म्हणावे तर दोन्ही किल्ल्यात एक-एक खजूराचे कोठार होते. त्यातल्या कट्टयांवर खजूर भरलेली पोती ठेवली जात असत. ते सैनिकांचे आणीबाणीकरता साठवलेले अन्न असे. त्या कट्टयांना थोडासा उतार केलेला होता. उतरंडीच्या टोकाखाली एक खळगा होता. खजूराच्या पोत्यातून वाहणारा रस त्या खळग्यात जमा होत असे. तो रस रोटीवर फासून खाल्ला जाई!
किल्ले पाहून झाल्यावर आम्ही जेवून पुढे निघेपर्यंत तीन वाजून गेले होते. आजचे शेवटचे ठिकाण म्हणजे ओमानचे राष्ट्रीय संग्रहालय होते. तिथे पोहोचेपर्यंत आपल्याला साडेतीन-पावणेचार होतील आणि पाच वाजता संग्रहालय बंद होईल, असा इशारा अल नासरने दिला होता. या संग्रहालयाबद्दल मी आधी फारसे काही वाचले नव्हते. शिवाय, ओमानचा इतिहासही मला तितकासा चित्तवेधक वाटलेला नव्हता. त्यामुळे, "संग्रहालय काय, तासाभरात पाहून होईल." असा माझा कयास होता.
'Oman Across Ages' नावाचे ते संग्रहालय अतिशय भव्य, प्रेक्षणीय आणि माहितीपूर्ण होते. आधुनिक दृकश्राव्य तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून बनवलेले एकन्एक दालन पाहत राहावे असे होते. ते संग्रहालय मन लावून पाहायला मला एक पूर्ण दिवसभरही कमी पडला असता. सुंदर चित्रे, ध्वनिफिती आणि लेखांच्या माध्यमातून, आदिमानवाच्या काळापासूनचा ओमानी इतिहास तिथे साकारलेला होता. आश्चर्यकारक माहिती म्हणजे, हजारो वर्षांपूर्वी या प्रदेशात नद्या, वने आणि वन्यजीव अस्तित्वात होते. पर्यावरणात होत गेलेल्या बदलांमुळे, काही अपवाद वगळता आज इथे खडकाळ-डोंगराळ जमिनीशिवाय काहीही नाही. संग्रहालयाच्या शेवटच्या दालनात सुलतान काबूसचा जीवनपट, आणि त्याने ओमानमध्ये घडवून आणलेला आमूलाग्र बदल, यांचे प्रदर्शन होते. एकूणात, 'चुकवू नये असे' हे शब्द या संग्रहालयाच्या बाबतीत सार्थ ठरतील.
पाच वाजता संग्रहालय बंद व्हायची वेळ होती. पण आम्ही एकदा संग्रहालयात शिरलो म्हटल्यावर पाचच्या पुढेही काही काळ आम्ही पाहत राहू शकू असे आम्हाला वाटले होते. परंतु, ४.५० पासूनच तिथल्या सुरक्षारक्षकांनी आमच्या कानाशी, "निघा निघा" अशी घाई सुरू केली. नाइलाजाने आम्ही बाहेर पडलो. बाहेरच्या कॉफी शॉपमध्ये मात्र बसायला परवानगी होती.
कॅफेतल्या नेपाळी मुलाने आम्हाला थांबायला सांगितले कारण कॉफी मशीनवरचा 'डॅनी' नावाचा भारतीय तरुण कुठेतरी गेलेला होता. 'डॅनी' परत आल्यावर उलगडा झाला की तो पुण्याचा ज्ञानेश पाटील होता! जेमतेम पंचविशीतल्या, अविवाहित ज्ञानेशने पुण्यात 'वेस्टीन' हॉटेल आणि इतरत्र कुठेतरी पूर्वी नोकरी केलेली होती. गेली चारपाच वर्षे तो इथे होता. प्रत्यक्षात तो कॉफीमशीन चालवणारा कर्मचारी नसून त्या कॅफेचा ऑपरेशन्स मॅनेजर होता. स्टाफ कमी असल्याने त्या दिवसापुरते तो हे काम पाहत होता. त्याच्याकडून आम्हाला बरीच मोलाची माहिती मिळाली. ओमानमध्ये नोकरी मिळवून देणाऱ्या काही भारतीय एजन्सी आहेत. पण त्यांच्यातर्फे नोकरी मिळाल्यास पगाराचा घशघशीत हिस्सा एजन्सीला द्यावा लागतो. ज्ञानेश मात्र कोणाच्यातरी थेट ओळखीतून आल्यामुळे त्याला दरमहा ४०-४५ हजार रुपये वाचवता येत होते. शिवाय त्याला राहायला घर आणि येण्या-जाण्यासाठी मोटरकार विनामूल्य मिळालेली होती. ओमानमध्ये नोकरदारांना प्राप्तिकर भरावा लागत नाही. फक्त मोठ्या व्यापाऱ्यांना कर भरावा लागतो. "कोणा भारतीय मुलांना इकडे येऊन नोकरी करण्यासाठी काही माहिती किंवा मदत हवी असल्यास तर मी नक्की देईन" असे आश्वासन ज्ञानेशने मला दिले.
दिवसभरात आम्हाला बरेच काही पाहायला मिळाले होते. पण संग्रहालयात वेळ कमी पडल्याची चुटपुट मात्र मनात राहिली. पुढचा दिवस मस्कत शहरासाठी राखीव होता. दिवसभरात काय काय पाहायचे-करायचे याची उजळणी करत 'फ्रेझर स्युईट्स' मधे परतलो...
(क्रमशः)
©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा