यात्रा कंपनीसोबत जाणाऱ्यांना, यात्रा संयोजकांकडून मिळणाऱ्या "उद्या ६-७-८" किंवा "उद्या ७-८-९" अशा सूचनांची सवय असेल. "उद्या ६-७-८" या संक्षिप्त सूचनेचा अर्थ असा असतो की "बेड टी सहा वाजता मिळेल, नाश्ता सात वाजता खायचाय, आणि बस आठ वाजता निघेल"!
यातली अखेरची वेळ सर्वात महत्त्वाची असते. तिचे पालन न करणाऱ्यांची, संयोजकांकडून सौम्य शब्दात, आणि सहप्रवाशांकडून तिखट शब्दात, किंवा बोलके हातवारे आणि नेत्रपल्लवीद्वारे 'पूजा' होते हेही अनेकांना माहीत असावे!
पण आमची कौटुंबिक सहल असल्याने हे सगळे आम्हाला लागूच नव्हते! कारण आमच्यातले 'लेट लतीफ' निवांतच होते आणि इतरांच्या सौम्य कोपरखळ्यांचाही आनंद लुटत होते! परंतु, सगळे वेळापत्रक आमच्याच हातात असल्याने आम्ही फारशी फिकीर करत नव्हतो. या निमित्ताने यात्रा कंपनीच्या संयोजकांना त्यांच्या संयमासाठी मनोमन सलाम मात्र करावासा वाटला!
आज आमच्यासोबत 'अल-नासर' नावाचा एक जेमतेम तिशीचा तरुण, स्थानिक वाटाड्या म्हणून आला होता. आमची मिनीबस मस्कतहून निझवाच्या दिशेने निघाली. खिडकीतून मस्कत दिसत होते. इथल्या जवळपास सर्वच इमारती उदी रंगाच्या किंवा पांढऱ्याशुभ्र आहेत. शहरी भागात बहुमजली इमारती आहेत, परंतु इतरत्र बहुतांशी बैठी अथवा दुमजली घरेच दिसतात. काही घरांच्या आवारात तुरळक फुलझाडे दिसली. पण मोठ्या हमरस्त्यावर आल्यानंतर मात्र दुतर्फा खडकाळ, डोंगराळ जमिनीशिवाय काहीही नव्हते. एक वैशिष्ट्य मात्र सगळीकडे जाणवले, की गावातले रस्ते आणि मुख्य हमरस्ते हे सगळे इतके छान, मखमली होते की पोटातले पाणीही कधी हलले नाही!
आमचा गाईड अल-नासर म्हणाला होता, "वाटेत तुम्हाला मी 'डेट फॅक्टरी' दाखवणार आहे." निझवाच्या अलीकडे एका 'सूक' जवळ आमची मिनीबस थांबली. अरबी भाषेत बाजाराला 'सूक' म्हणतात. उत्साहात खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांना हा शब्द ऐकून निश्चितच सुख होईल!
डेट, म्हणजेच खजूर हे फळ म्हणजे वाळवंटातल्या लोकांसाठी हापूस आंब्याहूनही श्रेष्ठ! या प्रदेशात कॉफी प्यायची प्रथा आपल्याकडच्या चहापानासारखीच आणि तितकीच जुनी आहे. वेलची घातलेल्या काळ्या कॉफीच्या घुटक्यांसोबत खजूराचा आस्वाद इथे सर्रास घेतला जातो.
अल नासरने आम्हाला जिथे नेले ते कदाचित त्या 'डेट फॅक्टरी' चे आऊटलेट असावे. त्या दुकानात किमान १५ ते २० प्रकारचे खजूर मोठमोठ्या काचेच्या बरण्यांमधे मांडून ठेवलेले होते. त्यापैकी कोणत्याही बरणीतून कितीही खजूर उचलून खायची मुभा होती (लोकलाज हा एकच अंकुश मनावर होता!) वेगवेगळ्या चवीचे खजूर चाखायला मजा आली. दालचिनी, आले, तीळ असे अनेक पदार्थ लावलेले खजूर होते. तीळ व पिस्ते घोटून केलेल्या एका 'ताहिनी' नावाच्या चटणीत बुडवून ते खायचे होते. तो अप्रतिम स्वाद अविस्मरणीय आहे. त्याच दुकानात वेगवेगळ्या स्वादाचे मधही चाखायला मिळाले. सुमाक, झातर, केशर, रोझ वॉटर असे निरनिराळे एसेन्स आणि मसालेही तिथे विकायला ठेवले होते.
मग आम्ही शेजारीच असलेल्या, ओमानी हलव्याच्या दुकानात शिरलो. इथला हलवा म्हणजे आपल्याकडे बॉंबे हलवा/कराची हलवा किंवा इतरही नावांनी प्रसिद्ध असलेला चिवट हलवा. खजूर, अक्रोड, बदाम, असे वेगवेगळे मेवे घालून बनवलेले, विशिष्ट चवींचे हलवे विकायला आणि चाखायलाही ठेवलेले होते. हलवेदेखील चाखून पाहायचा मोह झाला होता. पण खजूर बऱ्यापैकी 'चापून' झालेले असल्याने आणि अचानक कॅलरीज् चा हिशोब आठवू लागल्यामुळे हलव्याच्या दुकानातला मुक्काम आम्ही 'सूक'मधल्या इतर दुकानात हलवला.
एका दुकानात संत्र्याचा व उसाचा ताजा रस समोरच काढून मिळत होता. वाटाड्या अल नासर म्हणाला, "तुम्हा भारतीयांना याचे काही अप्रूप नसणार! चला, पुढे जाऊ या!" पुढे एका दुकानात 'लोबान'चे खडे विकायला ठेवले होते. लोबान म्हणजे एका विशिष्ट झाडाचा सुकवलेला चीक असतो, ज्याला आपण ऊद म्हणून ओळखतो. लोबान निखाऱ्यावर टाकून त्याचा धूर तर केला जातोच, पण इथे खाद्यपदार्थांमधेही याचा वापर होतो. नंतर मस्कतमधल्या एका हॉटेलात आम्हाला 'वेलकम ड्रिंक' म्हणून लोबानचे पाणी प्यायला मिळाले!
त्याच 'सूक'मधे भाजी व फळबाजारही होता. एक ओमानी रियाल २२० रुपयांइतका असतो. साहजिकच (रुपयांच्या हिशोबात) सर्व काही महाग असेल असे आम्हाला वाटले. चौकशा करून भारतातल्या भाजीपाल्यांच्या किंमतीशी तुलना केली गेली. पुष्कळशा भाज्यांचे दर भारतातल्या दरांच्या जवळपासचेच होते. तिथे अगडबंब कलिंगडे, पपया, डाळिंबे वगैरे विकायला होती. डाळिंबे तुरळकच दिसली, पण पुन्हा 'मस्कती डाळिंबां'ची आठवण झाली आणि आम्ही चौकशी करायला गेलो. पण त्या डाळिंबाचे रूप फारसे आकर्षक वाटेना. एकाच ठिकाणी खूप मोठी आणि आकर्षक डाळिंबे दिसताच आम्ही अल नासरला विचारले, "हीच का ती सुप्रसिद्ध मस्कती डाळिंबे?" तर तो म्हणाला, "नाही नाही. इतकी छान आहेत म्हणजे ती इजिप्ती डाळिंबे असावीत." फळवाल्यानेही ती डाळिंबे इजिप्ती असल्याचे सांगितले. आम्ही कपाळाला हात लावत पुढे झालो.
आम्ही हिंदुस्थानी आहोत हे पाहून एक बांगलादेशी खजूरविक्रेता आमच्या प्रेमात पडला. त्याने आम्हाला बऱ्यापैकी स्वस्तात खजूर विकला आणि वजन करतानाही झुकते माप दिले. आम्ही खूष झालो. पण निघताना आमच्या लक्षात आले की त्या दुकानाचा खरा मालक एक वृद्ध ओमानी गृहस्थ होता. तो कुठेतरी गेलेला असताना त्याच्या नोकराने परस्पर ही 'बंगाली जादू' केली होती!
जवळच एक म्हातारा ओमानी माणूस ओले खजूर विकायला बसला होता. आम्ही खरेदी केली नाही तरी त्याच्यासोबत फोटो काढून हवाय म्हटल्यावर तो खूश झाला.
'सूक'मधे आमचा बराच वेळ गेला होता. अजून आम्हाला निझवा आणि बाहला या दोन ठिकाणचे किल्ले पाहायचे होते. अल नासरने आठवण करून देताच आम्ही घाईघाईने बसमध्ये चढलो...
(क्रमशः)
© कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा