शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

ओह मॅन! (भाग ६)

ओमान सफरीमधला आमचा चौथा दिवस 'सागरसृष्टी-दर्शना'साठी राखीव होता. त्यासाठी लवकर नाश्ता उरकून, आठ वाजायच्या आत समुद्रकिनाऱ्यावरच्या, अल मौज येथील 'मोला-मोला डायव्हिंग सेन्टर' ला पोहोचणे आवश्यक होते. हॉटेलमधून निघून समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाणे आणि संध्याकाळी परत येणे, इतकाच प्रवास असल्याने आम्ही आमच्या मिनीबसला सुट्टी दिलेली होती. 'जाण्या-येण्यासाठी टॅक्सी करू' असा विचार आम्ही केला होता. मस्कतमध्ये 'ऊबर' उपलब्ध नाही. काही स्थानिक ऍप आहेत, पण ते वापरून मागवलेल्या टॅक्सी लवकर येत नाहीत. कशाबशा आम्हाला दोन टॅक्सी मिळाल्या आणि आम्ही वेळेत अल मौज येथे पोचलो.  

आमचा भाचा देवाशीष याने 'मोला-मोला डायव्हिंग सेन्टर' सोबत आगाऊ संपर्क करून, मोटरबोट सफर, स्कुबा डायव्हिंग, आणि स्नॉर्केलिंग चे आयोजन आम्हा सर्वांसाठी केलेले होते. मी व गिरीश वगळता बाकी सगळे स्कुबा-डायव्हिंगचा अनुभव घेणार होते. स्कुबा-डायव्हिंगसाठी माझ्या डॉक्टरांची पूर्वपरवानगी मी घेतलेली नसल्याने मी फक्त स्नॉर्केलिंग करणार होतो. दादा, म्हणजे माझे ९२ वर्षाचे सासरे समुद्रात उतरणार नसले तरी ते आमच्यासोबत बोटीवर येणार होते. मनाने अजूनही तरुण असल्याने, ते हसून म्हणाले, "तुम्हा सर्वांना मजा करताना पाहण्याची मजा मी घेणार आहे!" तरीही आयोजकांनी तीन-तीनदा आम्हाला विचारून खात्री करून घेतली की दादा निश्चितपणे बोटीवर येऊ इच्छित आहेत आणि त्यांना मोटारबोटीच्या प्रवासाचा त्रास होणार नाही. दादांनी ठासून होकार दिल्यानंतर आयोजकांना त्यांचे खूप कौतुक वाटल्याचेही जाणवले. 

'मोला-मोला' च्या बोटीवर चढण्यापूर्वी आम्हाला आमचे 'किट' दिले गेले. बोटीवर कप्तानाव्यतिरिक्त सुमारे २५ पर्यटक आणि 'मोला-मोला' चे चार मदतनीस/प्रशिक्षक होते. आमच्याव्यतिरिक्त इतर सर्व पर्यटक आणि 'मोला-मोला'चे चारपैकी तीन मदतनीस युरोपमधल्या वेगवेगळ्या देशातले होते. एकमेव भारतीय (आणि आशियाई) गट म्हणजे केवळ आमचाच परिवार होता. 'विल' (कदाचित विल्यम) नावाचा एक उंचापुरा आणि बलदंड तरुण त्या चौघांचा नेता होता असे दिसले. जेमतेम पंचविशी-तिशीच्या त्या तरुणांनी ओमानसारख्या परदेशात राहून चालवलेला हा उपक्रम कौतुकास्पद होता. बोट सुटण्याआधी एका मदतनीसाने सर्व पर्यटकांची उपस्थिती तपासली. त्यानंतर प्रत्येकाला एकेक 'संमतीपत्र' दिले गेले जे वाचून प्रत्येकाने सही करणे भाग होते. समुद्रात ज्या धाडसी क्रीडाप्रकारात आम्ही सहभागी होणार होतो त्यातील धोक्यांसंबंधी आम्हाला कल्पना आहे व आम्ही स्वतःच्या जबाबदारीवर त्यात सामील झालो असल्याचे ते पत्र होते. 

त्यानंतर त्या मदतनीसाने आम्हा सर्वांना दिवसभराच्या कार्यक्रमासंबंधी माहिती दिली. सकाळच्या सत्रात एकदा आणि दुपारच्या सत्रात एकदा, असे दोन वेळा आम्हाला स्कुबा-डायव्हिंग व स्नॉर्केलिंग करता येणार होते. आमचे दुपारचे जेवण बोटीवरच असणार होते. एका शीतपेटीमधे पाण्याच्या बाटल्या व थंड पेये, आणि शेजारीच चिप्सची पाकिटे, केळी वगैरे ठेवलेले होते. मनाला आवडेल ते, हवे तेंव्हा खायची-प्यायची मुभा होती. पुरुष व स्त्रियांसाठी एकेक टॉयलेटही बोटीवर होते. बोटीच्या टपावर गाद्या अंथरलेल्या होत्या व एका वेळी दहा जणांना टपावर बसण्याची (लोळण्याचीही) सोय होती. 

अल मौजपासून सुमारे ३० किलोमीटर दूर समुद्रात असलेल्या, 'अल दिमानियात' नावाच्या एका द्वीपसमूहाच्या दिशेने आमची मोटरबोट निघाली. आम्ही आनंदात गप्पा मारत, हास्यविनोद करत होतो, फोटो काढत होतो. अधूनमधून कुणी खाद्यपेयांचा आस्वाद घेत होते. 

आमच्यापैकी दोघा-दोघांना एकत्र बोलावून 'विल' काही सूचना देऊ लागला. स्कुबा डायव्हिंगचे किट व पाठीवरचा ऑक्सिजन सिलिंडर घालण्याची पद्धत, पाण्याखाली जाताना आणि गेल्यावर करायच्या (आणि न करायच्याही) हालचाली, त्या संपूर्ण काळात बाळगायची सावधगिरी वगैरे तो समजावून सांगत होता. डोळ्यांवर लावायचा चष्मा व त्यालाच जोडलेला, नाकावर लावायचा मास्क आम्हा सर्वांच्या किटमध्ये होताच. पर्यटकांपैकी काहीजण अगदी सराईत पाणबुडे असावेत असे वाटले. त्यांना कोणत्याच सूचनांची गरज नव्हती आणि त्यांच्या किटमध्ये तर रबरी डायव्हिंग सूटदेखील होता जो त्यांनी अंगावर चढवला. आपापले किट व ऑक्सिजन सिलिंडरही अंगावर चढवून ते झटकन तयार झाले. 

'अल दिमानियात' द्वीपसमूहापैकी एका बेटाच्या बरेच अलीकडे आमची बोट थांबली. पर्यटकांपैकीच २-४ सराईत पाणबुडे (Deep Sea Divers) समुद्रात उतरले आणि खोल पाण्यात बुडून दिसेनासे झाले. मग बोट जराशी पुढे जाऊन त्या बेटाजवळ उभी राहिली. तिथे पाण्याची खोली काही ठिकाणी सुमारे २० फूट तर काही ठिकाणी ४० फूट होती. आमचा प्रशिक्षक, 'विल', आमच्यापैकी दोन-दोन अननुभवी पर्यटकांना एकाचवेळी बरोबर घेऊन पाण्याखाली जात होता. कमी-अधिक फरकाने, ५ ते १५ मिनिटे पाण्याखाली राहून लोक वर येत होते. पाण्याखाली जाण्यापूर्वी जवळजवळ प्रत्येकाच्याच मनातला काहीसा घाबरलेला, अनिश्चिततेचा भाव चेहऱ्यावर दिसत असल्याने, त्यांचे चेहरे 'फोटो काढण्यासारखे' झालेले होते. बुडी मारून वर आल्यानंतर मात्र एका नवीन, व चित्तथरारक अनुभवामुळे मिळालेला आनंद, आणि 'आपण हे करू शकलो' अश्या अर्थाची त्यांची विजयी मुद्राही कॅमेऱ्यात टिपण्यासारखी होती. 

'विल'सोबत जोड्या-जोड्या डायव्हिंगसाठी जात असताना, 'ऍना' नावाची दुसरी प्रशिक्षक उरलेल्या लोकांचा गट घेऊन स्नॉर्केलिंगसाठी निघाली. मीही त्याच गटात होतो. दोन वर्षांपूर्वी मी थायलंडच्या सफरीवर असताना, आयुष्यात पहिल्यांदाच स्नॉर्केलिंग केलेले होते. त्यामुळे ते कसे करायचे याची माहिती होती. स्नॉर्केलिंग करताना आपण पाण्याच्या पृष्ठभागाच्या थोडेसेच खाली बुडून पोहत जायचे असते. आपल्या डोळ्यांवर पाण्यात घालायचा चष्मा आणि नाकावर मास्क लावलेला असतो. एक फूटभर लांबीची, कडक प्लॅस्टिकची नळी चष्म्याच्या जोडलेली असते. त्या नळीचे एका टोकाकडचे भोक तोंडात घेऊन, दातांखाली पक्के दाबून तोंड मिटायचे असते. नळीचे दुसरे भोक पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर राहते, ज्यातून आपण तोंडाद्वारे हवा खेचत व सोडत राहायचे असते. या सर्व काळात नाक मास्कचा आत बंदिस्त असते व नाकाने श्वासोच्छवास करता येत नाही. पोहताना सावधगिरी म्हणून, हवे असल्यास अंगात लाईफ जॅकेट घालता येते. 

पाण्याखालची जीवसृष्टी आणि समुद्रातळाशी असलेले प्रवाळ (Corals) पाहताना वेळेचे भानच सुटते. मला विविध रंगांचे लहान-मोठे मासे आणि कासवे दिसली. एक मोठे कासव खालून वर पोहत-पोहत अगदी माझ्या नाकाखालीच येऊ लागले. पण अगदी जवळ येताच त्याने मार्ग बदलला आणि माझ्याशेजारीच त्याने पाण्याबाहेर डोके काढले. थोडा वेळ हवेत श्वास घेऊन ते पुनः पाण्याखाली गेले. मग मी त्याच्या पाठलागावर निघालो. पुढे पोहत निघालेल्या त्या कासवाच्या मानेभोवती एक मोठा मासा सतत गिरक्या घालत-घालत पोहत होता. बराच वेळ त्यांचा हा खेळ चालू होता. जणू काही जमिनीवरून त्यांच्या जगात फिरायला आलेल्या माझ्यासारख्या पाहुण्याचे मनोरंजन करण्याची जबाबदारी त्या दोघांनी उचलली होती! स्नॉर्केलिंग करताना नुसते वेळेचेच नव्हे, तर वयाचेही भान सुटते हे नंतर माझ्या लक्षात आले!

दुपारच्या जेवणात केळी, पिटा ब्रेड व हम्मस, दोन-तीन तऱ्हेच्या चटण्या व सॉस, शाकाहारी व मांसाहारी कबाब अशा गोष्टी होत्या. आम्हाला एक गोष्ट खूपच कौतुकास्पद वाटली. विल, ऍना, आणि इतर दोघा युवा आयोजकांनी आम्हाला सकाळी बोटीवर घेण्यापासून ते समुद्राच्या पाण्यामध्ये नेऊन आणण्यापर्यंत सर्व कामे केली होती. त्यांचीही बरीच दमणूक झालेली होती. तरीही जेवणाच्या वेळी अतिशय चपळाईने हालचाली करत, त्या छोट्याश्या बोटीच्या मध्यभागी त्या चौघांनीच एक बुफेचे टेबल मांडले. त्यावर टेबलक्लॉथ घालण्यापासून ते जेवणाच्या बशा मांडून सर्वांना आग्रहाने जेवू घालण्यापर्यंत सर्व कामे त्यांनीच केली. आम्ही या सफरीचे पैसे भरलेले असल्यामुळे या सेवा आम्हाला मिळणे अपेक्षितच होते. परंतु, ज्या उत्साहाने, हसतमुखाने आणि आपुलकीने ते तरुण ही कामे करीत होते ते वाखाणण्याजोगे होते. विलने तर स्वतःच्या मनानेच आमच्या दादांना पिटा ब्रेड व कबाबचा रोल करून खायला दिला आणि अगदी स्वतःच्या वडिलांप्रमाणे वागणूक त्यांना दिली.  

जेवणानंतर पुन्हा दुपारच्या सत्रातले सागरभ्रमण करून झाले. परतीची वेळही झाली होती आणि सगळेच दमलेलेही होते. मोटारबोट वेगाने किनाऱ्याकडे येत असताना बहुतांश पर्यटक काहीसे अंतर्मुख झालेले जाणवले. काही जण दिवसभरातल्या थरारक अनुभवांची उजळणी करत असावेत, तर काहींना नुसतेच परतीचे वेध लागले असावेत. मी आणि गिरीश बोटीच्या कप्तानासमोर असलेल्या छोटयाश्या डेकवर बसून अथांग सागराच्या दर्शनाचा आणि बोटीच्या वेगाचा आनंद घेत होतो. आमच्या बोटीशी जणू स्पर्धा करत असल्याप्रमाणे, काही पक्षी शेजारून उडत चालले होते. दूरवर मस्कतचा किनारा दिसायला लागला तसे आमच्यासह सगळेच पर्यटक आनंदी झालेले दिसले. गिरीशच्या व माझ्या मनात एकदमच विचार आला तो शेकडो वर्षांपूर्वी आपले घर-दार सोडून अज्ञाताच्या प्रवासावर निघणाऱ्या खलाशांचा! 

अनेक दिवसांच्या सागरी प्रवासानंतर किनारा दिसल्यावर त्यांना तर किती आनंद होत असेल?

पण त्याच वेळी मला कुसुमाग्रजांनी लिहिलेले 'कोलंबसाचे गर्वगीत'ही आठवले... 

 "अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला..."

(क्रमशः)

©कर्नल आनंद बापट 


६ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

खूप छान माहिती मिळाली. समुद्र प्रवासाचा आणि समुद्र स्नानाचा अनुभव खरोखरच सगळ्यांनी घ्यायला हवा. तुमचे लिखाणही उदबोघक असते. धन्यवाद 💐

अनामित म्हणाले...

सुरेख वर्णन. नितिन चौधरी

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

अनामित म्हणाले...

सुरेख वर्णन .

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏