शुक्रवार, २५ मार्च, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग-४



#काश्मीरचे_अश्रू

(भाग ३ नंतर पुढे चालू...)

परकीय जुलमी राजाच्या विरुद्ध काश्मीरच्या भूमिपुत्रांनी, 'काश्मिरीयत' च्या अस्मितेसाठी पुकारलेल्या आंदोलनाचे रूपांतर 'इस्लामियत'च्या लढ्यामध्ये कसे झाले?

त्यामागे एक त्रिकालाबाधित सत्य आहे. एखाद्या जुलमी ताकदीपुढे एकटा-दुकटा मनुष्य कदाचित हतबल होईल. पण संघटित आणि प्रेरित झालेला मनुष्यसमूह अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही करू शकतो.
जगातल्या काही मानवसमूहांमध्ये 'धर्मरक्षण' ही एक मोठी प्रभावी प्रेरणा आहे. पण, तिचे स्वरूप बाटलीतल्या 'जिन' राक्षसासारखे आहे. पुष्कळ वेळा, 'धर्मरक्षण' हे केवळ एक 'साधन' असते. बाटली उघडणाऱ्या 'आका' ला प्रत्यक्षात काही निराळेच हेतू साध्य करायचे असतात. 'जिन' आपल्या 'आका'ची उद्दिष्टे साध्य करायला मदतही करतो. पण काम झाल्यावर मात्र, त्या 'जिन'चा 'आका'च नव्हे, तर कोणीही 'जिन'ला पुन्हा बाटलीत बंद करू शकत  नाही. 

नेमके हेच सत्य, काश्मीरमध्ये १९३१ साली घडलेल्या काही घटनांनी अधोरेखित केले.

लाहोरमधून प्रसिद्ध होणाऱ्या 'एका साप्ताहिकात १० मे १९३१ रोजी एक बातमी छापून आली होती. त्यानुसार, २९ एप्रिल १९३१ रोजी जम्मूमध्ये, ईदच्या प्रार्थनेनंतर, इमाम अताउल्ला शाह बुखारी, राजा हरिसिंगाविरुद्ध प्रक्षोभक भाषण करीत असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्यांचे भाषण (खुतबा) बंद पाडले. ईदसाठी एकत्र आलेल्या मुसलमानांना ते अजिबात आवडले नाही. त्यांच्यापैकी मीर हुसेन बक्ष नावाच्या एका तरुणाने उठून पोलिसांविरुद्ध आणि 'हिंदू' राजाविरुद्ध घोषणा द्यायला सुरुवात केली. 'हिंदू' राजा आणि त्याचे 'हिंदू' पोलीस मुस्लिम धर्मावर घाला घालत असल्याचा आरोप करून त्याने जमावाला चिथावणी दिली. नव्यानेच स्थापन झालेल्या 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन' नावाच्या राजकीय संघटनेने हा मुद्दा उचलून धरला आणि या घटनेच्या निषेधार्थ जाहीर सभा घेतली. 

जम्मू-काश्मीरमधील 'रणबीर' या एकमेव वृत्तपत्रावर राजाने १९३० साली बंदी घातली होती. त्यामुळे, जम्मूमधील घटनेची लाहोरच्या वृत्तपत्राने छापलेली बातमी काश्मीरमध्ये पसरेपर्यंत जम्मूमधील मुसलमानांचा असंतोष काहीसा शमलेला होता.

पुढच्याच महिन्यात, म्हणजे जून १९३१मध्ये 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन' ने संपूर्ण काश्मिरातील मुसलमानांना निदर्शने करण्याचे आवाहन केले. त्यामागचे कारण असे सांगण्यात आले की, जम्मू प्रदेशातील मीरपूर पोलीस स्टेशनमध्ये पवित्र कुराणाचा अवमान झाला होता. ड्यूटीवर उशिरा आलेल्या एका मुसलमान शिपायाची गादी आणि गादीवर ठेवलेली कुराणाची प्रत एका हिंदू इन्स्पेक्टरने खोलीबाहेर फेकून दिली होती.

परंतु, प्रत्यक्षात असे काही घडलेच नव्हते, असे इतिहासकार श्री. शबनम कय्यूम यांनी 'काश्मीर का सियासी इन्कलाब' या पुस्तकात लिहिले आहे. (संदर्भ: श्री. झहिरउददीन यांचा लेख, दि. २३ जून २०१७, 'ग्रेटर काश्मीर' नियतकालिक) त्यांच्या मते, जम्मूमध्ये ईदच्या दिवशी घडलेल्या घटनेची खबर उशिरा मिळाल्यामुळे काश्मिरी मुस्लिमांना पुरेशी चिथावणी मिळू शकली नव्हती. काश्मीरमध्ये बहुसंख्य मुस्लिमांना संघटित करण्यासाठी, रीडिंग रूम पार्टी आणि 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन'च्या नेत्यांनी, मिरपूरमधील एका मुसलमान शिपायाला हाताशी धरून ही खोटीच तक्रार देण्यास सांगितले होते.

२१ जून रोजी, 'यंग मेन्स मुस्लिम असोसिएशन' संघटनेची एक जाहीर सभा श्रीनगरमध्ये झाली. राजाला भेटून, सर्व मुस्लिमांतर्फे निवेदन देण्यासाठी एका समितीची स्थापना केली गेली. त्या समितीमध्ये तरुण नेता शेख अब्दुल्ला याचाही समावेश होता.

सभेमध्ये शेख अब्दुल्ला व इतर नेत्यांची भाषणे झाली. सभा संपता-संपता, एक तरुण अचानक उठून हिंदूविरोधी घोषणा देऊ लागला. "पवित्र कुराणाचा अवमान खपवून का घेता? जुलमी राजाविरुद्ध विद्रोह करा" असे आवाहन तो सर्व उपस्थित लोकांना करू लागला. राजमहालाकडे बोट दाखवत त्याने, जुलमाचे प्रतीक असलेली ती वास्तू जाळून खाक करण्यासाठी सभेला चिथावणी दिली. तातडीने त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, धर्माच्या नावाने त्याने दिलेली ती हाक सभेसाठी जमलेल्या लोकांच्या भावना भडकवण्यासाठी पुरेशी होती.

प्रत्यक्षात, ते भाषण करणाऱ्या, अब्दुल कादिर नावाच्या तरुणाचा काश्मीरशी काहीच संबंध नव्हता. तो वायव्य सरहद्द प्रांतातला मूळ निवासी होता आणि सुट्टीसाठी काश्मीरमध्ये आलेल्या एका इंग्रज अधिकाऱ्यांचा खानसामा म्हणून सोबत आलेला होता!

अब्दुल कादिरवर राजद्रोहाचा आरोप निश्चित होऊन खटला सुरु झाला. १३ जुलै रोजी, जिथे सुनावणी सुरु होती त्या तुरुंगाबाहेर मुसलमानांचा प्रचंड जनसमुदाय जमा झाला. बंदोबस्तासाठी मोठा सशस्त्र पोलीस ताफा हजर होता. सरकारचे सर्व अधिकारी व पोलीस अर्थातच हिंदू होते. 

तुरुंगाजवळील मशिदीमधून दुपारच्या नमाजाची 'बांग' दिली गेली. पण, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी कोणालाच जागेवरून हलू दिले नाही. एक तरुण उत्स्फूर्तपणे जागीच उभा राहून अझानची 'बांग' देऊ लागला. त्याला गोळी घातली गेली. त्यानंतर, प्रक्षोभित जमावावर केल्या गेलेल्या गोळीबारामध्ये २२ लोक ठार झाले.

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी राजा हरिसिंगाने एक चौकशी समिती नेमली. जम्मू-काश्मीर हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती बरजोर दलाल यांच्यासह आणखी दोन न्यायाधीश, आणि हिंदू व मुस्लिम समाजाचे प्रत्येकी दोन-दोन प्रतिनिधी असे या समितीचे स्वरूप होते. पण मुस्लिम प्रतिनिधींनी समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि समितीचा अहवाल पूर्वग्रहदूषित असल्याचे सांगून नामंजूर केला.

मुस्लिम नेत्यांनी या सर्व घटनांचे भरपूर भांडवल केले. त्यांच्या अपप्रचारामुळे या घटनांचे हिंदूविरोधी पडसाद संपूर्ण राज्यभर ऐकू येऊ लागले. शेख अब्दुल्लासह इतर दोन मुस्लिम नेत्यांना राजाने तीन आठवडे कैदेत टाकले. पण या अटकेबद्दल नाराजीचे सूर काश्मीरबाहेर संबंध भारतभरात ऐकू येऊ लागले. त्यामुळे धास्तावलेल्या राजाने त्या नेत्यांना सोडून दिले आणि तात्पुरता समेट झाला.

काश्मिरी मुस्लिमांचे निर्विवाद नेतृत्व म्हणून शेख अब्दुल्लांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती.

परंतु, बाटलीतला 'जिन' देखील बाहेर पडला होता!

काश्मीरच्या दुःखद इतिहासातल्या आणखी एका रक्तरंजित पर्वाची सुरुवात १३ जुलै १९३१ रोजी झाली. 

[तेंव्हापासून १३ जुलै हा दिवस काश्मीरमध्ये 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जात होता. २०१९ साली भारत सरकारने ही प्रथा बंद केली आहे.]


(क्रमशः)
(भाग   पुढे…)


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

६ टिप्पण्या:

Ajit vaidya म्हणाले...

Nice historical narrative. Came to know many facts. Thanks sir. Worth reading

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

🙂धन्यवाद 🙏

Sneha desai म्हणाले...

व्वा! बरीच माहिती झाली.
काही माहीत नव्हतं.
धन्यवाद!

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

V.R.Kulkarni. म्हणाले...

🙏🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏