बुधवार, १८ मे, २०२२

काश्मीरचे अश्रू : भाग २०

 #काश्मीरचे_अश्रू 

(भाग १९ नंतर पुढे चालू...) 

१९६६ सालच्या सुरुवातीपर्यंत भारतीय गुप्तहेर यंत्रणेने 'मास्टर सेल' ची पाळेमुळे खणून काढली होती. त्यामुळे मास्टर सेलच्या सर्व मुख्य नेत्यांना अटक होऊन त्यांच्यापैकी काही लोकांवर पुढे कायदेशीर कारवाईही झाली. परंतु, बऱ्याचश्या लोकांना हळूहळू सोडूनच देण्यात आले. त्यापैकी काही दुय्यम-तिय्यम दर्जाच्या कार्यकर्त्यांचे पुढे काय झाले हे जाणून घेणे मोठे रंजक ठरेल. 
'अल फतेह' चा संस्थापक गुलाम रसूल झाहगीर 

१९६४-६५ साली श्रीनगरच्या श्री प्रताप कॉलेजचा एक विद्यार्थी, जावेद अहमद मखदूमी हा 'मास्टर सेल'च्या सर्वात खालच्या फळीचा एक कार्यकर्ता होता. सीमेपलीकडून गुप्तपणे जम्मू-काश्मीरमध्ये घुसून भूमिगत झालेल्या आणि 'मास्टर सेल' सोबत संपर्कात राहू इच्छिणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा दूत म्हणून तो काम करीत असे. १९६६ साली पोलिसांच्या कारवाईमध्ये तो पकडला गेला परंतु, त्याच्यावर कोणताही गंभीर आरोप नसल्याने त्याची मुक्तता झाली. 
१७ नोव्हेंबर २००४ रोजी, आपल्या पहिल्याच जम्मू-काश्मीर भेटीवर आलेले भारतीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या दौऱ्याची सर्व सुरक्षा यंत्रणा ज्याच्या हाताखाली राबत होती, ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून, तो होता एके काळचा 'मास्टर सेल' चा कार्यकर्ता, श्री. जावेद अहमद मखदूमी, अर्थात जम्मू-काश्मीर पोलिसांचे तत्कालीन महानिदेशक!

मेहबूबा मुफ्ती यांच्या 'प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक फ्रंट' चे नेते, आणि जम्मू-काश्मीरचे माजी कायदा मंत्री व उपमुख्यमंत्री, श्री. मुझफ्फर हुसेन बेग यांनी हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते. त्यापूर्वी बरीच वर्षे त्यांनी दिल्लीमध्ये यशस्वीपणे वकिलीही केलेली होती. परंतु, त्यांच्या भूतकाळाबद्दल फारशी माहिती आज कदाचित कोणालाच असणार नाही. 

'जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट' (JKLF) नावाची एक भारतविरोधी संघटना इंग्लंडमधून कार्यरत होती. JKLF च्या काही कार्यकर्त्यांनी भारतीय तुरुंगात असलेल्या, मकबूल भट नावाच्या एका देशद्रोही अतिरेक्याच्या सुटकेसाठी प्रयत्न चालवले होते. त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून, ब्रिटनमधील भारतीय वकिलातीचे अधिकारी श्री. रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण केले गेले. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात मकबूल भटला तुरुंगातून सोडले जावे अशी अपहरणकर्त्यांची मागणी होती. परंतु, भारताकडून काही उत्तर येण्यापूर्वीच अपहरणकर्त्यांनी श्री. रवींद्र म्हात्रे यांची हत्या केली. त्यानंतर लगेच, मकबूल भट याला फासावर लटकवले गेले. १९८४ साली फाशी गेलेल्या त्या अतिरेकी मकबूल भटचे वकीलपत्र याच श्री. मुझफ्फर हुसेन बेग साहेबांनी घेतले होते! 
इतकेच नव्हे तर, 'मास्टर सेल' तर्फे हत्यारे चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या 'नरवारा सेल' मधील एक कार्यकर्ता असल्याच्या आरोपाखाली मुझफ्फर हुसेन बेगना १९६६ साली अटकही झालेली होती! [२०२० साली भारत सरकारतर्फे त्यांना पद्मभूषण देण्यात आले!]

मुझफ्फर हुसेन बेग व जावेद अहमद मखदूमी यांच्याप्रमाणे 'मास्टर सेल'चे इतरही पुष्कळ कार्यकर्ते १९६६ नंतर दहशतवादाचा मार्ग सोडून जम्मू-काश्मीरच्या मुख्य प्रवाहात सामील झाले. परंतु, काही लोकांनी मात्र फुटीरवाद व दहशतवादाचा मार्ग सोडला नाही. 

'मास्टर सेल' साठी आर्थिक पाठबळ उभे करण्यात सक्रिय असलेला, पण कोणत्याही मोठया अतिरेकी कारवाईमध्ये प्रत्यक्षपणे सामील नसलेला, फझल-उल-हक कुरेशी, नावाचा एक कार्यकर्ता होता. १९६६ साली अटक व सुटका झाल्यानंतरही त्याचे फुटीरवादी विचार बदलले नाहीत. जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या अनेक अतिरेकी कारवायांशी तो पुढे बरीच वर्षे संबंधित राहिला. १९८७ साली पाकिस्तानात स्थापन झालेल्या हिजबुल-मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेच्या स्थापनेत त्याचा महत्वाचा सहभाग होता. १९९९ साली तो अतिरेकी कारवायांपासून काहीसा दूर झाला. 'ऑल पार्टीज हुरियत कॉन्फरन्स' या काश्मिरी फुटीरवादी संघटनेचा संस्थापक व एक सक्रिय नेता या नात्याने फझल-उल-हक कुरेशी भारतासोबत वाटाघाटी करू लागला. परंतु, एकेकाळी त्यानेच स्थापन केलेल्या हिजबुल-मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेने, २०१८ साली फझल-उल-हक कुरेशीवर प्राणघातक हल्ला केला, हाही एक चमत्कारिक इतिहास आहे. त्या गोळीबारात गंभीर जखमी होऊनही, तो कसाबसा बचावला हेही नवलच. 

'मास्टर सेल' चा असाच एक कार्यकर्ता होता, गुलाम रसूल झाहगीर. 'पोस्टर सेल' चे काम केल्याच्या आरोपाखाली २१ ऑक्टोबर १९६५ रोजी पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु, पुराव्याअभावी त्याला पॅरोलवर सोडले गेले. त्याला ओळखण्यात जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठीच घोडचूक केली. 

पॅरोलवर सुटल्या-सुटल्या, गुलाम रसूल झाहगीरने दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयोगामध्ये काम करणाऱ्या पाकिस्तानी गुप्तहेरांशी संपर्क साधला. तेथून मिळालेल्या सूचनांप्रमाणे तो जम्मू-काश्मीरमधील काही विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांना भेटला, व लवकरच त्यांचा नेता झाला. त्या विद्यार्थ्यांना हाताशी धरून, झाहगीरने 'लाल काश्मीर' नावाची एक संघटना उभी केली. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, डिसेंबर १९६६ मध्ये भारताचा नकाशा दाखवणारी पत्रके तयार करून गुप्तपणे वाटायला सुरुवात केली. त्या नकाशांमध्ये काश्मीर भारतापेक्षा वेगळे आणि लाल रंगात दाखवलेले होते. परंतु, झाहगीरला नाचवणाऱ्या 'पाकिस्तानी मदाऱ्यांना' तेवढे पुरेसे नव्हते. त्यांना झाहगीरने 'काहीतरी मोठे' कांड करावे अशी अपेक्षा होती. 

३ फेब्रुवारी १९६७ रोजी, श्रीनगरमधील नावाकदल येथील पुलावर, सीमा सुरक्षा दलाचा काँस्टेबल चरण दास हा बंदूकधारी जवान गस्तीवर तैनात होता. गुलाम रसूल झाहगीर व त्याचा साथीदार गुलाम सरवर या दोघांनी या शिपायाला भोसकून ठार केले व पळ काढला. 'लाल काश्मीर' संघटनेने या खुनामागे त्यांचाच हात असल्याचे जाहीर केले. त्याच सुमारास, भारतविरोधी कारवाया करीत असल्याच्या संशयावरून पोलिसांनी झाहगीरला ताब्यात घेतले होते. परंतु, 'लाल काश्मीर' संघटना अथवा नावाकदल खून प्रकरणाशी त्याचा काही संबंध असेल अशी पुसटशी शंकाही पोलिसांना आली नाही. 

नावाकदल खून प्रकरणानंतर लगेच झाहगीरला अटक झाल्यामुळे, 'लाल काश्मीर'च्या सदस्यांनी सावध भूमिका घेतली व काही काळ ते सगळे भूमिगत राहिले. परंतु, सप्टेंबर १९६७ मध्ये, सय्यद सरवर आणि नाझीर अहमद वाणी नावाचे दोन सदस्य युद्धबंदीरेषेपार जाऊन गुप्तहेरगिरीचे आणि शस्त्रे वापरण्याचे रीतसर प्रशिक्षण घेऊन आले. पोलिसांना नंतर मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील त्यांच्या प्रशिक्षकांची नावे, मेजर तुफेल, मेजर हबीबुल्ला, मेजर कैसर कुरेशी, कर्नल बशीर, अशी होती. ही सगळी टोपण नावे होती असे जरी गृहित धरले तरी, काश्मीरमधील असंतुष्टांना हाताशी धरून, तेथे पद्धतशीरपणे दहशतवाद फैलावण्यामागे पूर्वीपासूनच पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांची सक्रिय भूमिका होती, हे निश्चित आहे.

एप्रिल १९६८ मध्ये, ठोस पुराव्याअभावी झाहगीरची तुरुंगातून सुटका झाली. बाहेर येताच त्याने आपल्या पाकिस्तानी 'मदाऱ्यां'सोबत संबंध पुन्हा स्थापित केले. जुलै १९६८ मध्ये नाझीर अहमद वाणी याच्यासह, झाहगीरही रामगढ-सियालकोट सीमा पार करून पाकिस्तानात गेला. पाकिस्तानी इंटेलिजन्स ब्यूरोच्या, झफर इकबाल राठोड नावाच्या अधिकाऱ्याने झाहगीरचा ताबा घेतला. त्याने त्याची भेट काही पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यांसोबत घडवून आणली. काश्मीरमधून युवकांच्या लहान-लहान गटांना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवण्याची, आणि पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेल्या युवकांना काश्मीरमध्ये संघटित करण्याची जबाबदारी झाहगीरवर सोपवली गेली. आता गुलाम रसूल झाहगीर हा केवळ एक बंडखोर काश्मिरी युवक न राहता, रीतसरपणे पाकिस्तानी गुप्तहेर आणि हस्तक झाला होता. 

पाकिस्तानातून परतल्याबरोबर झाहगीरने ताज्या दमाचे काश्मिरी युवक आपल्या संघटनेमध्ये सामील करायला सुरुवात केली. त्यातील दोन युवक, मोहम्मद अस्लम वाणी आणि झहूर अहमद शाहदाद यांनी एक धाडसी योजना आखली. श्रीनगरमधील इस्लामिया कॉलेजमध्ये NCC च्या छात्रांसाठी प्रशिक्षण चालत असे. तेथील शस्त्रागारामधून बंदुका चोरण्याची ती योजना सपशेल फसली आणि पोलिसांच्या धाडीमध्ये एक कॉलेजकुमार पकडला गेला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून भारतीय गुप्तहेर यंत्रणेने वाणी व शाहदाद यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले. चौकशीचे धागे गुलाम रसूल झाहगीरपर्यंत पोचले परंतु, तोपर्यंत झाहगीर पाकिस्तानात पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला होता.

नोव्हेंबर १९६८ पासून झाहगीरला पाकिस्तानी गुप्तहेरखात्याच्या अधिकाऱ्यांकडून दहशतवादाचे अतिशय पद्धतशीर व व्यापक प्रशिक्षण आणि प्रोत्साहन मिळू लागले. त्या अधिकाऱ्यांसोबत बसून, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवाद पसरवण्याच्या योजनेचा आराखडा तयार करायला झाहगीरने सुरुवात केली. जम्मू-काश्मीरवरील भारताची पकड ढिली करण्यासाठी तीन वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्याचे नक्की ठरले.  

सर्वप्रथम, एखाद्या राजकीय पक्षाच्या माध्यमाद्वारे, काश्मीरमध्ये भारताची प्रतिमा डागाळणे गरजेचे होते. त्यासाठी जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे वरिष्ठ नेते, मिर्झा अफझल बेग यांच्या 'प्लेबिसाईट फ्रंट' चा विचार झाला. कारण, मुस्लिम लीग किंवा जमात-ए-इस्लामी सारख्या पाकिस्तानच्या 'हातच्या' पक्षांना तोपर्यंत काश्मीरमध्ये आपला जम बसवता आलेला नव्हता. पुढे गुलाम रसूल झाहगीर आणि मिर्झा अफझल बेग यांच्यादरम्यान बऱ्याच भेटी व संगनमत झाले आणि नियोजित दहशतवादी कारवायांना आवश्यक असलेला एक राजकीय टेकू मिळाला. 

दुसरीकडे, भारतातील रेल्वे स्टेशन, विमानतळ व विविध औद्योगिक केंद्रांवर हल्ले करून भारताची अर्थव्यवस्था कमकुवत करणे आवश्यक होते. काश्मिरी युवकांना हत्यारे व बॉम्ब चालवण्याचे प्रशिक्षण देऊन अशा घातपाती कामगिरींवर पाठवणे शक्य आहे याची खात्री पाकिस्तान्यांना होती. भारताला आर्थिक विवंचनेत टाकले म्हणजे भारत काश्मीरच्या मुद्द्याला प्राधान्य देणार नाही असा पाकिस्तान्यांचा कयास होता. 

भारतीय सैन्यदल म्हणजे काश्मीरच्या रक्षणासाठीचा 'हुकमी एक्का' आहे हे १९४७-४८ व १९६५ च्या युद्धातील अनुभवामुळे पाकिस्तान्यांना पक्के समजले होते. त्यामुळे, त्यांचे तिसरे आणि सर्वात महत्वाचे लक्ष्य तेच होते. भारतीय सेनेच्या सर्व मोक्याच्या ठिकाणांची गुप्त माहिती मिळवून ठेवणे, आणि योग्य वेळ येताच, त्या ठिकाणांवर हल्ले करून भारताची युद्धक्षमता नष्ट करणे, पाकिस्तानच्या दृष्टीने निर्णायक ठरणार होते. 

हे सर्व काही साध्य करण्यासाठी, एक किंवा अधिक दहशतवादी संघटना उभ्या करून त्यांना प्रभावी नेतृत्व पुरवण्याची गरज होती. त्या संघटनांना प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि पुरवठा जरी पाकिस्तानचा असला तरी त्यांमध्ये मुख्यत्वे स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक होते. कारण, त्या संघटनांविरुद्ध भारतीय सुरक्षा दलांनी केलेला प्रत्येक प्रतिहल्ला, हा 'काश्मिरीयत' वर केलेला आघात असल्याचे चित्र रंगवणे पाकिस्तानला सोपे जाणार होते. साहजिकच, भारताची प्रतिमा केवळ काश्मीरमध्येच नव्हे, तर जगभरात डागाळली जाणार होती. 

या कामासाठीच गुलाम रसूल झाहगीरच्या पुढाकाराने उभ्या केलेल्या दहशतवादी संघटनेचे नाव ठेवले गेले 'अल-फतेह'! 
'अल-फतेह' या नावालाही इस्लामच्या इतिहासात एक विशिष्ट महत्व असल्याने, काश्मीरच्या फुटीरवादाला 'जिहाद'चे, म्हणजेच धर्मयुद्धाचे स्वरूप देण्याचा पाकिस्तानचा जो मनसुबा होता त्यालाही आपोआप हातभार लागणार होता!

१९६८-६९ मध्ये जन्माला आलेल्या 'अल-फतेह' या संघटनेने जो कित्ता घालून दिला होता, तोच कित्ता पुढे जम्मू-काश्मीर राज्यात फोफावलेल्या अनेक दहशतवादी संघटना आजदेखील गिरवीत आहेत. हिझबुल मुजाहिदीन, जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, आणि या स्वरूपाच्या इतरही अनेक संघटना म्हणजे, 'अल फतेह' चीच पिलावळ आहे...
 
[मुख्य संदर्भस्रोत : "India, Pakistan, and  the Secret Jihad: The covert war in Kashmir, 1947–2004" - लेखक : प्रवीण स्वामी] 
 


(क्रमशः)
(भाग २१ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

२ टिप्पण्या:

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

या पोस्टवर टिप्पणी लिहिता येत नसल्याची तक्रार काही वाचकांनी केली.
ज्यांना असा अनुभव आला असेल त्यांनी मला ९४२२८७०२९४ वर व्हॉट्सअप संदेशाद्वारे कळवावे. 🙏

अनामित म्हणाले...

Very nice sir. Many facts I am not aware. Thanks for updates. Excellent narration skills u possess sir. Great quality