मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

काश्मीरचे_अश्रू : भाग १५

  #काश्मीरचे_अश्रू 

(भाग १४ नंतर पुढे चालू...)

भारतीय सशस्त्र सेनादलांचे सर्वोच्च नेते, गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांनी काश्मीरमध्ये सेना पाठवण्याचे आदेश २६ ऑक्टोबर रोजी जारी केले. काश्मीरमधील परिस्थिती अशी होती की, काही तासांच्या आतच सेनेच्या जमतील तितक्या तुकड्या श्रीनगरला पाठवाव्या लागणार होत्या. 

त्यावेळी, दिल्लीच्या जवळ गुडगांव येथे १६१ इन्फंट्री ब्रिगेडचे मुख्यालय होते. परंतु, त्या ब्रिगेडच्या अनेक तुकड्या दिल्लीच्या आसपास आणि पूर्व पंजाबच्या काही भागांमध्ये शरणार्थी शिबिरांचे नियोजन आणि दंगलग्रस्त भागांमध्ये गस्त घालण्याचे काम करीत होत्या. लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांच्या अधिपत्याखाली शीख रेजिमेंटची पहिली बटालियन मात्र गुडगांवमध्येच तैनात होती. सर्वप्रथम तीच बटालियन श्रीनगरला पाठवण्याचे नक्की झाले. 

'१ शीख' बटालियनला जेंव्हा युद्धासाठी तयार होण्याचे आदेश मिळाले, तेंव्हा पाकिस्तानी टोळीवाले श्रीनगरपासून जेमतेम १०० किलोमीटरवर होते आणि पक्क्या रस्त्यावरून बसगाड्यांमध्ये प्रवास करीत होते. त्याउलट, दिल्ली ते श्रीनगरपर्यंत ८०० किलोमीटर रस्त्याचा अर्धाअधिक भाग कच्चा आणि डोंगराळ भागातून जाणारा होता. अर्थातच, सर्व हत्यारे आणि युद्धसामग्री ट्रक्समध्ये भरून श्रीनगरला जाण्याचा पर्याय उपलब्ध नव्हता. विमानानेच जाणे क्रमप्राप्त होते. श्रीनगरची धावपट्टी कच्ची, आणि लांबीला खूप कमी होती. आणि भारतीय सेना विमानाने श्रीनगरला पोहोचण्यापूर्वी जर ती धावपट्टीही शत्रूच्या ताब्यात गेली असती तर सर्व काही संपल्यातच जमा होते. 

स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारताच्या वायुदलाकडे स्वतःची विमाने होतीच. पण त्याशिवाय, बऱ्याच खाजगी विमान कंपन्यांकडे दुसऱ्या महायुद्धात वापरली गेलेली डाकोटा विमाने होती. भारत-पाकिस्तान दरम्यान स्थलांतरित होणाऱ्या लोकांची वाहतूक करण्याचे काम ही विमाने त्या काळी करीत होती. अशी सुमारे १०० विमाने ताब्यात घेऊन, भारत सरकारने  वायुदलाला उपलब्ध करून दिली, तरीदेखील विमाने कमीच पडत होती. २७ ऑक्टोबरच्या सकाळी, लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांच्याबरोबर '१ शीख' बटालियनची पहिली तुकडी श्रीनगर विमानतळावर उतरताच,  त्यांनी तातडीने विमानतळाच्या चारी बाजूंनी नाकेबंदी उभारली.

२७ ऑक्टोबरनंतरचे काही दिवस, श्रीनगर विमानतळावरून एक विमान परत दिल्लीकडे उड्डाण करते न करते तोच, त्यापाठचे विमान उतरत होते. संपूर्ण धावपट्टीवरील आकाशात दिवसभर नुसते धुळीचे लोट उठत असत. तशा प्रतिकूल परिस्थितीतही, वायुदलाच्याच नव्हे तर सर्व खाजगी कंपन्यांच्या सिव्हिलियन वैमानिकांनीही जीवावर उदार होऊन, आणि एकही अपघात न होऊ देता, ही कामगिरी पार पाडली! (ओडिशाचे सध्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईकांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री, श्री. बिजू पटनाईक, हे या वैमानिकांपैकी एक होते!)

२७ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत संपूर्ण '१ शीख' बटालियन श्रीनगर विमानतळावर पोहोचली होती. या बटालियनवर केवळ विमानतळाच्या सुरक्षेची कामगिरी सोपवली गेली होती. लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांनी जम्मू-काश्मीर सैन्याची काही वाहने वापरासाठी मिळवली. तसेच, त्यांना ही खबरदेखील मिळाली की हल्लेखोर अजूनही बारामुल्लापर्यंत पोचले नव्हते. 

कर्नल राय यांच्या लगेच लक्षात आले की, त्यांनी जर शत्रूला बारामुल्लापर्यंतच रोखून धरले, तर पाठोपाठ दिल्लीहून येणाऱ्या इतर बटालियन्सना मोठाच फायदा होणार होता. परंतु, सेना मुख्यालयातून तसे आदेश मिळवणे कठीण होते, कारण, दिल्लीशी संपर्क साधण्यासाठी टेलीफोन किंवा रेडिओ यंत्रणाही त्यावेळी त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती. अशा परिस्थितीत, एका सेनाधिकाऱ्याने जे करायला हवे तेच लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय यांनी केले. विमानतळाच्या सुरक्षेसाठी आवश्यक तेवढीच तुकडी त्यांनी मागे ठेवली, आणि उरलेल्या सर्व जवानांना सोबत घेऊन ते श्रीनगरहून बारामुल्लाच्या दिशेने निघाले.

बारामुल्लाच्या २ किलोमीटर अलीकडे असलेल्या टेकड्यांवर त्यांनी जवानांच्या तुकड्या अशा प्रकारे तैनात केल्या की, बारामुल्ला-श्रीनगर रस्ता त्यांच्या दृष्टीच्या व बंदुकीच्या टप्प्यात राहील. स्वतः कर्नल राय जीपमध्ये एक छोटी तुकडी घेऊन बारामुल्ला गावाकडे निघाले. परंतु, तोपर्यंत शत्रू बारामुल्लापर्यंत पोहोचलेला होता आणि टोळीवाले बारामुल्ला लुटण्यामध्ये दंग होते.

कर्नल राय बारामुल्लाच्या जवळ पोहोचतात न पोहोचतात तोच, त्यांच्या जीपवर शत्रूची मिडीयम मशीनगन आग ओकू लागली. काही शीख सैनिक जखमी झाले आणि जीपही निकामी झाली. आपल्या जखमी जवानांना घेऊन शेतांमधून वाट काढत, टेकडीच्या दिशेने परतणाऱ्या कर्नल राय यांच्या चेहऱ्यावर मिडीयम मशीनगनच्या फैरी लागल्या आणि ते तेथेच धारातीर्थी पडले. १९४७-४८ साली काश्मीरच्या रक्षणासाठी लढल्या गेलेल्या त्या युद्धात भारताने पहिली आहुती दिली होती. 

काश्मीर खोऱ्यात शिरलेले टोळीवाले, जम्मू भागात आक्रमण करणारे 'आझाद काश्मीर'चे सैनिक आणि या सर्वांच्या पाठीशी छुप्या रीतीने घुसलेले पाकिस्तानी सैन्य, या सर्वांसोबत दोन हात करण्यासाठी भारतीय सैन्य युद्धात उतरले. २७ ऑक्टोबरनंतरचे पाच दिवस, श्रीनगर विमानतळावर एकामागून एक विमानांच्या फेऱ्या अव्याहत चालू होत्या. पायदळाच्या बटालियन्स, त्यांची हत्यारे आणि इतर सामग्री काश्मीरमध्ये पोचत राहिली. 

बारामुल्ला आघाडी सांभाळण्यासाठी '१ शीख'बरोबर आणखी दोन बटालियन्स, आणि त्या तिन्ही बटालियन्सचे मुख्यालय, म्हणजेच १६१ इन्फन्ट्री ब्रिगेड तैनात केले गेले. ब्रिगेडियर लायोनेल प्रोतिप सेन, उर्फ 'बोगी' सेन यांनी पुढील वर्षभर त्या मुख्यालयाची धुरा सांभाळली. हळूहळू युद्धाची व्याप्ती वाढत गेली, आणि भारतीय सैन्यातील अनेक धुरंधर सेनानींनी युद्धात आपले योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य काश्मीरसाठी प्राणपणाने लढले. फील्ड मार्शल करिअप्पा, जनरल थिमय्या, जनरल श्रीनागेश, जनरल गोपाळ गणेश बेवूर, यांसारखे सेनाधिकारी काश्मीरमध्ये शौर्य गाजवल्यानंतर, पुढे भारताचे सेनाध्यक्षही बनले.  

भारतीय सैन्य हवाईमार्गे श्रीनगरमध्ये उतरल्याची बातमी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मोहम्मद अली जिन्नांना समजताच, काश्मीरवर उघडपणे आक्रमण करण्याचे आदेश त्यांनी पाकिस्तानचे सेनाध्यक्ष, जनरल फ्रॅंक मेसर्व्ही यांना दिले. मात्र, जनरल मेसर्व्हीनी जिन्नांना सांगितले की भारत-पाक सैन्याचे सरसेनापती फील्ड मार्शल ऑकिनलेक यांची परवानगी असल्याशिवाय त्यांना तसे करता येणार नाही. फील्ड मार्शल ऑकिनलेकनी जिन्नांना स्पष्टपणे सांगितले की, काश्मीर आता भारताचा अविभाज्य भाग बनलेला असल्याने, पाकिस्तानी सैन्य तेथे पाठवायचे झाले, तर पाकिस्तानी सैन्यातील सर्व ब्रिटिश अधिकारी तातडीने काढून घेण्यात येतील. त्या काळात, पाकिस्तानचे बहुसंख्य सेनाधिकारी ब्रिटिश होते. तेच निघून गेले असते तर पाकिस्तानी सैन्य लुळे पडणार होते. आपला आदेश मागे घेऊन, हात चोळत बसण्यापलीकडे अन्य पर्याय जिन्नांच्या हाती उरला नाही. 

वरिष्ठांकडून कोणतेही आदेश नसताना, बारामुल्लाच्या रक्षणासाठी, लेफ्टनंट कर्नल राय यांनी केलेली कारवाई, आणि त्यांचे हौतात्म्य वाया गेले नाही. भारतीय सैन्य युद्धात उतरलेले पाहताच हल्लेखोरांचे मनोधैर्य खचले. त्यानंतर, ते बारामुल्लाच्या पुढे येऊ शकले नाहीत, आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर काबीज करण्याचे पाकिस्तानचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही. 

हुतात्मा लेफ्टनंट कर्नल दिवाण रणजित राय हे स्वतंत्र भारताचे पहिले महावीरचक्रविजेते ठरले. यापुढील काळातही परमवीरचक्रविजेते मेजर सोमनाथ शर्मा, महावीरचक्रविजेते ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान, यांसारख्या अनेक अधिकारी व जवानांनी काश्मीरसाठी हौतात्म्य पत्करले. जिवंतपणी परमवीरचक्राने सन्मानित केले गेलेले महाराष्ट्राचे सुपुत्र, मेजर रामराव राघोबा राणे यांचे असामान्य साहस तर अविस्मरणीय होते. 
[वरील संपूर्ण माहितीचा मुख्य संदर्भस्रोत  : "Slender  was  the  Thread" - लेखक : लेफ्टनंट जनरल लायोनेल प्रोतीप ("बोगी") सेन ]

जम्मू-काश्मीरच्या रक्षणासाठी २७ ऑक्टोबर १९४७ ला सुरु झालेले घमासान युद्ध, पुढे १ जानेवारी १९४९ पर्यंत लढले गेले. 

दुसरीकडे, राजधानी श्रीनगरमध्ये, नवी राजकीय समीकरणे आकार घेऊ लागली होती. 


(क्रमशः)
(भाग १५ पुढे…) 


कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

१२ टिप्पण्या:

arunsarade म्हणाले...

खूप छान माहिती

सुरेश भावे. म्हणाले...

रोमान्चकारी.

अनामित म्हणाले...

आनंदजी फार चांगली माहिती आहे, तुमची लिखाणशैली पणं सुरेख आहे. जमलं तर एखादे पुस्तक लिहा या विषयी.

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

Ajit vaidya म्हणाले...

Very nice continuation sir

Milind Ranade म्हणाले...

Reading your articles has been an extremely enlightening experience Colonel. Hats off to the research you have done. Has your stay during postings in the state added to your perspective and given you a first hand feel?
Milind Ranade

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

Thanks Milind 🙂👍
My brief stint with Rashtriya Rifles during its raising in 1990, and my two later tenures in Udhampur and Akhnoor respectively, generated sufficient interest in me to read about j&k 's history.

The current series of articles is based on a more recent and wide reading, necessitated by the compulsion to be as accurate as possible in quoting dates, events, and the dramatis personae. 🙂

विनायक बेहेरे म्हणाले...

फारच माहितीपूर्ण व उत्कंठा वाढवणारं लिखाण... कर्नल साहेब hats off...

Col. Anand Bapat (Retd) म्हणाले...

धन्यवाद 🙏